बीएसएफच्या दिव्यांग रॅलीचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई ( २६ नोव्हेंबर ) : जगात व देशात सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांना अटकाव करण्यासाठी फक्त पोलीस अथवा सैन्यांच्या सुरक्षेवर अवलंबून न राहता देशातील प्रत्येक नागरिकांला सजग राहण्याची आवश्यकता आहे. देश व समाज विरोधी प्रवृत्तींना रोखण्यासाठी व देशाची, शहराची सुरक्षा बळकट करण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करावे. हीच दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) वतीने शहिदांच्या स्मरणार्थ आयोजित दिव्यांगांची कार रॅली तसेच सायकल रॅलीचा समारोप आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर,सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अरुण कुमार, महानिरीक्षक रमेशचंद ध्यानी आदी उपस्थित होते.

सीमा सुरक्षा दलाच्या वतीने दिल्लीतील इंडिया गेट येथून 14 नोव्हेंबर रोजी या रॅलीस सुरूवात झाली. 1400 किमीचा प्रवास करून ही रॅली गेट वे ऑफ इंडिया येथे आली आहे. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या कॉन्स्टेबल लाला व कॉन्स्टेबल हरेंदर या दिव्यांग जवानांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबईवरील 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजच्या दिवशी मुंबईवर अनेक ठिकाणी हल्ला झाला होता. त्यावेळी झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यातील घटनास्थळ असलेले हॉटेल ताज हे आजही मोठ्या पूर्वीच्याच दिमाखात उभे आहे. भारत हा कधीच संपणारा देश नसून दहशतवादाला पाठिंबा देणारेच संपतील, ही भावना हॉटेल ताजच्या निमित्ताने जगाला दाखवून देत आहे. भारताकडे असलेल्या सीमा सुरक्षा दल, एनएसजी, फोर्स वन आणि अर्धसैनिक दलासारख्या सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता या जवानांमुळे आपल्याकडे आहे. डोकलाममधील सैन्यांच्या कारवाईनंतर भारत हा कमजोर नसून मजबूत देश असल्याचे संपूर्ण जगाला दिसून आले आहे. या देशाला मजबूत बनविण्याचे श्रेय या सैन्यातील जवानांना आहे.

भारताबरोबरच जगात सातत्याने अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले होत आहेत. एकीकडे शांतीचा पुरस्कार करणारे वैश्विक घटक दिसत असून दुसरीकडे काही जण या शांततेला खो घालण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. स्वतःच्या स्वार्थी, अहंकारी व चुकीच्या विचारसरणीसाठी हे लोक जगात व देशात दहशतवादाच्या घटना घडवित आहेत. अशा घटनांना रोखण्यासाठी आपल्याकडे मजबूत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत फोर्स वन सारखी सुरक्षा यंत्रणा उभी असून सीसीटीव्ही यंत्रणाही बसविण्यात आली आहे. तसेच आधुनिक सुरक्षा सामग्रीही सुरक्षा दलांना देण्यात आली आहे. परंतु देशातील, शहरांच्या सुरक्षेसाठी फक्त पोलीस अथवा सैन्याच्या यंत्रणेपुरतेच सिमीत न राहता प्रत्येक नागरिकांने सजग रहायला हवे. प्रत्येकाने सुरक्षेच्या दृष्टिने सतर्क राहून सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करावे. शहिदांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन आपल्या देशाची, शहराची सुरक्षा एवढी भक्कम करावी, की जेणेकरून कुठलाही दहशतवादी पुन्हा येथे घुसता कामा नये. हाच ध्यास आजच्या दिवशी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

सीमा सुरक्षा दलाच्या स्थापनेत पुढाकार घेतलेले या दलाचे पहिले महासंचालक रुस्तुमजी हे मुंबईचे होते. त्यामुळे मुंबई व सीमा सुरक्षा दलाचे एक वेगळे नाते असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वेगवेगळ्या कारवाईमध्ये सहभागी होताना दिव्यांगत्व आलेल्या बीएसएफच्या जवानांनी या रॅलीत सहभागी होऊन दिव्यांगत्व हे मनाने येते शरीराने नव्हे, हे दाखून दिले असून आपण आजही मनाने खंबीर असल्याचे दाखवुन दिले आहे. १४०० किमीचा प्रवास करून या जवानांनी देशातील नागरिक, युवकांना प्रेरणा दिली असल्याचे गौरोवद्गारही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी काढले.

यावेळी बीएसएफच्या या रॅलीचे झेंडा दाखवून मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. अति. महासंचालक अरुण कुमार यांनी रॅलीची माहिती दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget