ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

मुंबई ( २६ नोव्हेंबर ) : ज्येष्ठ गायक, संगीतकार सुधीर फडके तथा बाबुजी यांचे 25 जुलै 2018 पासून जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असून यानिमित्ताने राज्य शासन विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना 2017 या वर्षांचा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उत्तमसिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात तावडे बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार हेमंत टकले, ज्येष्ठ संगीतकार उत्तमसिंग, निर्माता दिग्दर्शक एन. चंद्रा, गायक श्रीधर फडके, आशाताई खाडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांच्या हस्ते पागधरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, कलाकाराने कलाकारांचा सन्मान केला पाहिजे ही यामागे शासनाची भूमिका असून त्यामुळेच या पुरस्काराचे गतवर्षाचे मानकरी ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

25 जुलै 2018 हा दिवस ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचा जन्मदिवस असून या दिवसापासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त राज्य शासन विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. ज्येष्ठ गायिका पुष्पाताईंच्या आईने लता मंगेशकर पुरस्कार मिळेल असे केलेले भाकित राज्य शासनाने खरे केले असून त्या माऊलीने पाहिलेले स्वप्न खरे ठरले आहे असे सांगून तावडे यांनी पागधरे यांच्या गायनाचे, त्यांनी गायलेल्या गाण्यांचे कौतुक केले.

राज्य शासनाने नृत्य, गायन आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 15 अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेतला असून यापुढच्या काळात शास्त्रीय नृत्य, सुगम संगीत यांची विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

खेळ, नृत्य आणि गायनामुळे गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा भावनिक बुद्ध्यांक वाढणे आवश्यक असून यावर राज्य शासन विशेष भर देत असल्याचेही शेवटी श्री. तावडे यांनी सांगितले. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना श्रीमती पुष्पा पागधरे म्हणाल्या की लतादीदींच्या नावाने असलेला हा पुरस्कार प्रत्येकाला मिळावा हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते, हे स्वप्न माझेही होते, ते आज या पुरस्कारामुळे आज पूर्ण झाले, ते माझ्या जीवनाचे, कलेचे फलित असे मी मानते असे सांगून 26/11 अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना त्यांनी अभिवादन केले.

या पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने ‘इतनी शक्ती हेमें देना दाता’ हा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. या संगीत कार्यक्रमाचे संयोजन आनंद सहस्त्रबुध्दे यांनी केले होते तर संहिता आणि संकल्पना आदित्य बिवलकर यांची होती. विघ्नेश जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर माधुरी करमरकर, राहुल सक्सेना, मुग्धा वैशंपायन, मधुरा कुंभार, आणि इतर गायक निवेदक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आतापर्यंतचे पुरस्कार मानकरी

राज्य शासनामार्फत सन 1992 पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येता. माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हदयनाथ मंगेशकर, ज्योत्सना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खययाम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, पदमश्री आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग आणि उत्तम सिंग यांना यापूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget