जिल्हा परिषदेच्या शाळा आता होणार 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळा'

राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय ओजस शाळांना मान्यता

मुंबई ( ९ मे २०१८ ) : राज्यातील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जून 2018 या नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्यावतीने सरकारी शाळातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ‘ओजस आंतरराष्ट्रीय शाळांची’ सुरुवात करण्यात येणार असून जून महिन्यापासून राज्यातील 13 तर पुढील शैक्षणिक वर्षापासून 100 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. आपली शाळा आंतरराष्ट्रीय शाळेच्या निकषात येण्यासाठी राज्यातील शाळांना अर्ज करण्यासाठी विद्या प्राधिकरण, पुणे मार्फत ऑनलाईन लिंक देण्यात आली होती. यानुसार 28नोव्हेंबर 2017 अखेर एकूण 378 शाळांनी अर्ज केले होते. त्यामधून जिल्हास्तरीय निवड समितीद्वारे ऑनलाईन लिंक भरलेल्या शाळांमधून एकूण 109 शाळांची नामांकने प्राप्त झाली होती. यानंतर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाची शाळा म्हणून मान्यता मिळण्यासाठी राज्यस्तरावर निवडप्रक्रिया घेण्यात आली होती. या निवड परिषदेत सहभागी एकूण 106 शाळांमधून निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी असलेली व रुब्रीक्स नुसार प्रत्येक विभागातून पात्र असणाऱ्या खाली नमूद शाळांची ओजस शाळा म्हणून शिफारस करण्यात आली. शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केलेल्या खाली नमूद 13 शाळांना ‘ओजस आंतरराष्ट्रीय शाळा’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

या असतील ओजस आंतरराष्ट्रीय शाळा

• अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, वरखेड.

• वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा.

• औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण येथील जिल्हा परिषद प्रशाळा.

• परभणी जिल्ह्यातील माळीवाडा येथील पाथरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा.

• कोकण विभागातील ठाणे‍ जिल्ह्यातील खरेदी नं.1 येथील शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.

• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चराठे नं. 1 येथील सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.

• नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचाळा येथील चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा.

• गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील शहीद जानया तिमया जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय.

•नाशिक विभागातील नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील धडगाव तालुक्यातील आंतरराष्ट्रीय निवासी शाळा.

• नाशिक जिल्ह्यातील भोयेगांव येथील चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.

• पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर येथील भुदरगड तालुक्यातील विद्या मंदिर.

• पुणे जिल्ह्यातील वाबळे वाडी येथील शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.

• सातारा जिल्ह्यातील बोपर्डी येथील वाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या सिंगापूर, हाँगकाँग, जपान या देशातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून आणि समृद्ध आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम व प्रभावी अध्ययन संसाधने यांची उपलब्धता करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील 13 ‘ओजस’ शाळांची निवड झालेली असून या शाळा मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तयार होतील. या शाळांमधील शिक्षकांना पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रायोगिक पथदर्शी चाचणी घेऊन इयत्ता पहिली ते तिसरीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. टप्प्याटप्प्याने सर्व वर्गांचा अभ्यासक्रम तयार होत आहेत. या शाळांच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र व स्वायत्त ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ’ तयार केले आहे. ज्ञानाधिष्ठित, समाजाभिमुख, एकविसाव्या शतकाकरिता कौशल्ये यांना केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रम निर्मिती केली आहे.आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळांसाठी एक समिती गठित करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली आहे. Local to Global आणि Known to Unknown या ध्येयावर या शाळांचे काम सुरु राहणार आहे. एनसीईआरटी आणि एससीईआरटीच्या अभ्यासक्रमाचा विचार करुन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने ज्ञान, अभिवृत्ती,उपयोजना, कौशल्य आणि सवयी या 5 प्रमुख आधारस्तंभावर आधारित असणार आहे. या अभ्यासक्रमात साक्षरता, वाचन, लेखन, संभाषण, श्रवण, गणन, वित्त, कला, शारीरिक शिक्षण आणि पर्यावरणशास्त्र या विषयांचा समावेश प्रस्तावित आहे.येत्या जून महिन्यापासून सुरु होणाऱ्या 13 शाळांसाठी 70 शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांना सलग 22 दिवसांचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निवडण्यात आलेल्या 13 शाळा या जिल्हा परिषदेच्याच मराठी माध्यमांच्या शाळा असून मराठीबरोबरच इंग्रजी आणि अन्य विषयांचे प्रभुत्व वाढविण्यावर या शाळांमध्ये भर देण्यात येणार आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget