मुंबईत 2 जूनपासून फिनटेक महोत्सव

मुंबई ( २५ मे २०१८ ) : मुंबई येथे जागतिक ‘फिन टेक हब’ उभारण्याचे राज्यशासनाने ठरविले असून याचाच एक भाग म्हणून येत्या 2 व 3 जून रोजी हॉटेल ट्रायडंट येथे ‘फिन टेक’ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत केले जाणार आहे.

या परिषदेत फिनटेक क्षेत्रातील स्टार्ट अप, विद्यार्थी आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या अभिनव कल्पना आणि उपाय, फिनटेक क्षेत्रातील बदलत्या संधी याची माहिती मिळणार आहे. तसेच बॅंक, वित्तीय सेवा संस्था, तंत्रज्ञान कंपन्या, माध्यमे आणि गुंतवणुकदार यांच्यासह प्रत्यक्ष संवाद करण्याची संधी मिळणार आहे.

राज्यात या फिनटेक क्षेत्रातील उद्योगाच्या वाढीसाठी पुरक वातावरण असल्याने उद्योजकांना फिनटेक पॉलिसीचा लाभ मिळणार आहे. महोत्सवाची सुरुवात ‘फिनटेक ए पी आय सँडबॉक्स’ लाँच करुन होणार आहे. या महोत्सवात मुंबई फिनटेक हबचे सदस्य होण्यासाठी स्टार्टअप स्वतः नोंदणी करू शकणार आहेत.
फिनटेक धोरण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या अंतर्गत कर लाभ, आर्थिक प्रोत्साहन आणि महाराष्ट्रातील फिनटेक स्टार्टअपसाठी होस्टिंग सुविधा आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘स्मार्ट फिनटेक हब”साठी प्रोत्साहनपर चटई क्षेत्रासह इतर बाबींचा समावेश आहे.

या महोत्सवामध्ये अनेक विषयांवर चर्चा होणार असून त्यामध्ये वित्तीय सेवा उद्योगातील तज्ज्ञ, तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था आणि शासनाचा सहभाग असणार आहे. भारतातील बाजारपेठ या विषयांतर्गत भारतातील फिनटेक क्षेत्रातील संधी आणि आव्हाने, जागतिक बाजारपेठ एक दृष्ट‍िक्षेप, या क्षेत्राशी संबंधित आर्थिक बाबींचा उहापोह, ‘स्केलींग अप रेगटेक’-नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेले बदल आणि आव्हाने, या विषयांवर चर्चा होणार आहे.

देशातील बॅंकिंग, वित्तीय आणि विमा क्षेत्रामधील सर्वोच्च कंपन्यांतील मान्यवर आणि नेते या चर्चेत सहभागी होणार आहेत. सिंगापूर, हाँगकाँग आणि युनायटेड किंगडम यांच्या आर्थिक प्राधिकरणाचे परराष्ट्र प्रतिनिधी देखील उपस्थित असतील. जागतिक स्तरावरील या उद्योगाची स्थिती यावर ते मार्गदर्शन करतील

‘फिनटेक’, ‘गोव्हटेक’ आणि ‘रेगटेक’ विषयातील उद्योग क्षेत्रासमोर समोर असलेल्या त्यांच्या समस्यांसाठी उपाय शोधण्यासाठीचे एक अभिनव आव्हान स्टार्ट अपसाठी असणार आहे. या अंतर्गत 24 तासांच्या हॅकॅथॉनमध्ये विद्यार्थी, डेव्हलपर्स आणि डिझाइनर अभिनव उपाययोजना करणार आहे. विजेत्यांना 7 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे आणि सर्वात उपयुक्त आणि व्यवहार्य आणि प्रशासनामध्ये उपयुक्त असतील, असे उपाय शासनाद्वारे दैनंदिन व्यवहारासाठी स्वीकारले जाणार आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget