उद्दिष्टपूर्तीसाठी नको, काळाची गरज म्हणून वृक्ष लागवडीत सक्रिय योगदान - विकास खारगे

मुंबई (१६ जानेवारी २०१९): राज्यात २०१९ च्या पावसाळ्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन असून त्यात शासनाच्या प्रत्येक विभागाला त्यांचा सहभाग कसा असेल याची स्पष्टता करून देण्यात आली आहे. विभागांनी या कामाकडे केवळ उद्दिष्टपूर्ती म्हणून न पाहता, पर्यावरण रक्षणासाठी आणि वातावरणीय बदलाचे परिणाम टाळण्यासाठी वृक्ष लागवड हा एक सक्षम पर्याय असल्याचे सत्य स्वीकारून सक्रिय योगदान द्यावे आणि वृक्ष लागवडीचे परिपूर्ण नियोजन करावे, असे आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले.

खारगे यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीतील जिवंत रोपांचा आढावा आज घेतला तसेच येणाऱ्या पावसाळ्यात करावयाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या तयारीची माहिती सर्व विभागांच्या समन्वय अधिकाऱ्यांकडून घेतली त्यावेळी ते बोलत होते.

लोकसहभागातून हरित महाराष्ट्राची वाटचाल उत्तम पद्धतीने सुरु झाल्याचे सांगून खारगे म्हणाले, आता आपल्या सर्वांना २०१९ मध्ये करावयाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन आणि अंमलबजावणी काटेकोरपणे करायची आहे. या मिशनवर काम करताना यातली विश्वासार्हता आणि पारदर्शकताही आपल्याला जपायची आहे. वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असणारे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. प्रत्येक विभागाने त्यांच्या उपलब्ध निधीच्या अर्धा टक्का रक्कम वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी उपलब्ध करून घेण्याच्या आणि त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. लॅण्डबँकेची निश्चिती विभागांनी करावयाची आहे. क्षेत्रियस्तरावर असलेल्या कार्यालयांना यात प्रभावीपणे सहभागी करून घ्यावयाचे आहे.

ते पुढे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील एकूण रस्त्यांची लांबी किती हे लक्षात घेऊन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. एक रस्ता- एक वृक्ष प्रजाती असे नाविन्यपूर्ण नियोजनही करता येऊ शकेल. एका संपूर्ण रस्त्याच्या कडेला वडाची, दुसऱ्या रस्त्यावर पिंपळ आणि लिंबाची झाडे लावता येतील का, असा वेगळा विचारही त्यांनी करावा, वृक्ष लागवडीची जिथे संधी असेल त्या संधीचा शोध घेतला जावा, त्याचा प्लान तयार करावा, असेही ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणेच जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि इतर विभागांकडे वृक्ष लागवडीसाठी असलेल्या नाविन्यपूर्ण संधींची कल्पना ही त्यांनी उपस्थिताना दिली.

शासनाने वृक्ष लागवडीचा रानमळा पॅटर्न तयार केला आहे. यात माणसाच्या जीवनात घडणाऱ्या घटना-प्रसंगांच्या अनुषंगाने आनंद वृक्ष, माहेरची झाडी, शुभेच्छा वृक्ष, स्मृती वृक्ष, वाढदिवसाचे झाड अशा अनेक प्रकारे झाडं लावण्याची एक सुंदर पण वेगळी संधी आपण निर्माण केली आहे. कन्या वन समृद्धी योजनेतून मुलीच्या जन्माचे स्वागत १० रोपे देऊन करण्याची अनोखी परंपरा आपण सुरु केली आहे अशी माहिती देताना त्यांनी समाजाप्रती आपले दायित्व आहे ते चांगल्या पद्धतीने कसे पूर्ण करता येईल याचा प्रत्येक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांने विचार करावा, आपल्या विभागातील हरित सेनेचे सदस्य वाढवावेत, अशा सूचनाही दिल्या.
वृक्षांशी जुळता स्नेहबंध- जीवनात समृद्धीचे रंग
वृक्ष लागवड मोहिमेने काय दिले असा जर तुम्ही विचार कराल तर तुम्हाला जाणवेल पर्यावरण रक्षणाबरोबर लावलेल्या या रोपांनी जनमाणसाशी बहुआयामी नातं जोडलं आहे.. या नात्याचे बंध आर्थिक- सामाजिक आणि कौटुंबिकस्तरावर अधिक घट्टपणे विणले गेले आहेत. रानमळासारख्या पॅटर्न मुळे घरातील बालकाच्या जन्माबरोबर ते झाडं आता अंगणात वाढताना दिसत आहे.. दहावी- बारावीचे यश हे आनंद वृक्षाच्या रुपातून अंगणात डोलत आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीची आठवण म्हणून तिच्या हातून जी झाडं लावली गेली. ते माहेरचे झाड, मुलगी सासरी सुखात असल्याचा सांगावा देत उभे आहे. जी माणसं आपल्यातून हरवली, देवाघरी गेली त्यांच्या स्मृतिचा गंध स्मृतीवृक्षाच्या माध्यमातून दरवळतो आहे... कन्या वन समृद्धी योजनेतून मुलीच्या जन्माचे स्वागत होताना दिसत आहे. फळझाडाच्या वृक्षातून उत्पन्न वाढीचा स्त्रोत बळकट केला जात आहे..  बरं ही रोपं केवळ लावली जात नाही तर जगवली जात आहेत, कारण त्याचं आणि माणसांचं एक भावनिक नातं निर्माण झालं आहे.. म्हणून अशा पद्धतीने लावल्या जाणाऱ्या वृक्षांचे जिवंत राहण्याचे प्रमाण ही जवळपास १०० टक्के आहे.

प्लांटेशन संडे
उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या समन्वय अधिकारी यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीची माहिती दिलीच परंतु त्या म्हणाल्या, वैयक्तिक पातळीवर आमचा मित्र परिवार नाशिक आणि पुणे येथे प्लांटेशन संडे नावाचा हटके उपक्रम राबवित आहोत, यात ज्या शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य लोकांना झाड लावण्याची इच्छा आहे त्यांना एकत्र करून आम्ही पुणे आणि नाशिक येथे रविवारी टेकड्यांवर वृक्ष लागवड करत आहोत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
होणार पुरस्काराने गौरवही...
बैठकीस उपस्थित पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागात वृक्षलागवडीत जे अधिकारी-कर्मचारी उत्कृष्ट काम करतील त्यांना पुरस्कार देऊन गौरविणार असल्याचे सांगितले.

या वेगळ्या पण नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत आणि अभिनंदन करून खारगे यांनी सर्वांनी वृक्ष लागवडीत अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget