बाबूजींच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या

मुंबई ( २५ मार्च २०१९ ) : जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने चित्र, शिल्पकला, संगीत आणि चित्रपटांचा माध्यमातून बाबूजींच्या स्मृतींना उजाळा देण्याचे कार्य राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

महाराष्ट्राच्या मनामनांत रुजलेले विख्यात संगीतकार आणि गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे सन 2018-19 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बाबुजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांचे जीवनावर आधारित छायाचित्र, पेंटीग्ज, ऑडिओ-व्हिडिओ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जन्मशताब्दी महोत्सवाचे दि. 25 ते 29 मार्च 2019 या कालावधीत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळयाचे उदघाटन ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके व ज्येष्ठ गायक व लेखक आनंद माडगुळकर यांच्या हस्ते आर्ट गॅलरी, पु लं देशपांडे कला अकादमी,प्रभादेवी येथे झाले. सांस्कृतिक जगतातील मानबिंदू असलेल्या संगीतकाराचा सांगीतिक प्रवास या महोत्सवाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. रवींद्र नाट्य मंदिराच्या कलांगण प्रांगणात दररोज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या उदघाटन प्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे उपस्थित होत्या. या चित्रप्रदर्शनाचा उद्घाटनानंतर ग. दि. माडगूळकर विरचीत आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या ʻगीतरामायणाचेʼ प्रख्यात संगीतकार श्रीधर फडके आणि आनंद माडगूळकर यांनी सादरीकरण झाले. या चित्रप्रदर्शनास आणि सांस्कृतिक कार्यक्रमास उदंड प्रतिसाद लाभला. दि.26 मार्च 2019 रोजी रघुलीला एंटरप्रायझेस,मुंबई निर्मित ʻशब्द सूर त्रिवेणीʼ, दि.27 मार्च रोजी कलाअर्पिता, पुणे निर्मित स्वयंवर झाले सीतेचेʼ ही नृत्य नाटिका, दि. 28 मार्च रोजी संवादसेतू,पुणे निर्मित इथेच टाका तंबूʼ या बाबुजी व गदिमांच्या स्वरयात्रेचा कार्यक्रम तसेच दि.29 मार्च रोजी षडज् पंचम, मुंबई निर्मित ʻअशी पाखरे येतीʼ या सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्व रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. दि. 26 मार्च रोजी सुधीर फडके निर्मित व संगीतबद्ध केलेल्या ʻवीर सावरकरʼ, दि.27 मार्च रोजी ʻजगाच्या पाठीवरʼ तसेच दि. 28 मार्च रोजी ʻमुंबईचा जावईʼ या चित्रपटांचा महोत्सव मिनी थिएटर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे रोज दु.3.30 वाजता होणार आहे.

या गानमहर्षिंच्या जीवनावर आधारित 29 मार्च पर्यंत दुपारी.12 ते रात्रौ.8 वाजेपर्यंत आर्ट गॅलरी, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे चित्रांकीत आलेख दर्शविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन तसेच याच कालावधीत कलांगण, रवींद्र नाट्य मंदिराचे प्रांगण येथे नामवंत लेखकांच्या दर्जेदार साहित्यांचे प्रदर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने मांडले जाणार आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने बाबूजींच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळणार असून कार्यक्रमांसाठी व प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget