एव्हरेस्ट चढाईसाठी पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थी सज्ज

मिशन शौर्य २०१९ शुभेच्छा सोहळा

मुंबई ( ५ एप्रिल २०१९ ) : आदिवासी विकास विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'मिशन शौर्य मोहिमेअंतर्गत राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील ११ विद्यार्थी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मिशन शौर्य २०१९ शुभेच्छा सोहळा' सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सचिव यू.पी.एस.मदान, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, प्रशिक्षक अविनाश देऊस्कर, बिमला देऊस्कर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मदान म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एव्हरेस्ट सर करण्याची मिळालेली संधी निश्चितच या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी तसेच हा अनुभव या विद्यार्थ्यांना धाडस, धैर्य आणि जिद्द निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगून या एव्हरेस्ट मोहिमेसाठी निघालेल्या आदिवासी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.

मनिषा वर्मा म्हणाल्या, मिशन शौर्य ही मोहीम आदिवासी विद्यार्थ्यांना केवळ एव्हरेस्ट मोहिम ही चढाईपुरती मर्यादित नाही तर कठीण परिस्थितीत आव्हानांना पेलत यश संपादित करण्यासाठी एक नवी उर्मी देणारी आहे.

मिशन शौर्य मोहिमेत गेल्या वर्षी पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या एव्हरेस्ट चढाईसाठी आवश्यक असलेल्या साहसाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी वर्धा येथील ज्ञानभारती स्कील डेव्हलपमेंट सेंटरमध्ये मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले होते. या केंद्रात २०३ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यातून १३२ विद्यार्थ्यांना हैद्राबादमधील भोंगीर येथे रॅपलिंग आणि रॉक क्लायम्बिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात उत्कृष्ट ठरलेल्या ४१ विद्यार्थ्यांची निवड दार्जिलिंग मधील हिमालयन माउंटनरींग इन्स्टिटयूट येथील प्रशिक्षणासाठी करण्यात आली. येथे खाद्यपदार्थांचा व पाण्याचा साठा करण्याचे प्रशिक्षण, श्वासोच्छ्वासाचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. त्यापैकी ३० उत्कृष्ट विद्यार्थ्यांची अॅडव्हान्स माउंटनरींग कोर्ससाठी निवड करण्यात आली. वीस दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सिक्कीममध्ये हिमालयन सेंटर फॉर अॅडव्हेंचर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पार पाडले. या प्रशिक्षणात उत्कृष्ट ठरलेल्या १८ विद्यार्थ्यांना लेह येथे बर्फाळ नदीतून चालणे, उणे ३५ अंश तापमानात स्वतःचा बचाव करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती, आहार, पोषण मूल्ये अशी सर्वंकष तयारी करण्यात आली होती. या संपूर्ण प्रशिक्षणाअंती उत्तम कामगिरी बजावणाऱ्या ११ विद्यार्थ्यांची निवड मिशन शौर्य २०१९ च्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी करण्यात आली आहे. या वर्षी मोहिमेच्या दुसऱ्या पर्वात मेळघाट, पालघर, धुळे, पांढरकवडा, नाशिक येथील मुन्ना धिकार, शिवचरण भिलावेकर, सुग्रीव मंदे, सुषमा मोरे, अंतुबाई कोटनाके, सुरज आडे, मनोहर हिलीम, चंद्रकला गावित, हेमलता गायकवाड, केतन जाधव, अनिल कुंदे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget