मनरेगामधून जलसंधारण, मृदसंधारणासह विविध नवीन 28 प्रकारच्या कामांना मान्यता

- दुष्काळी भागात मनरेगाच्या कामांना गती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई ( ११ मे २०१९ ) : राज्यात मनरेगा योजनेतून जलसंधारण, मृदसंधारणासह शाळा कंपाऊंड बांधकामासारखी विविध 28 प्रकारची कामे एकत्रिकरणातून (कन्व्हर्जन्स) करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. त्यामुळे गावात दुष्काळाच्या काळात मनरेगाची कामे करुन रोजगार निर्मितीबरोबर गावांमध्ये दुष्काळनिवारणासह विविध लोकोपयोगी कामांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधताना केले. प्रशासनानेही मनरेगाच्या कामांची मागणी येताच त्याला विनाविलंब तीन दिवसाच्या आत मान्यता द्यावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे धुळे जिल्ह्यातील साधारण 45 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल, त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

गावांची 2018 ची लोकसंख्या व जनावरांची संख्या लक्षात घेवून आवश्यक अतिरिक्त टॅंकर व जनावरांना मागणीनुसार तात्काळ चारा उपलब्ध करुन द्यावा. बंद पडलेल्या योजनाही विशेष दुरुस्ती योजनेमधून सुरु करुन गावकऱ्यांना टंचाईच्या काळात तातडीचा दिलासा देता येईल, मागणी येताच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी विनाविलंब असे प्रस्ताव मान्य करावेत, जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तक्रारींची नोंद घेऊन कार्यवाही करावी व तसा अहवाल आपणास सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिल्या.

पाणीसाठ्यांचे पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याला

जिल्ह्यांमधील पाणीसाठे हे प्रथमत: पिण्याच्या पाण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करत असेल तर त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याच्या पाण्यासाठी निधी तसेच आवश्यक तेथे बोअरवेलची संख्या वाढविण्यात यावी. जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे आणि आवश्यकतेनुसार जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, टंचाईनिवारणाच्या तातडीच्या उपाययोजनांवर 48 तासांच्या आत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

धुळे जिल्ह्यांतील मधुकर पाटील, वालचंद पवार, विलास शिंदे, गुलाब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मीराबाई पाटील, योगेश पाटील, महादू राजपूत, बाळासाहेब रावल आदी सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरुन थेट संवाद साधला.

यावेळी मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, पदुम विभागाचे सचिव अनुपकुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळ निवारणासाठी धुळे जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजना

धुळे जिल्ह्यामध्ये खालील 3 तालुक्यामध्ये टॅंकर सुरु आहे.
तालुक्याचे नाव
टॅंकरची संख्या
1. सिंदखेडा
16
2. धुळे
11
3. साक्री
4
                            एकूण
31

· सिंदखेडा तालुक्यात सर्वात जास्त 16 टॅंकर सुरु असून साक्री तालुक्यात सर्वात कमी 4 टँकर सुरु आहेत.
· पिण्याच्या पाण्याचा टंचाई निवारणार्थ आजअखेर धुळे जिल्ह्यांतील एका नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करुन 9 तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन 145 विहिरीचे अधिग्रहण करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.
·पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची रु.3.36 कोटी इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. सर्व नळ पाणीपुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
· धुळे जिल्ह्यांतील दुष्काळ घोषित केलेल्या 3 तालुक्यातील 451 गावातील 1 लाख 55 हजार 628 इतक्या शेतकऱ्यांना रु. 122.11 कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आली आहे.
· धुळे जिल्ह्यातील एकूण 29 हजार 247 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी रु. 6.44 कोटी अदा करण्यात येणार असून त्यापैकी रु. 6.40 कोटी इतकी रक्कम 7 हजार 181 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.
· प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यांतील 1.90 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 46 हजार शेतकऱ्यांना रु. 2000 /- प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रु. 9.20 कोटी इतके अर्थसहाय देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.
· महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यांत 1 हजार 733 कामे सुरु असून त्यावर 4 हजार 109 मजूर उपस्थिती आहे. सर्वात जास्त 1 हजार 379 मजूर सिंदखेडा तालुक्यात असून सर्वात कमी 664 मजूर उपस्थिती साक्री तालुक्यात आहे. जिल्ह्यामध्ये 13 हजार 899 कामे शेल्फवर आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget