पिण्याच्या पाण्याच्या योजनांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

• शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची दिली ग्वाही

• ऑडिओ ब्रीज च्या माध्यमातून साधला चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद

मुंबई ( १३ मे २०१९ ) : नादुरुस्त असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांची तत्काळ दुरुस्ती करावी. तसेच ज्या पाणीपुरवठा योजना थकित वीज देयकामुळे बंद आहेत अशा योजनांची वीज देयके भरून जिल्हा प्रशासनाने या योजना पुन्हा सुरु करुन पाणी पुरवठा सुरळित करावा असे आदेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी आज ऑडिओ ब्रीज च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांशी संवाद साधला.

शासन दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून 2018 च्या लोकसंख्येप्रमाणे लोकांना आणि त्या संख्येप्रमाणे जनावरांना लागणारे अतिरिक्त पाणी, रोजगार हमी योजनेअंतर्गत हाताला काम तत्काळ उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

या सर्व सूचना, तक्रारी आणि मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी स्वत: नोंद घेतली आणि जिल्हा प्रशासनाला या सर्व मागण्यांवर, तातडीच्या उपाययोजनांवर तत्काळ काम करून अहवाल पाठविण्यासंदर्भात सूचना दिल्या. ते म्हणाले, जिल्हा प्रशासनाने आवश्यकते प्रमाणे गुरांच्या छावण्या सुरु करणे, पिण्याच्या पाण्याकरिता नियमित वीज पुरवठा होईल याची दक्षता घेणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत ३ दिवसात कामे मंजूर करून लोकांच्या हाताला काम देणे, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे यावर गांभीर्याने कार्यवाही करावी. गाळमुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत जलसंधारण प्रकल्पांमधील गाळ काढण्यासाठी तहसीदारांनी मंजूरी द्यावी.

मुख्यमंत्र्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल कामासाठी लवकरच निधी वितरित करण्यात येत असल्याची माहिती दिली. दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांनी गावात जलसंधारणाची कामे मोठ्याप्रमाणात हाती घ्यावेत, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

चंद्रपूर जिल्ह्यात जुन्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करून त्या सुरु करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, जिल्ह्यात आवश्यकता आहे तिथे टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा, पाईपलाईनची दुरुस्ती, विंधन विहिरींची कामे, याकडे तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे ३ दिवसात सुरु होतील, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. माजी मालगुजारी तलावांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

चिमुर तालुक्यातून सरपंच विनोद चाफळे यांनी यांनी गावात नदीवर कुठेच बंधारा नाही, सगळं पाणी वाहून जाते, गावचा पाणी साठा वाढवायचा असेल तर नदीवर बंधारा बांधण्यास मान्यता द्यावी अशी मागणी केली असता दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये आपल्या सूचनेचा नक्की विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चिमूर तालुक्यातून ममता गायकवाड या महिला सरपंचानी जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीची मागणी केली. त्यावर जीवनप्राधिकरणाने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

जिल्ह्यातून आज आलेल्या सुचनांमध्ये नागभीड तालुक्यातील सरपंच राजीव रामटेके यांनी पाणी आहे, मुख्यमंत्री पेयजल योजना लवकर सुरु करण्याबाबतची मागणी केली. उषा कोरे या राजुरा तालुक्यातील सरपंचांनी गावातील जलस्वराज्य योजना बंद असल्याचे व त्याची दुरुस्ती आवश्यक असल्याचे सांगितले. ब्रम्हपूरी तालुक्यातून सरपंच गोपळ ठाकरे यांनी पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरले नाही म्हणून योजना बंद पडल्याचे सांगितले. ब्रम्हपूरी तालुक्यातील सरपंच पुष्पा मोरे यांनी मंजूर नळ पाणी पुरवठा योजनेचे थोडेसे काम बाकी आहे, ते पूर्ण करून योजना लवकर सुरु करण्याची मागणी केली.. या सर्व सूचनांची नोंद घेऊन मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यास सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजना-
•          जिल्ह्यात 15 तालुके  त्यापैकी  चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, राजुरा सिंदेवाही या 5 तालुक्यात दुष्काळ जाहीर.
•          पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात आज 48 विंधण विहिरीद्वारे, 3 विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत.
•          पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची 1.63 कोटी रु च्या वीज देयकांची रक्कम महा वितरण कंपनीस अदा.
•          जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 5 तालुक्यातील 760 गावातील 1 लाख 34 हजार 362  शेतकऱ्यांना 41.37 कोटी रुपयांची  रक्कम वितरित.
•          जिल्ह्यात 49 हजार 726 शेतकऱ्यांची पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी. या हंगामात नुकसान भरपाई पोटी 4.85 कोटी इतकी रक्कम  अदा करण्यात येणार आहे. त्यापैकी 54.69 लाख इतकी रक्कम 547 पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली. 
•          प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात 1.91 लाख शेतकऱ्यांची नोंदणी.  त्यापैकी 36 हजार 313  शेतकऱ्यांना 2 हजार याप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी 7.26 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. 
•          उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू.
•          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 1116 कामे सुरू.  त्यावर 19 हजार 619 मजुरांची उपस्थिती. जिल्ह्यात 13 हजार 532 कामे शेल्फवर.

या संवाद सेतूमध्ये मुख्य सचिव अजोय मेहता, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, यांच्यासह प्रशासनातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक सहभागी झाले होते.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget