मुंबईतील पुलांबाबत मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबईतील पुलांच्या दीर्घकालीन आयुष्यमानासाठी अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( १२ जून २०१९ ) : मुंबईत बांधण्यात येणारे पादचारी, वाहतूक आणि रेल्वे पुलांचे आयुष्यमान दीर्घकालीन असावे यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करावा. सध्या ज्या भागातील पूल, रस्ते वाहतुकीस बंद आहेत त्याबाबत व पर्यायी मार्गांची माहिती देण्याकरीता मोबाईल ॲप तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिल्या.

वर्षा निवासस्थानी मुंबईतील धोकादायक पुलांच्या कामाबाबत आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशीष शेलार, राज पुरोहीत, अमीत साटम, महापालिका आयुक्त प्रविण परदेशी आदी उपस्थित होते.

विविध प्रशासकीय यंत्रणांमार्फत मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पुलांचे काम केले जाते. अशावेळी हे बांधकाम केवळ 30 ते 35 वर्ष टिकणारे नसावे तर त्याहून अधिक काळ ते टिकतील अशी रचना करावी त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी.

सध्या मुंबईतील जे रस्ते, पुल नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत त्याबाबत नागरिकांना माहिती होईल यासाठी जागोजागी मार्गदर्शक फलक लावावेत. पुलाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत माहिती फलक लावून नागरिकांना द्यावी. तसेच दुरूस्तीमुळे ज्या पुलावरून अथवा रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

ज्या भागात ठराविक बाजारपेठेच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते तेथे ठराविक अंतरावर वाहनतळाची व्यवस्था करावी. तेथून नागरिकांना बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी वाहतुकीची सुविधा निर्माण करावी जेणेकरून वाहतूक कोंडीचा ताण कमी होण्यास मदत होईल. आवश्यकता भासल्यास बेस्ट बसच्या प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुंबईत एकूण 344 पूल असून त्यातील 314 पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील आहेत तर 30 पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाच्या अखत्यारीतील आहेत. त्यातील 29 पूल स्ट्रक्टर ऑडीट नंतर बंद करण्यात आले आहेत. 92 पूल सुस्थितीत असून 116 पुलांची किरकोळ दुरूस्ती करण्यात येत आहे. तर 67 पुलांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती सुरू आहे. मध्य रेल्वे मार्फत 199 पुलांचे सर्वेंक्षण करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षात मध्य रेल्वेमार्फत 68 तर पश्चिम रेल्वे मार्फत 32 पादचारी पुल नव्याने बांधण्यात आले आहेत.

घाटकोपर आणि जुहू तारा रोड या दोन पुलांची आयआयटी आणि व्हीजेटीआय मार्फत पुनर्तपासणी करण्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही पूल वाहतुकीस खुले केले जातील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीस मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यासह मध्य रेल्वेचे मंडल महाप्रबंधक संजयकुमार जैन आणि पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिल गुहा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मुख्य अभियंता उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget