डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना डि. लिट पदवी प्रदान

मुंबई, दि. ३० : आपले हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी चीन, रशिया, युक्रेन आदी देशांमध्ये जातात. आपल्या विद्यापीठांपेक्षा तेथील वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे अधिक सोपे असल्याचे दिसते. हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियाही कशी सुलभरित्या होईल याबाबत विचार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चौथा विशेष पदवी प्रदान समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति – कुलपती गिरीष महाजन, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव कालिदास चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कुपोषणमुक्ती, आरोग्य आदी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना आज विद्यापीठाच्या वतीने डि. लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना यावेळी सन्मानचिन्ह देण्यात आले.

राज्यपाल राव म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात गरीब आणि आदिवासी बांधवांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे आणि त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी बंग दाम्पत्याने केलेले कार्य फार मोठे आहे. मागील चार दशकांपासून आदिवासी भागात राहून ते काम करीत आहेत. वैद्यकीय पेशा स्वीकारताना घेतलेल्या शपथेचे तंतोतंत पालन करुन त्यांनी मानवतेसाठी काम केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

आपले विद्यार्थी शिकण्यासाठी दुसऱ्या देशातील विद्यापीठांमध्ये जाण्यापासून रोखण्याबरोबरच दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांकडे आकर्षित करणे हे आपले ध्येय असले पाहीजे. आपल्या विद्यापीठांनी या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहन राव यांनी यावेळी केले.

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये निर्माण होणारे तणावाचे प्रसंग हे चिंता करायला लावणारे आहेत. डॉक्टरांचा रुग्णांशी होणारा संवाद सुधारुन वैद्यकीय पेशा अधिक मानवतावादी होण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. डॉक्टर आणि रुग्णांमधील संबंध विश्वासाचे असले पाहीजेत. पीडीत लोकांसाठी दयेने काम केल्यास हे संबंध निश्चितच चांगले राहतील. वैद्यकीय पेशाचे शिक्षण देताना याबाबतही शिक्षण देणे गरजेचे आहे, असे राव म्हणाले.

२०११ च्या जनगणनेनुसार देशात ६० वर्षांवरील १०४ दशलक्ष इतके ज्येष्ठ नागरीक आहेत. २०५० पर्यंत देशात ३४० दशलक्ष ज्येष्ठ नागरीक असतील असा अंदाज आहे. अमेरीकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ही लोकसंख्या अधिक असेल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या बाबीचा विचार करुन ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्याविषयी धोरण ठरविले पाहिजे. पुढील काळात ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्य समस्यांवर आपणास विशेष लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असून त्यांच्यासाठी विशेष रुग्णालये आदी बाबींचा विचार करावा लागेल, असेही राव यांनी सांगितले.

डॉ. बंग दाम्पत्याने मानसिकता बदलाचे काम केले - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बंग दाम्पत्याने जे जे उपक्रम राबविले त्यात त्यांनी लोकांमधील समज - गैरसमज दूर करुन मानसिकता बदलाचे काम केले. मागील दोन वर्षांपासून त्यांनी तंबाखूमुक्त जिल्ह्याचा उपक्रम अनोख्या पद्धतीने राबवला. बाल मृत्यूदर, माता मृत्यूदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, आदिवासींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे यासाठी बंग दाम्पत्याने केलेले कार्य मोठे आहे. त्यांनी या क्षेत्रात केलेले काम आणि संशोधन यातून शासनालाही मार्गदर्शन मिळत राहीले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून त्यांनी आदिवासींमध्ये विश्वास निर्माण केला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले, कुपोषणमुक्ती, दारुबंदी, तंबाखूमुक्ती आदी विविध क्षेत्रात बंग दाम्पत्याने केलेल कार्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहे. शासनालाही त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहीले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आज डि. लिट पदवीने त्यांचा सन्मान केल्याने या पदवीचाही सन्मान झाला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी या बहुमानाबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. डॉ. अभय बंग म्हणाले, गडचिरोली हे माझे जीवन विद्यापीठ आहे. तेथील आदिवासींची सेवा करताना आरोग्यविषयक जे शिक्षण मला मिळाले त्यावर आज डि. लिट पदवी देऊन विद्यापीठाने शिक्कामोर्तब केले आहे. यापुढील काळातही सेवाकार्य अधिक जोमाने करण्यास यातून प्रेरणा मिळाली आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget