पराक्रमी वाघाचा प्रदेश म्हणून महाराष्ट्राची ओळख करूया : ना.परिणय फुके

व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

चंद्रपूर दि.29 जुलै : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशांमध्ये 2 हजार 967 वाघ असल्याचे जाहीर केले आहे. आज जागतिक व्याघ्र दिनाला वन्यजीव, वनांवर प्रेम करणाऱ्या निसर्ग प्रेमींच्या साक्षीने पराक्रमाच्या गाथा लिहिणाऱ्या महाराष्ट्राची ओळख पराक्रमी वाघांचा प्रदेश म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राज्याचे वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी आज येथे केले. वन्यजीव, वृक्ष लागवड, व्याघ्र संवर्धन करणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थित वनविभागाच्या विविध पुरस्कार मान्यवरांना बहाल करताना ते बोलत होते.

चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहांमध्ये आज जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने अभिमान महाराष्ट्राचा हा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ताडोबा राज्यांमध्ये सर्वाधिक वाघांचा प्रदेश व या प्रदेशात आलेल्या महाराष्ट्रातील विविध भागातील वनावर प्रेम करणाऱ्या मान्यवरांना यावेळी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी संबोधित केले. राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.

आजच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 व संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट गावांना देखील पुरस्कार देण्यात आला. याशिवाय वन विभागातर्फे आयोजित विविध पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नानाभाऊ शामकुळे, पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक यु.के. अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, वनविभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एस. वि.रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.

यावेळी संबोधित करताना परिणय फुके यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व्याघ्र संवर्धन संदर्भात सुरू झालेल्या अभियानाला भारतात उत्तम प्रतिसाद मिळत असून यासाठी भारताचे कौतुक जागतिक स्तरावर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील व्याघ्र संवर्धन संदर्भात महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असून महाराष्ट्रात आजमितीला 312 वाघ आहेत. भारतात ही संख्या 2967 आहे. सर्वाधिक नागपूर परिसरात वाघ असून देशाचे टायगर कॅपिटल म्हणून नागपूरला यापुढे नाव लौकिक मिळावा, असे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावेळी संबोधित करताना व्याघ्र दिनाला वाघांची संख्या वाढत असल्याचे समाधान असले तरी मानव व वन्यजीव संघर्ष हा नवा चिंतेचा मुद्दा पुढे आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतिशय मोजक्या जागेमध्ये वाघांची संख्या वाढत असून यापूर्वी विदर्भातील विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करून वाघांना आपला परिसर बहाल केला आहे. अनेक गावांचे पुनर्वसन या परिसरात झाले आहे. त्यामुळे आज ही वाघांची संख्या बघायला मिळत आहे. त्यामुळे आज
जागतिक व्याघ्र दिनाला वाघांची संख्या वाढत असतानाच अन्नसाखळीतील या सर्वोच्च प्राण्याचे संरक्षण करताना राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प परिसरातील समस्यांवर देखील चिंतन करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गेल्या या पाच वर्षांमध्ये वनविभागाने विविध पातळीवर लक्षवेधी काम केले असल्याचे सांगितले. सर्वात मोठी 62 लाखांची हरित सेना त्यांच्या मार्गदर्शनात निर्माण झाली असून 50 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टापैकी आज रोजी 17 कोटी 10 लक्ष वृक्ष लागवड उद्दिष्ट आम्ही आज पूर्ण केले असल्याचे त्यांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.

आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील यावेळी संबोधित केले. वाघांच्या हल्ल्यात ठार होणाऱ्या कुटुंबाचे दुःख जाणणारा मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव घ्यावे लागेल. व्याघ्र संवर्धन करतानाच या परिसरातील पुनर्वसित नागरिकांना समजून घेणारा वनमंत्री राज्याला मिळाला असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या अनुपस्थितीत आज राज्यभरातून आलेल्या व्याघ्र प्रेमी व वनप्रेमी जनतेचे त्यांनी स्वागत केले. चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर यांनी देखील यावेळी संबोधित केले. चंद्रपूर आणि वाघ यांचे नाते चिरायू असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत वनव्यवस्थापन राबविणाऱ्या उत्कृष्ट गावांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मांजर सुभा या नाशिक वनवृत्ततील अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्याच्या गावाला प्रथम पुरस्कार देण्यात आला. नासिक वन वृत्तातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील गौरीपाडा महाजे व औरंगाबाद वनवृत्तातील हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील येलदरी गावाला द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. कोल्हापूर वनवृत्तातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निढळ या
गावाला व ठाणे वनवृत्तातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दहागाव या गावाला तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला. तर औरंगाबाद वनवृत्तातील लातूर जिल्ह्यातील एकुरगा या गावाला मराठवाडा प्रशासकीय विभागाचे बक्षीस देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 साठी संपूर्ण राज्यातून व्यक्तिगत पुरस्कारासाठी पुणे विभागातून रानमळा प्रकल्पाचे प्रणेते पोपट तुकाराम शिंदे तालुका खेड जिल्हा पुणे यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. पुणे विभागातूनच द्वितीय पुरस्कार मुक्काम पोस्ट पुसेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील मनोज वसंत फरतडे यांना देण्यात आला. तर तृतीय पुरस्कार वर्धा येथील प्रसन्ना अविनाशराव बोधनकर यांना देण्यात आला. याशिवाय यावेळी ग्रामपंचायत शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था व ग्राम विभाग व जिल्हा स्तरावरील पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले. याशिवाय आंतरशालेय स्पर्धा मधील सहभागी विद्यार्थ्यांचे देखील यावेळी पुरस्कार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन रेणुका देशकर यांनी केले. आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी शातनिक भागवत यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत उपविभागीय वन अधिकारी राम धोत्रे, अशोक सोनकुसरे व वनविभागाच्या अन्य अधिकाऱ्यांनी केले.

कार्यक्रमाच्या पूर्वी ताडोबामधील जिप्सी चालक व गाईड यांनी रॅली काढून व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget