पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यात स्टँड अप कॉमेडी स्पर्धा

मुंबई ( १० जुलै २०१९ ) : ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. पु.लं.च्या साहित्यावर आधारित स्टँड अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर पात्र ठरणाऱ्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील विनोदी कलावंतांचे टॅलेंट हंट करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने राज्य शासन करणार आहे. लवकरच या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय फेऱ्यांना सुरुवात होणार असून, प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक अशी पारितोषिके घोषित करण्यात येणार आहेत. प्रथम आणि व्दितीय क्रमाकांना अनुक्रमे २० हजार आणि १५ हजार अशी रोख स्वरुपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत स्पर्धेचे आयोजन होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी ७५०६८४८०५५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ५ ते ८ मिनिटांचे आपले सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. या स्पर्धेचा अंतिम सोहळा येत्या २४ ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे रंगणार आहे.

विनोद हा 'पुलं'च्या साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समाजातील माणसांच्या वृत्तींवर आपल्या खुमासदार शैलीत 'पुलं'नी कायम भाष्य केले. स्टँड अप कॉमेडी ही स्पर्धा देखिल अशाच स्वरुपाची होणार आहे. एखाद्या वृत्तीवर, माणसाच्या स्वभावावर दैनंदिन व्यवहारी जीवनात घडणाऱ्या प्रसंगांवर मिश्कील टिप्पणी करत त्यातील विनोद सर्वांसमोर आणण्याचा प्रकार अनेक स्टँडअप कॉमेडियन करतात. सध्या तरुणाईत हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे. याच धर्तीवर पुलंचे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित केली आहे. या स्पर्धेदरम्यान सर्व जिल्हा केंद्रांवर पु.ल. जत्रोत्सवही आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पुलंचे साहित्य, त्यांची भाषणे, त्यांचे कार्यक्रम अनुभवण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे. या संपूर्ण उपक्रमाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवरून केले जाणार असून, कलावंतांची कला महाराष्ट्रभर पोहोचावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील शहरी; तसेच ग्रामीण भागातील विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने ही स्पर्धा राबवण्यात येत आहे.या स्पर्धेस प्रतिसाद देण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे यांनी केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget