सुरेश वाडकर, राजीव नाईक आणि सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

समीहन कशाळकर यांना ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कार’

झाकीर हुसेन ठरले ‘अकादमी रत्न’

नवी दिल्ली ( १६ जुलै २०१९ ) : प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि प्रसिध्द अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष 2018 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्रीय गायक समीहन कशाळकर यांची उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे तर, तबला नवाज झाकीर हुसेन यांना ‘अकादमी रत्न’ ही मानाची फेलोशीप जाहीर झाली आहे.

कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणा-या संगीत नाटक पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. ‘वर्ष २०१८ च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी’ देशभरातील 40 कलाकारांची तर ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ’ युवा पुरस्कारासाठी 32 कलाकारांची निवड करण्यात आली आहे. चार कलाकारांना उल्लेखनीय योगदानासाठी ‘अकादमी रत्न’ ही फेलोशीप जाहीर झाली आहे.

सुरेश वाडकर यांच्या सुगम संगितातील योगदानाची दखल

‘मेघारे मेघारे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी…’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यामुळे चाहत्यांच्या मनावार गारुड करणारे प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना सुगम संगितातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. यासोबतच त्यांनी भोजपुरी, कोकणी,मल्याळी ,गुजराती,बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.
नाटय क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द नाटककार राजीव नाईक यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांनी मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाईक यांनी लिहीलेली ‘अनाहत’, ‘वांधा’, ‘अखेरचं पर्व’, ‘साठेंच काय करायचं’ आदी नाटके प्रसिध्द आहेत. राजीव नाईक लिखीत ‘नाटकातलं मिथक’, ‘खेळ नाटकाचा’, ‘नाटकातला काळ आणि अवकाश’ ,‘न नाटकाचा’ आदी पुस्तके नाटकाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहाश जोशी यांना नाटय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी संगीत नाटक आकदमी पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. १ लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

तबला नवाज झाकीर हुसेन यांना अकादमी रत्न पुरस्कारअवघ्या जगाला तबल्याच्या तालात बांधाणारे भारतीय शास्त्रीय संगीताला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवणारे तबलानवाज उत्साद झाकीर हुसेन यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीचा अकादमीची मानाची ‘अकादमी रत्न’ फेलोशिप जाहीर झाली आहे. ३ लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समीहन कशाळकर यांना ‘युवा पुरस्कार’

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक व पंडीत उल्हास कशाळकर यांचे पूत्र समीहन कशाळकर यांना २०१८ चा ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ’ युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. 25 हजार रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दरवर्षी एका शानदार सोहळयात राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फेलोशीप प्रदान करण्यात येते.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget