आश्रमशाळेतील मुलांना मिळणार इंग्रजीतून धडे

मुंबई, दि. 28 : आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. उईके म्हणाले, पहिल्या टप्प्यात 50 शासकीय आश्रमशाळांमध्ये पहिली इयत्तेपासून इंग्रजी आणि सहावी इयत्तेपासून सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षणाचे धडे गिरवले जाणार असून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षण उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग सोपा होणार आहे.

महाराष्ट्रातील दुर्गम भागात आदिवासींच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत 502 शासकीय आश्रमशाळा सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्यात येते. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. या शाळेत विद्यार्थ्यांना पहिली ते बारावी शिक्षण मोफत देण्यात येते. या योजनेअंतर्गत 179 शाळांमध्ये 54 हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.

गेल्या काही वर्षात आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आदिवासी पालकांचा कल वाढला आहे. यासाठी विभागामार्फत सुरु असलेल्या शासकीय आश्रमशाळेतच आदिवासी विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आयएसओ मानांकन मिळालेल्या किंवा इतर चांगल्या शासकीय आश्रमशाळांचे रुपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्यात येणार आहे. यासाठी सदर आश्रमशाळेत करडी पथ उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. त्याशिवाय शाळा इमारत, वसतिगृह, वीज, दळणवळण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, क्रीडांगण अशा मुलभूत सुविधा असलेल्या आश्रमशाळा इंग्रजी माध्यमासाठी निवड करण्याचे प्रस्तावित आहे. यानुसार 2019-20 या वर्षात शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना पहिली इयत्तेपासून इंग्रजी माध्यमात प्रवेश घेता येणार आहे. तसेच इयत्ता सहावीपासून गणित आणि विज्ञान विषय मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून शिकता येणार आहेत. यात ठाणे जिल्ह्यात 7, नाशिक जिल्ह्यात 26, अमरावती जिल्ह्यात 13, नागपूर जिल्ह्यात 13 आश्रमशाळेत इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरु करण्यात येणार आहे.

या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले पदवीधारक उमेदवार यांची शिक्षक म्हणून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत शिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करून गुणवत्ता धारक शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

शासकीय आश्रमशाळेचे इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्यात येत असल्याने भविष्यात उच्च शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थी मागे राहणार नाहीत. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण घेणे सोपे होणार आहे. यामुळे शिक्षणाच्या वाढत्या स्पर्धेत ते स्वतःला सिद्ध करू शकतील असे डॉ. उईके यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा उपस्थित होते.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget