शिरोळ, इचलकरंजी, अंबेवाडी, कोल्हापूर परिसराला केंद्रीय पथकाची भेट

कोल्हापूर ( ३० ऑगस्ट २०१९) : डॉ .व्ही. थिरुपुगाझ यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, भैरेवाडी, इचलकरंजी, अंबेवाडी, कोल्हापूर परिसरातील महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी दरम्यान पथकाने आपत्तीग्रस्तांशी संवाद साधत झालेल्या घरांच्या पडझडीची, यंत्रमाग व्यवसायाची, शेत पिकाची माहिती घेतली.

सह सचिव तथा केंद्रीय पथक प्रमुख डॉ .व्ही. थिरुपुगाझ यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग, अव्वर सचिव व्ही.पी.राजवेधी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे अधीक्षक अभियंता संजय जयसवाल या सदस्यांचे पथक आज सकाळी 11 च्या सुमारास शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे दाखल झाले. महापुरामुळे वाहून गेलेली जमीन, पिकांचे झालेले नुकसान आणि महावितरणचे झालेल्या नुकसानीची पाहणी या पथकाने याठिकाणी केली. आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी यावेळी माहिती दिली.

यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, घालवाड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र अर्जुनवाडची पाहणी केली. महापुरामुळे उपकेंद्रामधील नुकसान झालेल्या साहित्यांची पाहणी करुन येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. अर्जुनवाड मधील घर पडलेल्या कुमार कोळी, दशरथ कोळी, सदाशिव वाणी यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. येथील दलित वस्तीमध्येही पडझड झालेल्या घरांची या पथकाने भेट देवून माहिती घेतली. सरपंच विकास पाटील यांनी यावेळी पथकाला माहिती दिली. पडलेल्या अंगणवाडी इमारतीचीही पाहणी केली.

शिरोळ मधील घर पडलेल्या गुंडू मुजावर, हणमंत काळे यांच्याशी पथकाने संवाद साधत वस्तुस्थितीची माहिती घेतली. यानंतर नृसिंहवाडी येथील नुकसान झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी पथकाने केली. महापुरामुळे आरोग्य केंद्रातील नुकसान झालेल्या साहित्याची माहिती घेतली. प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार गजानन गुरव यांनी यावेळी पडझड झालेल्या घरांची त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेची माहिती दिली. कुरुंदवाड मधील भैरेवाडी येथील चंद्रकांत आलासे, संजय आलासे यांच्या नुकसान झालेल्या यंत्रमाग कारखान्याला भेट दिली. महम्मद बागवान यांच्या सोयाबीन पिकाचे महापुरामुळे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यांच्याशीही पथकाने संवाद साधला. शेतकरी आनंद पाटील, शिवप्रभु आवटी यांच्या ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी यावेळी नुकसान झालेल्या पिकाची माहिती दिली.

इचलकरंजी येथील अवधुत आखाडा येथील यंत्रमाग कारखान्याला या पथकाने भेट देवून तसेच महावितरणच्या आवाडे उपकेंद्राच्या नुकसानीची पाहणी केली. हातकणंगले तहसिलदार सुधाकर भोसले यांनी यावेळी त्यांना माहिती दिली. यानंतर हे पथक राजाराम बंधाऱ्याची पाहणी करुन केर्ली-रत्नागिरी वाडी रस्त्याच्या पाहणीसाठी तसेच दुसरे पथक आंबेवाडी येथील नुकसानीची पाहणीसाठी गेले. केर्ली-वाडी रत्नागिरी येथील महापुरामुळे खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी यावेळी महापुरामुळे झालेल्या रस्त्यांच्या नुकसानीची माहिती दिली.

आंबेवाडी येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करुन त्यांनी आपत्तीग्रस्तांशी संवाद साधला. चिखली येथील डेअरी पाणंद रस्त्यावरील झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच आंबेवाडी-वडणगे मार्गावरील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, गट विकास अधिकारी सचिन घाडगे, तहसिलदार सचिन गिरी यांनी यावेळी माहिती दिली.

शिवाजी पुल ते गंगावेश या दरम्यानचा उखडलेल्या रस्त्याची पाहणी या पथकाने केली. पंचगंगा हॉस्पिटल, कुंभार गल्ली येथील झालेले नुकसान त्याचबरोबर नुकसान झालेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह आणि महावीर गार्डन येथील नुकसानीची पाहणी केली. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. आजच्या या केंद्रीय पथक दौऱ्यात अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, करवीरचे पोलीस उप अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आजच्या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget