महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी त्रिसदस्यीय समिती - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

मुंबई ( १३ ऑगस्ट २०१९) : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात येत असून ही समिती महामंडळाच्या विकासासाठी सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करेल. व त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिले.

मंत्रालयात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कामकाजाबद्दल कृषीराज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खते, कीटकनाशके, कृषी अभियांत्रिकी, खाद्य प्रक्रिया व रिक्त पदे याबाबतचा आढावा घेण्यात आला.

कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, या त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीमध्ये निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कृषी उद्योग क्षेत्रातील अनुभव असणारी व्यक्ती व कृषी अन्न व खाद्य प्रक्रियेतील अनुभवी व्यक्ती यांचा समावेश करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत संत्र, आंबा,अननस व टोमॅटो यांच्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थांचे उत्पादन केले जाते. या उत्पादनांना कॅन्टीन स्टोअर्स, एअर इंडिया, वेगवेगळ्या तारांकित हॉटेल्स, शासकीय संस्था तसेच खुल्या बाजारात प्रचंड मागणी आहे. त्याचबरोबर महामंडळामार्फत खते, कीटकनाशके यांसारखी कृषी उत्पादके व यंत्रसामुग्री उत्तम दर्जात व वाजवी दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी व महामंडळाचा सार्वत्रिक विकास करण्यासाठी ही समिती नेमण्यात येणार असून त्याचा शेतकऱ्यांना व महामंडळाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बैठकीस महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक करंजकर, संचालक सी. आर. लोही तसेच कृषी विभागाचे व महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget