पूरबाधित गावात स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना करण्यासाठी पथकांची नियुक्ती

सांगली ( १२ ऑगस्ट २०१९) : सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विषयक समुचित उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद अधिनस्त विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असलेली पथके नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले, पूरपरिस्थिती पश्चात करावयाच्या उपाययोजनांमध्ये पूर्वतयारी व नियोजनामध्ये गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायतस्तरीय विविध संस्थांचे विविध पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून गावांमध्ये करावयाच्या स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजनांचे प्राथमिक नियोजन करण्यात येत आहे. यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शिक्षक, युवा मंडळे, महिला बचत गट, अन्य स्वयंसेवक यांचे पथक तयार करून बाहेरून आलेल्या स्वयंसेवकांसोबत समन्वय साधण्यात येत आहे. गावफेरी व स्थळ पाहणी करून करावयाच्या कामांचा अंदाज बांधून त्यासाठी आवश्यक साहित्य, यंत्र सामग्री, मनुष्यबळ इत्यादींचा अंदाज बांधणे, त्याचप्रमाणे कचरा, मृत जनावरे यांची विल्हेवाट लावण्यासाठी गावाबाहेर सर्व संमतीने सुयोग्य जागा निवडणे. ही जागा पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून दूर असावी. जे. सी. बी., ट्रॅक्टर, घंटागाडी, फावडे, पाट्या, झाडू, दोर, हूक तसेच मीठ, चुना, टी. सी. एल., मेडीक्लोअर, फॉगिंग मशिन, हॅण्ड ग्लोव्हज, गम बूट, मास्क व अन्य आवश्यक सामग्री उपलब्ध करून घेण्यात येत आहे.

गावांची स्वच्छता करण्यासाठी तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्यात, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, जे. सी. बी., ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमा झालेला कचरा गावांबाहेर सुयोग्य ठिकाणी जमा करून योग्यरीतीने (मातीआड करून/पुरून) त्याची विल्हेवाट लावावी. डस्टींग पावडर फवारणी तसेच फॉगिंग करावे. पाणी शुध्दीकरणासाठी टी. सी. एल. पावडरचा योग्य वापर करावा. ओ. टी. घेवून पाणी नमुने तपासणी करावी, मेडीक्लोअरचे वाटप करावे, गावांतील सर्व नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, आजारी जनावरांचे औषधोपचार करून घ्यावेत, पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने मृत जनावरांची सुयोग्य ठिकाणी शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी. स्थानिक परिस्थितीनुसार चारा / पशुखाद्य उपलब्ध होण्याबाबत समन्वय साधावा. घरांमध्ये जावून स्वच्छता, आरोग्य याबाबत प्रबोधन करावे, घर व परिसराची स्वच्छता करावी, पाणी उकळून प्यावे, आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपायोजना याबाबत माहिती द्यावी. सार्वजनिक व खाजगी इमारतींची, घरांची पाहणी करून त्या धोकादायक नसल्याची खात्री करावी व त्याबाबत यथास्थिती अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget