(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हजारो लोक अंधेरीत रस्त्यावर उतरले, पण हसत-खेळत! | मराठी १ नंबर बातम्या

हजारो लोक अंधेरीत रस्त्यावर उतरले, पण हसत-खेळत!

बी हॅप्पी रस्ता महोत्सवाला आबालवृद्धांचा अतिप्रचंड प्रतिसाद

रस्त्यावर घडवलं योग, नृत्य, क्रिडा कौशल्यांचं प्रदर्शन


मुंबई ( २१ जानेवारी ) : अंधेरी पश्चिम इथल्या लोखंडवाला बॅकरोडवर आज अक्षरश: हजारो लोक रस्त्यावर उतरले खरे, पण कुणाच्या तरी विरोधात निषेधाच्या घोषणा द्यायला नव्हे तर, हसत-खेळत-बागडत रस्त्यावर धमाल करण्यासाठी. निमित्त होतं ‘बी हॅप्पी’ रस्ता महोत्सवाचं. रविवारी सकाळी सात ते दहा या तीन तासांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘बी हॅप्पी रस्ता महोत्सवा’साठी विशेष परवानगीद्वारे लोखंडवाला बॅक रोड वाहनमुक्त ठेवण्यात आला होता.

रविवारच्या सकाळी बिछान्यात उशीरापर्यंत लोळण्याचा शिरस्ता मोडत हजारो मुंबईकरांनी, विशेषत: अंधेरीवासीयांनी ‘बी हॅप्पी रस्ता महोत्सवा’ला आवर्जून हजेरी लावली. सकाळी सात वाजल्यापासूनच शेकडो लहान-तरुण मुलं मुली या रस्त्यावर मनमुराद सायकलिंग करत होते, स्केटिंग करत होते. रस्त्यावरच कुठे एका बाजूला मित्र-मैत्रिणींचा एखादा घोळका कॅरम किंवा बुद्धिबळ खेळत होता, तर दुसरीकडे मुलं बॅटमिंटन, फुटबाॅलही खेळत होती. ज्येष्ठ नागरिक योगासनं शिकत होते, तर काही उत्साही तरुण व्यायाम करत होते. कुणी नाचत होतं, कुणी गात होतं, विनोद सांगून इतरांना हसवत होतं. 'बी हॅप्पी रस्ता महोत्सव' आयोजित करणा-या 'बी हॅप्पी फाऊण्डेशन'च्या विश्वस्त शालिनी ठाकरे यांनी नागरिकांच्या या प्रचंड प्रतिसादाविषयी आनंद व्यक्त केला.

“एरवी आपल्याला फेरीवाल्यांमुळे तसंच वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यांवर धड चालताही येत नाही. म्हणून लहान मुलांना, तरुण-तरुणींना तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही रस्त्यावर फिरण्याचा, मनसोक्त खेळण्याचा, चित्र काढण्याचा, सायकल चालवण्याचा आनंद उपभोगता यावा यासाठी आम्ही हा रस्ता महोत्सव आयोजित केला होता. हजारो लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिल्यामुळे हा रस्ता महोत्सव यशस्वी झाला,” असं मत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केलं.
या रस्ते महोत्सवात उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध संस्थांच्या लहान मुलामुलींनी आपापल्या कलेचं दर्शन उपस्थितांना घडवलं. सर्वात चित्तवेधक सादरीकरण झालं ते आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम जिमनॅस्टगुरु पूजा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या चिमुकल्या जिमनॅस्टपटूंचे. उपस्थितांनी या छोट्या जिमनॅस्टचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. यावेळी उपस्थितांना निवृत्त कर्नल सुमिषा शंकर यांनी योगासनांचे तर अल्मास मर्चंट यांनी झुंबा नृत्याचे फिटनेससाठीचे महत्त्व सोदाहरण सांगितले. 'भाभी जी घर पर हैं' या मालिकेत 'मनमोहन तिवारी'ची भूमिका साकरणारा अभिनेता रोहताश गौड यांच्यासह अनेक सेलिब्रिटीही बी हॅप्पी रस्ता महोत्सवाला आवर्जून उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget