(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अग्निसुरक्षेच्या दृष्टीने महिन्याभरात ६२ आस्थापनांना 'सील' | मराठी १ नंबर बातम्या

अग्निसुरक्षेच्या दृष्टीने महिन्याभरात ६२ आस्थापनांना 'सील'

५ हजार ४६९ आस्थापनांची तपासणी, तर १ हजारपेक्षा अधिक ठिकाणी तोडकाम

३ हजारापेक्षा अधिक आस्थापनांना आय. आर., १ हजार ९६५ सिलिंडर्स जप्त

मुंबई ( ३० जानेवारी ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपहारगृहांची / आस्थापनांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने मोहिम स्वरुपात तपासणी दि. ३० डिसेंबर २०१७ पासून करण्यात येत आहे. याबाबत अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे प्राप्त माहितीनुसार गेल्या महिन्याभरात ५ हजार ४६९ उपहारगृहे / आस्थापना यांची तपासणी करण्यात आली. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या, अशा ६२ आस्थापना अथवा त्यातील काही भागावर अग्निसुरक्षा विषयक कायद्यातील 'कलम ८' नुसार 'सील' करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच तपासणी पथकाला १ हजारापेक्षा अधिक ठिकाणी आढळून आलेले अनधिकृत / वाढीव बांधकाम तात्काळ तोडण्यात आले. त्याचबरोबर काही प्रमाणात अनियमितता आढळून आलेल्या ३ हजारापेक्षा अधिक आस्थापनांना / उपहारगृहांना तपासणी अहवाल (Inspection Report) देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घेण्याबाबत बजावण्यात आले. याच तपासणी मोहिमेदरम्यान अनधिकृतपणे साठा करुन ठेवलेले १ हजार ९६५ गॅस सिलिंडर्स देखील जप्त करण्यात आले.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपहारगृहे / आस्थापनांमधील अनधिकृत / वाढीव बांधकामे, अग्निसुरक्षा विषयक बाबी, सिलिंडर्सचा अनधिकृत साठा यासारख्या विविध बाबींची तपासणी करण्यासह अग्निसुरक्षेची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे करण्यासाठी महापालिकेने ३० डिसेंबर २०१७ पासून मोहिम पद्धतीने कार्यवाही सुरु केली. यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ५२ स्वतंत्र चमूंचे गठन करण्यात येऊन त्यांच्यामार्फत ही तपासणी करण्यात आली. या प्रत्येक चमूमध्ये मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते, इमारत व कारखाने खाते आणि अतिक्रमण निर्मूलन खाते; या खात्यांमधील अधिकारी / कर्मचा-यांचा समावेश आहे.

या तपासणी मोहिमेदरम्यान महापालिकेच्या सर्व २४ विभागातील उपहारगृहे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मॉल्स, तळघर, गोदाम (Godown), रुग्णालये, नर्सिंग होम, औद्यागिक एकक (Industrial Unit), वाणिज्यिक आस्थापना (Commercial Establishment) इत्यादींची तपासणी करण्यात आली. यांतर्गत अग्निसुरक्षा विषयक अटींची पूर्तता योग्यप्रकारे होत असल्याची खातरजमा करण्यासोबतच आढळून आलेली अनधिकृत / वाढीव बांधकामे तोडण्यात आली.

वरीलनुसार करण्यात येणा-या तपासणी दरम्यान उपहारगृहातील / आस्थापनातील अग्निसुरक्षा विषयक बाबी नियमांनुसार असल्याची तपासणी महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे, तर आरोग्य विषयक बाबींची तपासणी सार्वजनिक आरोग्य खात्यातील संबंधितांद्वारे करण्यात आली. याव्यतिरिक्त संबंधित बांधकाम हे नियमांनुसार असल्याची तपासणी ही इमारत व कारखाने खात्यातील अभियंत्याद्वारे करण्यात आली. या तपासणी दरम्यान अनधिकृत किंवा वाढीव बांधकामे आढळून आल्यास, त्यावरील तोडकाम कारवाई ही प्राधान्याने अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे करण्यात आली. यानुसार महिन्याभरात १ हजारापेक्षा अधिक ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली.

या तपासणी मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींमध्ये प्रामुख्याने अग्निसुरक्षा विषयक उपकरणे सुस्थितीत नसणे, नियमांनुसार मोकळी ठेवणे आवश्यक असलेल्या जागी व जिन्यांमध्ये सामानाचा / कच्च्या मालाचा साठा करुन ठेवणे, बाहेर पडावयाचे मार्ग / दरवाजे (Exit Door) बंद असणे किंवा त्यात अडथळे असणे, अनधिकृत वाढीव बांधकामे असणे यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे.

याच महिन्याभराच्या कालावधीत मुंबई अग्निशमन दलांतर्गत असणा-या ३४ अग्निशमन केंद्रांसाठी एकूण ३४ 'अग्निसुरक्षा पालन कक्ष' देखील कार्यान्वित करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील आस्थापनांद्वारे अग्निसुरक्षा विषयक अटींची पूर्तता योग्यप्रकारे होत असल्याची तपासणी या कक्षांमार्फत केली जात आहे. ''आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम २००६'' च्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी हे कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

याच मोहिमेदरम्यान अग्निसुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ठरु शकणारे साहित्यदेखील मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. तसेच परवानगीपेक्षा अधिक सिलिंडर्सचा साठा आढळून आल्यास त्यावर देखील जप्तीची कारवाई करण्यात आली. यानुसार गेल्या महिन्याभरात १ हजार ९६५ सिलिंडर्स जप्त करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget