(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई होणार अधिक प्रभावी | मराठी १ नंबर बातम्या

अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई होणार अधिक प्रभावी

उपायुक्तांना १ टक्का; तर सहाय्यक आयुक्तांना ५ टक्के ठिकाणांची पाहणी आवश्यक

अधिक प्रभावी संनियंत्रणासाठी महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई ( २२ जानेवारी ) :बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई संदर्भात प्राप्त होणा-या तक्रारींबाबत आणि अनधिकृत बांधकामांवरील तोडकाम कार्यवाही अधिक प्रभावी व्हावी; यासाठी तोडकाम कारवाई झालेल्या ठिकाणांपैकी १ टक्का ठिकाणांना परिमंडळीय उपायुक्तांनी; तर ५ टक्के ठिकाणांची संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी पाहणी करावी, असे आदेश महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी नुकतेच दिले आहेत. या अंतर्गत ज्या तोडकाम कारवायांची पूर्तता होऊन अहवाल सादर झाले आहेत, त्यापैकी 'आरईटीएमएस' सॉफ्टवेअरच्या मदतीने निवडण्यात आलेल्या (Random Selection) १ टक्का कारवायांच्या बाबतीत उपायुक्तांनी; तर ५ टक्के कारवायांच्या बाबत विभागाच्या सहाय्यक आयु्क्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर कारवाई योग्यप्रकारे झाली असल्याची खातरजमा करावयाची आहे. तसेच सदर तोडकाम योग्य प्रकारे झाले नसल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचा-यांच्या विरोधात कारवाई सुरु करावयाची आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमधील अनधिकृत बांधकामांवरील कार्यवाहीसाठी ६४ पदनिर्देशित अधिका-यांची (DO) नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. ही नियुक्ती 'मुंबई महापालिका अधिनियम १८८८' व 'एमआरटीपी ऍक्ट १९६६' नुसार महाराष्ट्र शासनाने १३ मार्च २०१२ रोजी दिलेल्या आदेशान्वये करण्यात आली आहे. यानुसार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचे समन्वयन प्रामुख्याने पदनिर्देशित अधिका-यांद्वारे केले जात आहे.

वरीलनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाल्यानंतर सदर कारवाई योग्यप्रकारे झाली नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत असतात. या अनुषंगाने तोडकाम कार्यवाही अधिक प्रभावीपणे व्हावी, याकरिता आता उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्याद्वारे करण्यात येणा-या पाहणी ठिकाणांची निवड ही कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय 'आरईटीएमएस' या सॉफ्टवेअरद्वारे आणि निर्धारित प्रमाणानुसार करण्यात येणार आहे.

यानुसार संबंधित परिमंडळीय उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या अखत्यारित जेवढ्या ठिकाणी तोडकाम कारवाई झाली असेल, त्यापैकी अनुक्रमे १ टक्का व ५ टक्के ठिकाणांना त्यांनी भेटी देऊन पाहणी करावयाची आहे. या पाहणी दरम्यान तोडकाम कार्यवाही योग्यप्रकारे झाली नसल्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी
यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील तोडकाम कार्यवाही विषयीची प्रक्रिया ही १ एप्रिल २०१६ पासून 'रिमूव्हल ऑफ एनक्रोचमेंट ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टीम' (RETMS) या सॉफ्टवेअरच्या मदतीने केली जात आहे. यानुसार कार्यवाही करण्यात येणा-या ठिकाणांची पाहणी महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांद्वारे नियमितपणे केली जाते. तसेच याबाबत प्राप्त होणा-या तक्रारींचे निराकरण देखील नियमितपणे केले जाते. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशांमुळे ही कार्यवाही अधिक प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget