हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
विधानसभेचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते सन्मान
मुंबई ( २२ जानेवारी ) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जोगेश्वरी विधानसभेतील ज्येष्ठ शिवसैनिक तसेच पदाधिकारी यांच्या आई -वडीलांचा सन्मान जोगेश्वरी विधानसभेचे आमदार तसेच गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच त्यांनी स्थापन केलेल्या ‘शिवसेना’ या पक्षाला महाराष्ट्रातील जनतेने भरभरुन प्रेम केले. पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत करुन विभागातील नेत्यांबरोबर खांद्याला खांदा लावून शिवसेना तळागाळात तसेच जनमानसात रुजवली. तर आज त्यांच्या घराण्यातील दुसरी पिढी शिवसेनेत सक्रियपणे काम करीत आहेत. यातील काही जण विभागातील शाखाप्रमुख ते गटनेते पदावर कार्यरत आहे. शिवसेनेतर्फे विभागात आयोजित करण्यात येणार्या विविध कार्यक्रमांना तन-मन लावून झोकुन काम करीत असतात.
पक्षासाठी अहोरात्र झटणार्या या जिवभावाच्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या आई-वडीलांचा, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्याचा संकल्प राज्यमंत्री वायकर यांनी केला. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या (२३ जानेवारी) वाढदिवसाचे औचित्य साधत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ शिवसैनिक तसेच पदाधिकारी यांच्या आई-वडीलांचा सन्मान करण्यात येणार आहे. जोगेश्वरी-विक्रोळी येथील शामनगर तलावाजवळ या सन्मान कार्यक्रमाचे सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री वायकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तु असे या सन्मानाचे स्वरुप आहे.
टिप्पणी पोस्ट करा