(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना | मराठी १ नंबर बातम्या

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना

मुंबई ( २० जानेवारी ) : शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणाऱ्या तसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करुन देणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातील सादरीकरण करुन या योजनेची घोषणा केली. गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळात नोकरी उपलब्ध करुन देणाऱ्या बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. याशिवाय एसटी महामंडळाच्या इतर अनेक लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात आज झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.

‘स्लीपर शिवशाही’ आणि ‘लालपरी’चे लॉंचिंग

एसटी महामंडळातील बसेसचा आता चेहरा – मोहरा बदलत आहे. आजच्या कार्यक्रमात शयनयान (स्लीपर कोच) शिवशाही बसचे अनावरण करण्यात आले. तसेच परिवर्तन या साध्या बसचे ‘लालपरी’ हे नवीन डिझाईन तयार करण्यात आले असून त्याचेही अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

पनवेल बस पोर्टचे भूमीपूजन

महामंडळामार्फत राज्यात विमानतळाच्या धर्तीवर १५ ठिकाणी अत्याधुनिक सोयी – सुविधांनीयुक्त बस पोर्ट उभी केली जाणार आहेत. त्यापैकी पनवेल बस पोर्टच्या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी युवतींना एसटी चालक पदासाठी प्रशिक्षण व नियुक्ती देण्याच्या योजनेचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.

यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणी करताना मयत झालेले शेतमजूर देविदास मडावी यांचे पाल्य संदीप मडावी यांना प्रशिक्षणाअंती चालकपदी नोकरीचे नेमणूकपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. तसेच जळगाव जामोद ते बुलढाणा मार्गावर पुर्णा नदीवर प्रसंगावधान दाखवत संभाव्य अपघात आणि संभाव्य अनर्थ टाळल्याबद्दल एसटी चालक हरिभाऊ लोणकर व वाहक विठ्ठल लोंढे यांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात रस्त्याच्या बाजूला २६ मार्गस्थ निवारे बांधणे, गडचिरोली, पालघर, शहादा येथे आदिवासी युवकांसाठी चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करणे, पांढरकवडा येथील चालक प्रशिक्षण केंद्राचे
विस्तारीकरण करणे, नव्याने बांधण्यात येणाऱ्या बसस्थानकांवर खास मराठी चित्रपटांसाठी छोटी चित्रपटगृहे बांधणे, एसटीच्या २५० आगारस्तरावर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासी संकुल उभी करणे आदी योजनांचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.

बिरसा मुंडा पुनर्वसन योजना महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, एसटी महामंडळ आता आपला चेहरा – मोहरा बदलत आहे. एसटीची बस ही सामान्य माणसाचा मोठा आधार आहे. या सामान्य माणसाला आरामदायी प्रवासाचा आनंद मिळावा यासाठी एसटी बस अत्याधुनिक होत आहे. महामंडळाने आज सुरु केलेले विविध लोकोपयोग उपक्रम
खूप कौतुकास्पद आहेत. नक्षलग्रस्त तरुणांच्या पुनर्वसनासाठी एसटी महामंडळाने आज सुरु केलेली बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना फार महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी आहे, असे ते म्हणाले. या सर्व लोकोपयोगी
निर्णयांसाठी पुढाकार घेऊन ते निर्णय पूर्णत्वास नेल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांचे अभिनंदन केले.

परिवर्तन आणणाऱ्या योजना - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, पूर्वी घाणीची साम्राज्ये असलेली एसटीची स्थानके तसेच एसटीच्या बसेस आता बदलत आहेत. लालपरी, शिवशाहीसारख्या अत्याधुनिक बसेस आता किफायतशीर दरात सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होत आहेत. एसटी महामंडळाने यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आदिवासी, समर्पण केलेले नक्षलग्रस्त तरुण, आपत्तीग्रस्त शेतमजूर, शहीद जवानांच्या पत्नी यांच्यासाठी महामंडळाने आज सुरु केलेल्या योजना ह्या या लोकांच्या जीवनात परिवर्तन आणणाऱ्या आहेत,
असे ते म्हणाले.

नक्षलवादी तरुणांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी एसटी योगदान देईल – दिवाकर रावते

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना सुरु करण्यासंदर्भात माहिती दिली. एका शिवसैनिकाची नक्षलवाद्यांकडून हत्या झाली असता त्यांनी गडचिरोलीतील त्या संबंधीत
भागास भेट दिली होती, याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नक्षलवादी तरुणांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी एसटी महामंडळ योगदान देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशाच्या सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांचे योगदान फार मोठे असते. त्यांच्या कुटुंबियांसाठी छोटेसे योगदान देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना सुरु करीत असल्याची घोषणा यावेळी मंत्री रावते यांनी केली. 

यावेळी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला. 

यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार वारिस पठाण, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल आदी मान्यवर उपस्थित होते. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget