(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शिवाजी पार्कच्या सोहळ्यात प्रजासत्ताक दिन साजरा | मराठी १ नंबर बातम्या

शिवाजी पार्कच्या सोहळ्यात प्रजासत्ताक दिन साजरा

मुंबई ( २६ जानेवारी ) : संविधानाने घालून दिलेले आदर्श व मूल्ये यांच्याप्रती असलेली बांधिलकी आपण दृढ करूया आणि एक समृद्ध, बळकट महाराष्ट्र घडवण्याचा निश्चय करूया, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेस शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विविध शासकीय विभाग, सेना दल, पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

भारताची प्रादेशिक एकात्मता जोपासताना आणि कायदा व सुव्यवस्था राखताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा महाराष्ट्रातील शूर हुतात्म्यांना राज्यपालांनी याप्रसंगी आदरांजली अर्पण केली. ते पुढे म्हणाले शासनाने, समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक दर्जाची स्मारके उभारण्याचे काम अगोदरच सुरू झाले आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग यांच्या कल्याणाची विशेष काळजी घेण्यासाठी शासनाने विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग हा एक स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्गातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपयांवरून 8 लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. शासनाने छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तयार केली असून या योजनेत 605 अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील 6 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भांडवल 400 कोटी रुपयांपर्यंत वाढविले आहे.

9 टक्के सरासरी विकास दर गाठला

महाराष्ट्राने मागील 4 वर्षांमध्ये 9 टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला आहे, हे सांगताना आपणास अभिमान वाटत असल्याचे राज्यपाल यांनी नमूद केले. राज्याच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्राने 12.5 टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक 30 टक्क्यांपर्यंत वाढली असून महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कृषिक्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाच्या सहाय्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या 11 जिल्ह्यांमध्ये विशेष दुग्धव्यवसाय प्रकल्प राबविण्यात येत आहे. या दुग्धव्यवसाय प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.

आतापर्यंत 47 लाख 86 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

राज्यपाल राव म्हणाले की, कर्जबाजारी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा देण्याच्या हेतूने शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. त्याद्वारे 23 हजार 102 कोटी रुपये इतकी रक्कम 47 लाख 86 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्यात आली आहे.

11 हजाराहून अधिक गावे दुष्काळमुक्त

जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मागील दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील 11 हजाराहून अधिक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. त्या अभियानाअंतर्गत सुमारे 4 लाख 25 हजार कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याद्वारे 16.82 टीसीएम इतक्या क्षमतेचा जलसाठा निर्माण करण्यात आला आहे. "गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना" या अंतर्गत 31 हजार 549 धरणांमधील गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 2 हजार धरणांतून 92 लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. "मागेल त्याला शेततळे" योजनेअंतर्गत 56 हजारांहून अधिक शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

1.3 लाख कोटी रुपये थेट विदेशी गुंतवणूक

राज्यपाल राव म्हणाले की, देशी तसेच विदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वात अधिक पसंतीचे राज्य राहिले आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 मध्ये राज्याला 1.3 लाख कोटी रुपये इतकी थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त झाली आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य शासनाने अलिकडेच महिला उद्योजिकांना समर्पित औद्योगिक धोरणास मंजुरी दिली आहे. राज्याने फेब्रुवारी महिन्यात पहिली जागतिक गुंतवणूक शिखर परिषद “मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स 2018” आयोजित केली आहे. या शिखर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल, गुंतवणूक प्रक्रिया सुलभ होईल आणि “मेक इन इंडिया” कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळणार आहे. उद्योजकांना प्रोत्साहन आणि निधी देण्याच्या हेतूने शासनाने अलिकडेच इनोवेशन अँड स्टार्ट - अप पॉलिसीला मान्यता दिली आहे. कौशल्य भारत अभियानाअंतर्गत राज्याने आठ लाखांहून अधिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिलेले आहे.

राज्यपाल राव म्हणाले की, नागरिकांच्या जीवनमानाच्या दर्जात सुधारणा होण्यासाठी संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील 226 रेल्वेपूलांसह 742 उड्डाणपूलांची बांधकामे आणि 27 हजार 371 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जवळपास 1,500 कि.मी.चे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत.

मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन महानगरांत 1 लाख 42 हजार 306 कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीद्वारे सुमारे 350 कि.मी.मेट्रोमार्गाचे जाळे उभारण्याचे नियोजित केले आहे. या मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून दररोज 11.1 दशलक्ष इतक्या प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळणार आहे.

राज्यपाल राव म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामास अगोदरच प्रारंभ झालेला आहे. याबरोबरच शासनाने आणखी 10 विमानतळे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. अलिकडेच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवाशी सेवा पूर्णत: सुरू झाली आहे.

महत्त्वाकांक्षी बृहत वृक्ष लागवड मोहिमेचा एक भाग म्हणून गेल्या पावसाळ्यात राज्यामध्ये 5.43 कोटी इतक्या रोपांची लागवड करण्याचा उच्चांक नोंदवला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 1 ऑक्टोबर 2017 रोजी संपूर्ण नागरी महाराष्ट्रास हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. आतापर्यंत 22 हजार 793 ग्रामपंचायती व 212 तालुके हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

आदिवासी भागातील कुपोषण व पंडुरोगाची समस्या सोडविण्यासाठी "डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना" राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 6 महिने ते 6 वर्षे वयोगटाच्या मुलांना व त्याचबरोबर गरोदर
महिला व स्तनदा मातांनाही पूरक पोषण आहार देण्यात येत आहे. शासनाने सर्वसाधारण प्रवर्गामधील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथांकरिता एक टक्का इतके आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून हा एक क्रांतिकारी निर्णय आहे, असे राज्यपाल राव म्हणाले.

विविध दलांचे संचलन

याप्रसंगी विविध दलांनी संचलन केले. भारतीय नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई रेल्वे पोलीस दल, सशस्त्र गृहरक्षक दल, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महापालिका सुरक्षा दल, वन विभाग, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, सी कॅडेट कोअर, रोड सेफ्टी पेट्रोल (आरएसपी), भारत स्काऊट आणि गाईडस, ब्रास बँड पथक, पाईप बँड, बृहन्मुंबईतील वाहतूक पोलीस मोटार सायकल पथक आदी पथकांनी यावेळी संचलन केले.

रक्षक बुलेटप्रुफ व्हॅन, मार्क्समन बुलेटप्रुफ व्हॅन, महिला सुरक्षा पथक व्हॅन, महारक्षक बुलेटप्रुफ व्हॅन, वरुण वॉटर कॅनन, अग्निशमन दलाचे जलद प्रतिसाद पथक, अग्निसुरक्षा पालन कक्ष वाहन, ९० मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आदी वाहनांचा संचालनात समावेश होता.

चित्ररथातून विविध संदेश

राज्य शासनाच्या विविध विभागांनी त्यांच्या कामगिरीचे यावेळी चित्ररथाच्या माध्यमातून सादरीकरण केले. एसआरए, महानिर्मितीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, भूजल पाण्याचे जतन आणि संवर्धन, 50 कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय, एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, 7 लाख कुटुंबाना घरे मिळवून देणारे म्हाडा, मेट्रो रेल्वे - प्रवास सुखाचा मुंबईकरांचा, मनरेगातून समृद्ध महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, जाती विरहित महाराष्ट्रासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन, उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या संकल्पनांवर आधारित चित्ररथांनी आपले सादरीकरण केले. राज्यपालांच्या भाषणाच्या मराठी अनुवादाचे वाचन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget