(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कुत्रे व मांजरांसाठी ३ ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित | मराठी १ नंबर बातम्या

कुत्रे व मांजरांसाठी ३ ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित

तिन्ही स्मशानभूमी पर्यावरणपूरक 'सीएनजी' इंधनावर आधारित

शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक स्मशानभूमी

मुंबई ( २३ जानेवारी ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कुत्रे व मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांची मोठी संख्या आहे. अनेक घरांमध्ये हे पाळीव प्राणी घरातील एक सदस्यच असतात. वयोमानापरत्वे किंवा अन्य कारणांमुळे या प्राण्यांचा
मृत्यु झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे, या दृष्टीने ३ ठिकाणी स्मशानभूमी (Incinerator / Crematorium) उभारण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महापालिका आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली आहे. यानुसार शहर भागात महालक्ष्मी, पूर्व उपनगरांमध्ये देवनार; तर पश्चिम उपनगरात मालाड परिसरात स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या तिन्ही स्मशानभूमी पर्यावरणपूरक पद्धतीने 'सीएनजी' या इंधनावर आधारित असणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिली आहे.

सध्या महापालिका क्षेत्रात परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खाजगी अंत्यसंस्कार स्थळ असून ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे संचालित आहे. तर महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाच्या विल्हेवाटीची
कार्यवाही ही बोरिवली परिसरातल्या 'कोरा केंद्र' या स्वयंसेवी संस्थेद्वारे केली जाते. महापालिका क्षेत्रात कुत्रे व मांजरी यासारख्या पाळीव प्राण्यांचे प्रमाणही मोठे आहे. या पाळीव प्राण्यांच्या मृतदेहावर त्यांच्या मालकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. हे सर्व प्रकार आरोग्यदृष्ट्या योग्य असतीलच असे नाही. या बाबी लक्षात घेऊन तसेच कुत्रे वा मांजरांची संख्या लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात त्यांच्यासाठी ३ स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

यादृष्टीने महालक्ष्मी, देवनार व मालाड येथे पर्यावरणपूरक स्मशानभूमी 'सार्वजनिक खाजगी भागीदारी' तत्वावर (Public Private Pattnership) उभारण्याचे प्रशासकीय स्तरावर प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रत्येक स्मशानभूमीसाठी साधारणपणे २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च तसेच स्मशानभूमीच्या परिरक्षणासाठी (Maintenance) व इंधनासाठी होणारा खर्च महापालिकेद्वारे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.


तथापि, या स्मशानभूमीमध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ व इतर आस्थापना खर्च 'सार्वजनिक खाजगी भागीदारी' अंतर्गत निवड होणा-या संस्थेद्वारे केला जाणे अपेक्षित आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया जून २०१८ मध्ये होणे अंदाजित असून त्यानंतर साधारणपणे सहा महिन्यात तिन्ही स्मशानभूमी कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा आहे. या स्मशानभूमींमध्ये कुत्रे, मांजरी यासारख्या पाळीव प्राण्यांचे मृतदेह आणि 'ऍनिमल बर्थ कंट्रोल सेंटर' येथे मृत होणा-या प्राण्यांच्या मृतदेहांवर अंतिमसंस्कार करण्याची सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

वर्ष २०१२ च्या प्राणी गणनेनुसार (Animal Census) मुंबई महापालिका क्षेत्रात ३३ हजार ५७२ कुत्रे आहेत. तसेच सन २०१४ मध्ये महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या गणनेनुसार मनपा क्षेत्रात ९५ हजार १७२ भटके कुत्रे आहेत. यापैकी ६९ हजार २३९ कुत्र्यांचे निर्बिजीकरण (Sterlization) करण्यात आले होते. हे निर्बिजीकरण 'ऍनीमल बर्थ कंट्रोल प्रोग्रॅम' अंतर्गत करण्यात आले होते. सध्या महापालिका क्षेत्रात तीनशे पेक्षा अधिक पशुवैद्यकीय दवाखाने असून परळ परिसरात एक रुग्णालय आहे. महापालिकेद्वारे सुद्धा पाळीव प्राण्यांसाठीचा स्वतंत्र दवाखाना खार परिसरात कार्यरत आहे, अशीही माहिती महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget