(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रातील १५ महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते "फर्स्ट लेडी" पुरस्कार प्रदान | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्रातील १५ महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते "फर्स्ट लेडी" पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली ( २० जानेवारी ) : विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या महाराष्ट्रातील १५ महिलांसह देशातील कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज "फर्स्ट लेडी" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित दिमाखदार सोहळयात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी, मंत्रालयाच्या सचिव राकेश श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील ११२ महिलांची निवड "फर्स्ट लेडी" पुरस्कारासाठी करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील या महिलांचा झाला सन्मान 

भारतात सर्वप्रथम प्रवासी रेल्वे चालविण्याचा विक्रम करण्याऱ्या सातारा येथील सुरेखा यादव यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यांनी १९८८ मध्ये रेल्वेची पहिली ‘महिला स्पेशल’ लोकल ट्रेन चालवून या क्षेत्रातील पुरूषांची मक्तेदारी मोडून काढली. ८ मार्च २०११ ला त्यांनी ‘डेक्कन क्वीन’ ही पुणे ते मुंबई (सीएटी) या कठीण मार्गावरील रेल्वे चालवून असा विक्रम करणारी आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक बनन्याचा मान मिळविला. 
जागतिक ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकणा-या पहिल्या महिला बुद्धिबळपटू मुंबई येथील पद्मश्री भाग्यश्री ठिपसे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी पाच वेळा बुद्धिबळात राष्ट्रीय चॅम्पियनशीपचा खिताब मिळविला आहे. त्या १९९१ मध्ये महिला आशियाई बुध्दिबळाच्या मानकरी ठरल्या. १९९९ च्या राष्ट्रकुल देशांच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण तर तीन वेळा रजत पदकावर मोहर उमटविली आहे. १९८६ मध्ये त्यांनी जागतिक बुध्दिबळ संघाचा ‘जागतिक महिला मास्टर’ हा बहुमान मिळविला आहे. बुध्दिबळातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानीत केले आहे.

देशातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी नागपूर येथील हर्षीनी कण्हेकर यांनी हा पुरस्कार स्वीकाराला. अग्निशमन अभियंता म्हणून रुजू होत त्यांनी देशातील अग्निशमन सेवा व महाविद्यालयांमध्ये प्रथम महिला होण्याचा सन्मान मिळविला आहे.देशातील पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक परभणी जिल्ह्यातील शीला डावरे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढत त्यांनी १९८८ मध्ये सर्वप्रथमऑटोरिक्षा चालविला त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. त्यांनी सतत १३ वर्ष ऑटो रिक्षा चालविला त्यानंतर महिला ऑटो रिक्षा चालकांसाठी अकादमी सुरु केली. 

भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कर्णधार पद्मश्री डायना एडलजी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७५ ते १९९५ पर्यंत त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करून महिला क्रिकेटला नवी दिशा दिली. महिला जागतिक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भारताचे दोन वेळा नेतृत्व केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री व अर्जुन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

देशातील पहिली सॅनिटरी पॅडची बँक सुरु करणा-या आमदार म्हणून वर्सोवा, मुंबई येथील विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोजल मशीन स्थापीत केल्या. त्यांनी स्त्रीभृण हत्या प्रतिबंधासह महिलांच्या आरोग्य, शिक्षणासाठी महत्वाचे कार्य केले.

भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ पुण्याच्या अरुणा राजे पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. १९६९ मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीत प्रवेश करणा-या अरूणा राजे पाटील यांनी पटकथाकार, संपादक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

देशातील पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या मुंबई येथील स्नेहा कामत यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१२ मध्ये त्यांनी ‘शि कॅन ड्रॉईव्ह’ या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ महिलांसाठी
ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्याच्या कार्यास प्रारंभ केला. त्यांनी ४०० पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षित केलेले आहे.

देशातील पहिल्या महिला खाण अभियंता चंद्रपूर येथील डॉ. चंद्रानी प्रसाद वर्मा यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. त्या नागपूरला स्थायिक आहेत. सीएसआयआर-सीआयएमएफआर च्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात प्रधान शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.


पहिल्या महिला नोंदणीकृत गुप्तहेर पालघर येथीलरजनी पंडित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांनी आतापर्यंत ७५ हजारांहून अधिक प्रकरणे सोडविली आहेत. त्यांनी या विषयावर डॉक्युमेनट्री तयार केलेली आहे. त्यांनी गुप्तहेर विषयांवर दोन पुस्तकही लिहीलेले आहे. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणाऱ्या मुंबईच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ.इंदिरा हिंदुजा यांना सन्मानीत करण्यात आले. १९८९ मध्ये त्यांनी आयव्हिएफ सेंटरची स्थापन केलेली आहे. सध्या त्या पी.डी. हिंदुजा राष्ट्रीय रूग्णालय आणि वैद्मकीय संशोधन केंद्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना २०११ मध्ये “पद्मश्री” पुरस्काराने सन्मानित केले. अंधांसाठी देशातील पहिले व्हाईट प्रिंट हे लाईफ स्टाइल मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाऱ्या मुंबई येथील उपासना मकाती यांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१३ मध्ये सुरु झालेले हे मासिक शाळा, महाविद्यालये, वृद्धाश्रम, रूग्णालय, ग्रंथालयात उपलब्ध करून दिले जाते. मकाती यांच्या कार्याची दखल घेऊन २०१६ मध्ये फोर्ब्स ने आपल्या यादीत स्मार्ट सीईओ म्हणून पहिल्या ३० नावात त्यांची वर्नी लावली होती.
डिजिटल आर्ट द्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून देणारी मुंबईची एकोणीस वर्षीय तरुणी तारा आनंद यांचाही या पुरस्काराने गौरव करण्यात आला. ‘आय ॲम नो मॅन’ नावाने त्यांनी भारतातील महिला योध्यांचे केलेल्या रेखाटनांचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे.


‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया’ (असोचेम) च्या पहिल्या महिला अध्यक्ष मुंबई येथील स्वाती परिमल यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र काही कारणास्तव त्या या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्या देशातील आघाडीच्या उद्योजक असून आरोग्य, शिक्षण सेवामध्ये आमुलाग्र बदल घडविण्यात त्यांचे योगदान आहे.

दुर्गाबाई कामत व अबन मिस्त्री यांना मरणोत्तर ‘फर्स्ट लेडी’ सन्मान भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका दुर्गाबाई कामत व देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ.अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला. आज दुर्गाबाई कामत यांच्यावतीने हा पुरस्कार वृषाली गोखले यांनी तर डॉ. अबन मिस्त्री यांच्यावतीने जामीनी जवेरी यांनी स्वीकारला.

भारतरत्न मदर तेरेसा, अंतराळवीर कल्पना चावला यांना मरणोत्तर जाहीर ‘फर्स्ट लेडी’ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला, बचेंद्रि पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, दीपा कर्माकर आदी अनेक कर्तृत्ववान महिलांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget