(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महापालिका आयुक्तांची मासिक आढावा बैठक संपन्न | मराठी १ नंबर बातम्या

महापालिका आयुक्तांची मासिक आढावा बैठक संपन्न

मुंबई ( २ फेब्रुवारी ) : महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

आजच्या बैठकी दरम्यान चर्चिले गेलेले प्रमुख मुद्दे व संबंधित आदेश याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अग्निसुरक्षा विषयक

अनेक उपहारगृहांच्या गच्चीवर पावसाळ्याच्या काळात 'शेड' उभारले जाते. हे शेड अग्निसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते. ही बाब लक्षात घेऊन यापुढे उपहारगृहांच्या गच्चीवर कोणत्याही प्रकारचे शेड उभारण्यास परवानगी देऊ नये. पावसाळ्याच्या काळात किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत देखील
उपहारगृहांच्या गच्चीवर 'शेड' उभारण्याची परवानगी देण्यात येऊ नये. तसेच ज्या ठिकाणी असे 'शेड' आढळून येतील, ते तात्काळ तोडावेत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले.

उपहारगृहांमध्ये लाकडी जिने, भिंतीवरील लाकडी आच्छादन किंवा लाकडी 'पार्टिशन' यासारख्या ज्वलनशीलबाबी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घातक ठरू शकतात. हे लक्षात घेऊन, ज्या ठिकाणी अशा बाबी आढळून येतील त्याबाबत तात्काळ नोटीस देऊन त्यावर कारवाई करावी.

उपहारगृहामधील जिन्याची रुंदी ही नियमानुसार किमान १.५ मीटर असणे बंधनकारक आहे. ज्याठिकाणी ही रुंदी कमी आढळून येईल, त्याबाबत देखील नियमांनुसार तात्काळ कार्यवाही करावी.

महापालिका क्षेत्रातील फर्निचरची दुकाने, प्लास्टिक वस्तुंची विक्री करणारी दुकाने, रसायन विक्री करणारी दुकाने; यासारख्या ज्वलनशील वस्तुंची विक्री करणा-या किंवा साठा असणा-या आस्थापनांची तपासणी करावी. या तपासणीदरम्यान नियमबाह्यबाबी आढळून आल्यास तात्काळ कारवाई करावी.


सशुल्क शौचालयांबाबत

'पैसे भरा व वापरा' (Pay and Use Toilet) या संकल्पनेवर आधारित शौचालयांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ही संकल्पना मोडीत काढून ही संबंधित शौचालये निशुल्क करण्याचे महापालिकेच्या वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात जाहीर केले आहे.

सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा सशुल्क शौचालयांना स्वतः भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी. या पाहणी दरम्यान सदर ठिकाणी स्वच्छता नसेल, निर्धारित दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असेल किंवा शौचालयाचा नियमबाह्य वापर होत असेल; तर अशा शौचालयांना तात्काळ नोटीस देऊन ते ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु करावी.

सशुल्क शौचालय ही नागरिकांसाठी महापालिकेद्वारे देण्यात येणारी सेवा सुविधा आहे. या शौचालयांचा वापर सेवेच्या दृष्टीनेच व्हावा, तसेच सेवेच्या नावाखाली व्यवसाय केला जाऊ नये; याची काळजी घेण्याचे निर्देशही
विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले.

महापालिकेच्या वतीने उभारल्या जाणा-या शौचालयांचे आरेखन (Design) हे अधिक सुविधाजनक व उपलब्ध जागेचा अधिक परिणामकारक उपयोग करणारे असावे; यासाठी परिमंडळनिहाय एक वास्तूविशारद, याप्रमाणे वास्तूविशारदांचे एक पॅनेल तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले. तसेच या पॅनेल्सद्वारे तयार करण्यात येणारे आरेखन हे जागेनुरुप व परिसरानुरुप असेल, याचीही काळजी घेण्याचे निर्देशित करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget