(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राणी बागेत नदीसह 'शिकारा', जलपरी आणि जलचर | मराठी १ नंबर बातम्या

राणी बागेत नदीसह 'शिकारा', जलपरी आणि जलचर

यंदाच्या वार्षिक उद्यान प्रदर्शनात

३ महिन्यांच्या अथक परिश्रमातून ४० कर्मचा-यांनी साकारल्या प्रतिकृती

मुंबई ( ९ फेब्रुवारी ) : जवळच्या समुद्रात 'डॉल्फिन' दिसणे तसे दुर्मीळच ! स्टारफिश, ऑक्टोपस, कासव यासारखे जलचर बघायचे झाले तर आपल्याला मत्स्यालयातच जावे लागते. मात्र आता याच जलचरांना जवळून अनुभवण्याची संधी महापालिकेच्या उद्यान प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या वार्षिक उद्यान प्रदर्शनात जलपरी, डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा, इत्यादींच्या फुलांपासून तयार केलेल्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रतिकृती ठेवण्यासाठी सुमारे १०० मीटर लांबीची एक कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून तिच्यात एक फुलांनी सजवलेला 'शिकारा' आहे. या प्रतिकृती आणि कृत्रिम नदी साकारण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागातील ४० कामगार – कर्मचारी - अधिकारी गेले तीन महिने दिवस रात्र मेहनत घेतली, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे दरवर्षी साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात उद्यान विषयक प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनात गेल्यावर्षीपासून एक विषय घेऊन त्यावर आधारित पुष्परचना, वृक्षरचना विशेषत्वाने प्रदर्शित करण्यात येतात. या वर्षी जलप्रदुषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा (काश्मिरी पद्धतीची नाव) देखील या नदीमध्ये आहे. यासोबतच डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा यासारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत.

दरवर्षी वृक्ष प्राधिकरण व महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणा-या फुले, फळे व भाज्या याविषयीच्या वार्षिक प्रदर्शनाचे हे २३ वे वर्ष आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कुंड्यांमधील शोभिवंत झाडे, पुष्परचना, फुलझाडे, लॅण्डस्केप आर्ट आदी विविध विषयांवरील स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत असतात. या स्पर्धांमध्ये शासकीय, निमशासकीय यासह खाजगी क्षेत्रातील संस्था / कंपन्या देखील सहभागी होऊन आपली पर्यावरणपूरक कला सादर करित असतात. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व रचना देखील या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे.

प्रदर्शनात विविध प्रजातींची १० हजारांपेक्षा अधिक झाडे बघावयाला मिळत आहे. यामध्ये कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय, वेली यांचा समावेश आहे. तसेच विविध प्रकारची तुळशीची झाडे, बेल, हळद, कापूर, आवळा, बेहडा, हिरडा, चंदन बडीशेप, अश्वगंधा, बदाम, काजू यासह हात लावताच पाने मिटून घेणार लाजाळूचे झाड; यासारखी अनेक औषधी व सुगंधी झाडे देखील या प्रदर्शनात पहावयाला मिळत आहेत. यासोबतच जिरे, मिरे, विलायची, लवंग, जायफळ, धणे यासारख्या मसाल्यात टाकावयाच्या पदार्थांची झाडे, जी एरवी आपल्याला केरळ मध्येच बघायला मिळाली असती, ती देखील या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईतच बघायला मिळत आहे.

यावर्षीच्या प्रदर्शनात परदेशी भाज्यांचे एक स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये झुकिनी, टुर्निप, नवलकोल, ब्रोकिली, रेड कॅबेज आणि बर्गर मध्ये वापरण्यात येणा-या लेट्यूस सारख्या भाज्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शोभेच्या झाडांसाठीही एक स्वतंत्र विभाग या प्रदर्शनात तयार करण्यात आला आहे. यामध्ये मयूरपंखी, ब्रह्मकमळ, ख्रिसमस ट्री, निवडुंग, लिली, जरबेरा यासारखी अनेक शोभेची झाडे आहेत. झाडांमध्ये अत्यंत महागडे समजले जाणा-या 'बोनसाय' अर्थात बटुवृक्षाचीही अनेक रुपे या प्रदर्शनात आपल्याला पहायला मिळत आहे.

प्रदर्शनाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या विक्री विभागात ४० दालने उभारण्यात आली आहेत. या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी विक्रीस उपलब्ध आहेत, अशीही परदेशी यांनी दिली आहे.

ज्यांना आपल्या घरी किंवा सोसायटीच्या अंगणात किंवा फार्म हाऊसमध्ये बाग फुलवायची आहे, त्यांना बागकामाची व झाडांची प्राथमिक व शास्त्रोक्त माहिती मिळावी, या उद्देशाने उद्यानाशी संबंधित १० वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळांचेही आयोजन प्रदर्शन कालाधीत करण्यात आले आहे. अत्यल्प नोंदणी शुल्क असणा-या या कार्यशाळांमध्ये कोणीही नागरिक नाव नोंदवू शकतो. यानुसार ९ ते ११ फेब्रुवारी २०१८ दरम्यान आयोजित होणा-या सर्व १० कार्यशाळांमध्येही सहभागी होण्यासाठी रुपये ५००/- शुल्क सहभागी होऊ शकतो. तर १० पैकी एक किंवा काही कार्यशाळांमध्ये सहभागी व्हावयाचे असल्यास प्रति कार्यशाळा रुपये १००/- एवढे शुल्क असणार आहे. कार्यशाळेत सहभागी होणा-या सर्वांना महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे प्रमाणपत्र व माहितीची संगणकीय प्रत (Soft Copy) देण्यात येणार आहे.

या प्रदर्शनाचा शुभारंभ शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला. पहिल्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत, तर दि. १० व ११ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी दि. १३ ते १५ जानेवारी २०१७ या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित झालेल्या प्रदर्शनाला १ लाख २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली होती. गेल्यावर्षीच्या प्रदर्शनात फुलांपासून तयार करण्यात आलेले मिकी माऊस, डोनाल्ड डक, डोरेमॉन इत्यादी 'कार्टुन कॅरेक्टर' लहानग्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू, तर मोठ्यांच्या स्मरणरंजनाचा (Nostalgia) विषय ठरले होते.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे मागील २२ वर्षांपासून हे प्रदर्शन प्रतिवर्षी भरविण्यात येते. दरवर्षी या प्रदर्शनात नाविण्य व कल्पकता असते. ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे, वृक्षतोड कमी करुन पर्यावरणाचा होणारा ऱहास टाळण्‍यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईकरांना झाडे, फुले, फळे आदींचे आकर्षण निर्माण करण्यासाठी व मानसिकतेत बदल घडविण्यासाठी हा उपक्रम अत्यावश्यक असल्याचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी सांगितले. जगभरातील १९७ देशांच्‍या भरलेल्‍या परिषदेत पर्यावरणावर चिंता व्‍यक्‍त करण्‍यात आली असून वृक्ष जपले तरच प्राणवायुचे प्रमाण वाढून मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार असल्‍याचे ते म्‍हणाले. उद्यान विभाग चांगले काम करीत असून उपस्थित सर्वांना त्‍यांनी शेवटी शुभेच्‍छा दिल्‍या.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधताना म्‍हणाले की, यावर्षीच्‍या प्रदर्शनात झाडे, फुले, फळे आणि भाज्या यांचे नवनविन प्रकार पाहायला मिळत असून मुंबईकर नागरिकांसाठी ती एक पर्वणीच असून आपल्‍या कुटुंबियांसमवेत या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केली. त्‍यासोबतच निळा गुलाब हा यावर्षीच्‍या प्रदर्शनाचे आकर्षण असून सर्वांनी तो आर्वंजून बघावा असेही ते म्‍हणाले.

२३ व्‍या झाडे, फुले, फळे आणि भाज्यांचे प्रदर्शन रविवार, दिनांक ११ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी विनाशुल्क खुले आहे. या प्रदर्शनात फळझाडे, फळभाज्या, परडय़ा, टोपल्या, कुंडय़ांमध्ये वाढविलेली मोसमी / हंगामी फुलझाडे, कुंडय़ांमधील झाडे, गुलाब, वेली, झुलत्या परडीतील झाडे, शोभिवंत झाडे, औषधी व सुगंधी वनस्पती, बागेतील निसर्गरचना, कलात्मक पुष्परचना आदी संकल्पना साकारण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget