(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पालिका ऑनलाईन सेवा वापर संख्या ७४,५११ वरुन ४,१०,५३५ वर पोहचली | मराठी १ नंबर बातम्या

पालिका ऑनलाईन सेवा वापर संख्या ७४,५११ वरुन ४,१०,५३५ वर पोहचली

ऑनलाईन सेवा लाभार्थींच्या संख्येत एका वर्षात तब्बल ४५१ टक्क्यांची वाढ

मुंबई ( १६ मार्च २०१८ ) : बृहन्मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणा-या विविध नागरी सेवा सुविधाशी संबंधित अर्ज, नोंदणी, नूतनीकरण इत्यादींसाठी नागरिकांच्या महापालिकेतील फे-या कमी होण्याच्या उद्देशाने आपल्या सेवांशी संबंधित प्रक्रिया 'ऑनलाईन' करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना यश येत असल्याचे आता दिसून येत आहे. गेल्यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये केवळ ७४ हजार ५११ अर्जदारांनी 'ऑनलाईन' पद्धतीने अर्ज केले होते. या संख्येत यावर्षी म्हणजेच १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४५१ टक्यांची वाढ होऊन ही संख्या आता ४ लाख १० हजार ५२५ वर पोहचली आहे. तर याऊलट जुन्या पद्धतीने (ऑफलाईन) पद्धतीने अर्ज करणा-यांच्या संख्येत लक्षणीय घट होऊन ती गेल्यावर्षीच्या ५ लाख ३ हजार ८३७ च्या तुलनेत या वर्षी २५ हजार ८६ झाली आहे. तसेच या सेवा सुविधांपोटी महापालिकेला प्राप्त होणा-या एकूण शुल्कापैकी तब्बल ९७ टक्के शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने; तर केवळ ३ टक्के शुल्क हे जुन्या पद्धतीने प्राप्त झाले आहे.

विविध नागरी सेवा सुविधांसाठी नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात न येता, त्यांना घरबसल्या अर्ज व संबंधित प्रक्रिया करता यावी, यासाठी सेवा सुविधाविषयक प्रशासकीय प्रक्रिया प्रभावीपणे ऑनलाईन व्हावी, याकरिता महापालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर नियमितपणे आढावा बैठका घेत आहेत. याचदृष्टीने महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेतील खाती व विभागांच्या स्तरावर सर्वस्तरीय प्रयत्न करण्यात येत आहेत. सेवा सुविधांसाठी ऑनलाईन प्रक्रियांचा वाढता वापर हे या प्रयत्नांना येत असलेल्या यशाचे द्योतक आहे.

मनपाद्वारे नागरिकांना देण्यात येणा-या नागरी सेवा सुविधांविषयीची कार्यवाही अधिक गतिमान व अधिकाधिक पारदर्शक होण्याच्या उद्देशाने 'ऑनलाईन' प्रशासकीय प्रक्रिया करण्यावर महापालिका प्रशासनाचा भर आहे. यावर्षी २८ सेवा सुविधांशी संबंधित प्रक्रिया आतापर्यंत ऑनलाईन करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने शॉप लायसन्स, विवाह नोंदणी, चर खोदणे (Trenches), आरोग्य परवाने, व्यवसाय परवाने, जाहिरात अनुज्ञाप्ती, नवीन कारखाना परवाना, जल जोडणी, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, शिक्षण
खात्याशी संबंधित अर्ज, विषयक पाण्याचा टँकर, मृत्यु प्रमाणपत्र, नवरात्री व गणेशोत्सव संबंधी परवानग्या, चित्रीकरण परवानग्या इत्यादी बाबींचा समावेश आहे.

या सुविधा महापालिकेच्या www.mcgm.gov.in / portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याच सेवा महापालिकेच्या 'MCGM 24 x 7' या भ्रमणध्वनी ऍपच्या माध्यमातून देखील यापूर्वीच उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याबाबत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 'ऑनलाईन' सेवांची गुणवत्ता आणि वेग वाढला आहे. त्याचसोबत 'ऑनलाईन' सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी देखील महापालिका प्रशासनाने विविधस्तरीय प्रयत्न केले. यानुसार दोन्ही पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ऑनलाईन सुविधांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या अकरा महिन्यांच्या कालावधीत 'ऑनलाईन' सेवांचा लाभ घेणा-यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या
दरम्यान साधारणपणे ४ लाख १० हजार ५२५ नागरिकांनी 'ऑनलाईन' सेवांचा लाभ घेतला; तर केवळ २५ हजार ८६ नागरिकांनी जुन्या पद्धतींचा वापर केला आहे.

वरीलनुसार १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या अकरा महिन्याच्या कालावधीत सर्वाधिक म्हणजे २ लाख १२ हजार ३२३ ऑनलाईन अर्ज हे दुकान परवान्याच्या नूतनीकरणासाठी असणा-या 'शॉप फॉर्म- बी' अंतर्गत प्राप्त झाले आहेत. तर याच कारणासाठी ऑफलाईन अर्ज करणा-यांची संख्या ३९ एवढी आहे. याखालोखाल नवीन दुकानाच्या नोंदणीसाठी असणा-या 'शॉप फॉर्म – ए' करिता १ लाख १२ हजार ४८९ ऑनलाईन अर्ज; तर याच कारणासाठी केवळ एक ऑफलाईन अर्ज प्राप्त झाला आहे. विवाह नोंदणीसाठी ४९ हजार ६४९ ऑनलाईन अर्ज; विशेष म्हणजे यासाठी एकही ऑफलाईन अर्ज प्राप्त झाला नाही.

त्याचबरोबर वरीलनुसार अकरा महिन्यांच्या कालावधी दरम्यान दुकानाच्या किंवा दुकान मालकाच्या नावात बदल करण्यासाठी असलेल्या 'शॉप फॉर्म – इ' करिता २९ हजार १७७ ऑनलाईन अर्ज; तर याच कारणासाठी ७८ अर्ज जुन्या पद्धतीने प्राप्त झाले आहेत. चर खोदण्यासाठीचे सर्वच अर्ज ऑनलाईनच स्वीकारले जातात; यानुसार ३ हजार ८३१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर आरोग्य परवाने, व्यापार परवाने, कारखाना परवाना, वॉटर टँकर, होर्डिंग लायसन्स, जाहीरात परवाना, श्वान परवाना इत्यादी बाबींसाठी देखील मोठ्या
प्रमाणात ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या आकडेवारीवरुन महापालिकेने 'इझ ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत सुरु केलेल्या सेवा सुविधा विषयक प्रक्रियांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याची बाब अधोरेखित होत आहे.

१ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या बारा महिन्यांच्या कालावधी दरम्यान केवळ ७४ हजार ५११ नागरिकांनी ऑनलाईन सेवांचा लाभ घेतला होता. याच कालावधी दरम्यान जुन्या पद्धतीने या सेवांचा लाभ घेणा-यांची संख्या ५ लाख ३ हजार ८३७ एवढी होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget