(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); चाळीसगाव येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन्यास मान्यता | मराठी १ नंबर बातम्या

चाळीसगाव येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन्यास मान्यता

मुंबई ( ८ मे २०१८ ) : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे तालुका क्षेत्रासाठी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

चाळीसगावच्या न्यायालयासाठी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) या पदासह आवश्यक असलेली एकूण 11 पदे निर्माण करण्यासही मंजुरी देण्यात आली. न्यायालय स्थापनेसाठी 50 लाख 95 हजार 780 इतका आवर्ती आणि 11 लाख 95 हजार 550 इतका अनावर्ती असा एकूण 62 लाख 91 हजार 330 इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

चाळीसगाव तालुक्यात एकूण 142 महसुली गावे असून तालुक्यापासून जिल्ह्याच्या ठिकाणचे अंतर 115 कि.मी. आहे. तालुक्याच्या हद्दीवर असणारी गुजरदरी 60 कि.मी., जुनोने 35 कि.मी., पिंजारेपाडे व रामनगर ही गावे 35 कि.मी. इतक्या अंतरावर आहेत. येथील जनतेला जिल्हा न्यायालयातील कामांसाठी जळगाव येथे जावे लागते. त्यामुळे तालुक्यातील जनतेची सोय व्हावी यासाठी चाळीसगाव येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे न्यायदानाची प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. जळगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची एकूण 1428 प्रलंबित प्रकरणे चाळीसगावच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत.

वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय अकोट येथे स्थापन करणार

अकोट (जि. अकोला) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यासदेखील आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे अकोला व तेल्हारा या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांची सोय होणार असून न्यायदानाची प्रक्रिया लोकाभिमुख व वेगवान होणार आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा या तालुक्यांसाठी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास, त्यासाठी आवश्यक पद निर्मिती करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने शासनास विनंती केली होती. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांसाठी अकोट येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापनेसह या न्यायालयासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget