हिमांशू रॉय यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून तोंडात गोळी मारुन आत्महत्या केली. तोंडातून गोळी आरपार झाल्यामुळे, त्यांच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
१९८८ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली. यात जे डे हत्याप्रकरण, आयपीएल सट्टेबाजी प्रकरणांचा समावेश होता.
“एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी गमावला”: राज्यपाल
राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी ज्येष्ठ पोलीस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
हिमांशू रॉय एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी होते. पोलीस दलाचे ते बलस्थान होते. गुन्हे तपासात त्यांचा हातखंडा होता. आपल्या सेवाकाळात धारण केलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याच्या पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
हिमांशू रॉय यांच्या निधनाने एक कर्तबगार अधिकारी गमावला : मुख्यमंत्री
राज्य आणि मुंबई पोलिस दलात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आकस्मिक निधनाने एक कर्तबगार अधिकारी आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, रॉय यांनी पोलिस दलात विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावला आहे. एक धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे एका कार्यक्षम अधिकाऱ्याला आपण मुकलो आहोत.
टिप्पणी पोस्ट करा