(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग | मराठी १ नंबर बातम्या

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग

मुंबई ( १२ जून २०१८ ) : राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची संयुक्त जयंती अनुसूचित जाती जमाती, विजा, भजा, इमाव, विमाप्र, शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात साजरी करण्यात आली. यावेळी मुनगंटीवार बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, समता-स्वातंत्र्य-बंधुता या महामानवांच्या विचारांप्रमाणे वाटचाल करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, विषमतामुक्त भारताचे स्वप्न महामानवांनी दाखवले. ते पुर्ण करणे आपली जबाबदारी आहे. समाजाच्या कल्याणासाठी शासन प्रयत्नशील आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीबाबत त्यांनी यावेळी लवकरच आयोग लागू करण्यात येईल, असे सूतोवाच केले.

यावेळी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, देशात वैचारिक मतभेद असतील मात्र, जोपर्यंत संविधान आहे, तोपर्यंत देशाचे विभाजन होणे शक्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जोडण्याचे कार्य केले. सर्व समाज एकसंध करण्याचे प्रयत्न केले. आरक्षणामुळे आदिवासी, मागास, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली.

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले, महामानवांनी या मातीला सामाजिक समतेचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी शासन कार्यरत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात विद्यार्थ्यांना समस्येला सामोरे जावे लागणार नाही. यासाठी शासन कार्यवाही करीत आहे.

या जयंती सोहळ्यास ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पदुम मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव अत्राम, दै. वृत्त सम्राटचे संपादक बबन कांबळे, अभिनेता जे. ब्रॅन्डन उपस्थित होते. यावेळी सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी अभंगातून प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात कृषीमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संघटनेचे राज्याध्यक्ष भारत वानखेडे, उपाध्यक्ष सुभाष गवई, संघटनेचे अनुज निखारे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमास मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget