(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत मार्गदर्शन सूचना | मराठी १ नंबर बातम्या

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत मार्गदर्शन सूचना

मुंबई ( ५ जून २०१८ ) : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना केंद्र शासनाने यापूर्वीच सर्वच राज्यांना दिल्या आहेत. याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्वोच्च न्यायालयानेही मार्गदर्शक सूचना दिल्या असून, आता शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी सुरक्षा याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार दाखल करणे विद्यार्थ्यांना सोपे व्हावे यासाठी POCSO e-Box या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या ‘CHIRAG’ या App ची माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास येईल अशा ठिकाणी सूचना फलक लावावेत. तसेच POCSO e-Box व CHIRAG या App वर तक्रारी नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ती शाळांनी करणे आवश्यक असून बालकांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक अपराधाबाबत माहिती असणाऱ्या व्यक्तीने त्याबाबत तात्काळ विशेष किशोर पोलिस पथक (Special Juvenile Police Unit) अथवा स्थानिक पोलिस स्टेशनला कळविणे बंधनकारक आहे.

शाळांमध्ये विद्यार्थी/विद्यार्थीनींच्या सुरक्षततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या आवारात/प्रवेश द्वारावर तसेच बाहेर जाण्याच्या दरवाजाजवळ पुरेसे सी.सी.टि.व्ही. कॅमेरा बसविणे गरजेचे आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच निर्गमनद्वाराजवळ पुरुष अथवा महिला सुरक्षा रक्षक नेमलेला असणे गरजेचे आहे. शाळेच्या परिसरामध्ये कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची दक्षता शाळेने घेणे आवश्यक आहे.

विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित असताना विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेची राहील. यासाठी व्यवस्थापनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबर वेळोवेळी बैठक आयोजित करुन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शाळेतील मुलांच्या उपस्थिती संदर्भात सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस संध्याकाळी हजेरी नोंदविण्यात यावी तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे कळविणे गरजेचे आहे. शाळा व्यवस्थापनाने शिक्षक/पालक/कर्मचारी व विद्यार्थी यांचा समावेश असलेली दक्षता समिती नेमून संबंधित पालक समितीसोबत चर्चासत्र आयोजित करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी मानसिक दबावाला बळी पडू नये म्हणून व्यवस्थापनाने शाळेत समुपदेशनाची व्यवस्था करावी. तसेच खासगी वाहनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित वाहन पालकाच्या वर्तणुकीची पडताळणी करण्याबाबत पालकांना सूचित करण्याव यावे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसमध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस बसण्याची अनुमती असू नये. याबाबतच्या सूचना मुख्याध्यापकांनी/संबंधित व्यवस्थापकांनी सर्व बस चालकांना द्याव्यात. बस चालकांनी शालेय विद्यार्थ्यास बसमधून त्याच्या इच्छित (निवास स्थानाजवळच्या) ठिकाणीच सोडावे. बसमधून प्रवास करणाऱ्या शेवटच्या मुलीला इच्छित (निवास स्थानाजवळच्या) ठिकाणी सोडेपर्यंत बसमध्ये महिला सेविका/शिक्षिका असावी.

शाळेतील मुलांचे व मुलींचे प्रसाधनगृह स्वतंत्र व पुरेसे अंतरावर असावेत. मुलींच्या प्रसाधनगृहात महिला सेविकांची सुविधा असावी तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्याकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह असावेत. शाळा व्यवस्थापनातर्फे शाळा सुटल्यानंतर शाळेतील वर्गामध्ये, प्रसाधनगृहामध्ये तसेच अन्य ठिकाणी/परिसरात कोणताही विद्यार्थी मागे राहिला नसल्यची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करणे आवश्यक आहे. शाळेतील मुलीस शालेय उपक्रम/स्पर्धांसाठी शाळेबाहेर पाठविताना शक्यतो महिला शिक्षिका/सेविका यांच्या सोबत पाठवावे. कोणत्याही मुलास शारीरिक अथवा मानसिक इजा पोहचेल अशा प्रकारची शिक्षा करण्यात येऊ नये.

आकस्मिक प्रकरणी मुलांचे पालक किंवा नातेवाईक शाळेत उपस्थित होईपर्यंत मुख्याध्यापकांनी शाळेतील मुलांचा ताबा शक्यतो शाळेतील महिला शिक्षकांकडे सोपवावा. शाळा व्यवस्थापन/शिक्षक यांनी कोणत्याही विद्यार्थ्यास पालकांच्या संमतीशिवाय अधिकृत ओळखपत्र तपासल्याखेरीज (शासनाने मान्यता दिलेले कोणतेही ओळखपत्र उदा. पॅन कार्ड/आधार कार्ड) अन्य व्यक्तींकडे सोपवू नये. शाळेतील शिक्षक/कर्मचारी यांची नियुक्ती व्यवस्थापनातर्फे करताना संबंधितांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र संबंधित पोलिस विभागाकडून घेतलेले असावेत. शाळेतील वाहतूक सुरक्षा, गृहव्यवस्थापन तसेच उपहारगृह यासाठी नेमण्यात येणारा कर्मचारी वर्ग मान्यताप्राप्त संस्थेकडून नेमण्यात यावा. सदर कर्मचाऱ्यांचे देखील पोलिस विभागाकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतलेले असावे.

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक 201806021456086621 असा आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget