(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आधी केले, मग सांगितले ! | मराठी १ नंबर बातम्या

आधी केले, मग सांगितले !

केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत स्पर्धापरीक्षांद्वारे महाराष्ट्रातून अधिकाधिक तरुण यावेत यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्था कार्यरत आहे. याबरोबरच गेल्या काही वर्षात खाजगी संस्थांचीही लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच काही संस्था आणि व्यक्ती आपापल्या परीने तरुणांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहे.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी अमरावती येथे डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमी स्थापन केली आहे. या अकादमीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अकादमी उमेदवारांसाठी विनामुल्य कार्य करीत आहे. अकादमीच्या कार्याची ही थोडक्यात ओळख :-
प्रा.नरेशचंद्र काठोळे अमरावती येथील भारतीय महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत असताना काही कामानिमित्त 2000 साली सांगली येथे गेले होते. तेथे त्यांची भेट भारतीय महसूल सेवेत निवड झालेले अभिनय कुंभार यांच्याशी झाली. कुंभार यांनी त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा मराठी भाषेतून देता येते असे सांगून या परीक्षेविषयीचे बारकावे सांगितले. त्यातून प्रेरणा घेऊन मराठी तरुण अधिकाधिक संख्येने स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावा याचा ध्यास डॉ.काठोळे यांनी घेतला आणि पहिली स्पर्धा परीक्षा कार्यशाळा दि.12 मे 2000 रोजी घेतली. या कार्यशाळेला तत्कालीन अमरावती महानगर पालिका आयुक्त धनराज खामतकर, भा.प्र.से. विकास खारगे, भा.प्र.से. अमोल पाटील, संचालक युनिक अकादमी अभिनय कुंभार, भारतीय महसूल सेवा हे उपस्थित होते. दोन वर्षात अकादमीने स्पर्धा परीक्षांविषयक भरपूर कार्यशाळा घेतल्या. मात्र ग्रंथालय व अभ्यासिकेची उणीव भासत होती.

तसेच कार्यास निश्चित दिशा मिळावी म्हणून दि.10 ऑगस्ट 2002 रोजी डॉ.काठोळे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमी स्थापन केली. अमरावती विभागाचे तत्कालीन विभागीय उपायुक्त सदानंद कोचे, उपजिल्हाधिकारी दिलीप स्वामी, साहित्य संगमचे अध्यक्ष डॉ.मोतीलाल राठी व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे कोषाध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब हिवसे यांच्या उपस्थितीत अकादमीच्या 24 तास चालणाऱ्या ग्रंथालयाचे व अभ्यासिकेचे रितसर उद्घाटन झाले.

स्वत:चा बंगला दिला
ग्रंथालय आणि अभ्यासिकेच्या जागेची अडचण लक्षात घेऊन प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रोडवरील जिजाऊ नगरीतील स्वत:चा बंगला अकादमीच्या ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी दिला आणि त्याचे सुपरिणाम दिसू लागले. गेल्या 15 वर्षापासून अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. ज्या अमरावती शहरात एक मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत नव्हता, त्या अमरावती शहरातून गेल्यावर्षी नऊ विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. अकादमीने या संदर्भात वेळोवेळी घेतलेल्या कार्यशाळा, विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिलेली 24 तास ग्रंथालय व अभ्यासिका ह्या गोष्टी महत्वाच्या ठरल्या आहेत.

175 अधिकाऱ्यांचा सहभाग
डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमीच्या विविध उपक्रमामध्ये आतापर्यंत आय.ए.एस., आय.पी.एस., आय.एफ.एस. व राजपत्रित अधिकारी असे 175 अधिकारी मार्गदर्शनासाठी सहभागी झाले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने इतके अधिकारी मार्गदर्शनासाठी सहभागी होणारी भारतातील ही बहुदा एकमेव संस्था असावी. अकादमीने आतापर्यंत संपूर्ण भारतात 6 हजार विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत.

शालेय विद्यार्थ्यांसाठी आय.ए.एस. स्पर्धा
विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून अकादमी विविध कल्पना उपक्रम राबवित असते. खेड्यापाड्यात विनामूल्य स्पर्धापरीक्षा, कार्यशाळा अकादमी घेत आहे. अकादमीने गेल्या वर्षापासून तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे स्वप्न् दाखविले आहे. त्यासाठी संस्कार प्रकाशनाने तयार केलेला ज्युनिअर आय.ए.एस. स्पर्धेचा उपक्रम राबवून केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आज तिसरी ते सातवी या वर्ग गटातील जवळपास 20 हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झालेली आहेत. अकादमीने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविला आहे.
विशेष म्हणजे अकादमीने स्वत:चा कोचिंग क्लास काढला नाही. कारण कोचिंग क्लासच्या माध्यमातून अर्थाजन करणे हा अकादमीचा उद्देश नाही. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत ज्या अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी अकादमीने नेहमी पुढाकार घेतला आहे.

बाबुजी देशमुख वाचनालय
अकोल्याच्या बाबुजी देशमुख वाचनालयाने तीन वर्षापूर्वी मिशन आय.ए.एस. सुरू केले आहे. या वाचनालयात 76 हजार पुस्तके, 100 मासिके व वर्तमानपत्रे आहेत आणि फी आहे फक्त 1 रुपया महिना. 1 रुपया महिना फी घेणारे हे भारतातील कदाचित स्पर्धा परीक्षेचे पहिले वाचनालय असावे. अमरावती बरोबरच अकोला येथे देखील मिशन आय.ए.एस. सुरळीत सुरू झाले आहे. या ठिकाणी जवळपास 300 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करायला विविध अधिकारी व तज्ज्ञ मार्गदर्शक येतात.

आय.ए.एस. टॉपर
अकादमीचा अभिनव उपक्रम म्हणजे 2000 ते 2014 पर्यंतचे सर्व आय.ए.एस. टॉपर्सना अमरावती जिल्ह्यात मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले आहे. 2000 साली आय.ए.एस. झालेले डॉ.श्रीकर परदेशी तर दोन वर्षापूर्वी आय.ए.एस. च्या परीक्षेत टॉपर आलेले डॉ.विपीन इटनकर अमरावती जिल्ह्यात येऊन गेले आहेत. दरवर्षी नियमितपणे 10 मे ते 16 मे या कालावधीत स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरे घेऊन अकादमीने शालेय विद्यार्थ्यांना देखील मिशन आय.ए.एस. मध्ये सहभागी करुन घेतले आहे.

ग्रिष्मकालीन शिबीर
अकादमीची ग्रिष्मकालीन शिबिरे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहिली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या शिबिरांना लाभणारी प्रचंड उपस्थिती. 2012 या वर्षाच्या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातील 850 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धापरीक्षेच्या जगतातील हा बहुदा उच्चांक असावा. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण होते. हा केंद्रबिंदू लक्षात घेऊन अकादमीने या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे यशस्वी नियोजन व आयोजन केले आहे.

थोरामोठ्यांचा सहभाग
अकादमीचे कार्य पुढे नेण्यास आजपर्यंत अनेकांचा हातभार लागला आहे. प्राचार्य अण्णासाहेब हिवसे यांनी अकादमीच्या सुरूवातीच्या काळात त्यांची दंत महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, महिला महाविद्यालयातील जागा स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी उपलब्ध करुन दिली. अलिकडच्या काळात मोर्शी, वरुड मतदार संघाचे तडफदार आमदार डॉ.अनिल बोंडे हे अकादमीच्या मिशन आय.ए.एस. उपक्रमात खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे अकादमीच्या कामाने चांगलाच जोर पकडला आहे.

पुस्तकांचे प्रकाशन
अकादमीने ‘मी IAS अधिकारी होणारच’, ‘शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर’, ‘विद्यार्थींनींनो अधिकारी व्हा’ ‘प्रेरणा स्पर्धा परीक्षेची’, ‘स्पर्धा परीक्षेची तयारी करा आता आपल्याच घरी’, ‘मिशन IAS’ ‘आनंदी राहा यशस्वी व्हा’, ‘मी अधिकारी होणारच’ अशी अनेक पुस्तके प्रकाशित करुन विद्यार्थ्यांना ती माफक किंमतीमध्ये उपलब्ध करुन दिली आहेत.

विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन
काही वर्षापासून विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आयोजित करण्यास प्रारंभ केला आहे. पहिले संमेलन अमरावतीला, दुसरे संमेलन गुरूकुंज मोझरीला तर तिसरे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावला संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव जे.पी.डांगे, मा.राष्ट्रपतींचे तत्कालीन खाजगी सचिव रवींद्र जाधव व सनदी अधिकारी रंगनाथ नाईकडे या मान्यवरांनी पदे भुषविले आहेत. या संमेलनामुळे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जागृती होण्यास चांगली मदत झाली आहे.

खारीचा वाटा
अकादमीने जेव्हा ‘मिशन आय.ए.एस.’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा घ्यायला सुरूवात केली तेव्हा महाराष्ट्रातून केवळ 23 विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आता हा आकडा 100 च्या जवळपास पोहोचला आहे. अकादमीने या संदर्भात आपला खारीचा वाटा उचलला आहे. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले जातात. अकादमीने या कामाला रितसर, प्रामाणिपणे प्रारंभ केला आहे. आजच्या तरुण वर्गाला जागे करण्याचे काम अकादमी करीत आहे. अकादमीच्या आजवरच्या वाटचालीत अनेकांचे मनापासून सहकार्य लाभल्यामुळेच ही अकादमी स्पर्धा परीक्षांच्या जगतात विनामुल्य कार्य करु शकली आहे.

डॉ.काठोळे 2011 साली आपल्या सेवेतून निवृत्त झाले. त्यामुळे त्यांना अकादमीच्या कामासाठी पूर्ण वेळ देता येऊ लागला. तेव्हापासून ते व त्यांच्या पत्नी पहाटे 4.30 ला उठतात, आवरतात, चहा-नास्ता करुन दुपारचा डबा, वॉटरबॅग सोबत ठेवतात आणि किमान पाच शाळांमध्ये तरी व्याख्याने देतात तसेच जिथे जिथे व्याख्यानांचे आमंत्रण असेल तेथे तेथे जाऊन व्याख्याने देत असतात. डॉ.काठोळे यांच्या व अकादमीच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

अधिक माहितीसाठी अकादमीचा पत्ता :- प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे, संचालक, डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमी, जिजाऊ नगर, अमरावती विद्यापीठ रोड, अमरावती (मो.क्र.9890967003)

- देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती) औरंगाबाद
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget