(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद प्रश्नोत्तरे | मराठी १ नंबर बातम्या

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मुंबई जेट एअरवेज एम्प्लॉईज सोसायटीच्या गैरव्यवहाराची तीन महिन्यात चौकशी - सुभाष देशमुख

नागपूर ( १० जुलै २०१८ ) : मुंबई जेट एअरवेज एम्प्लॉईज को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या गैरव्यवहाराची तीन महिन्यात चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करु, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य किरण पावसकर यांनी मुंबई जेट एअरवेज एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न विचारला होता. देशमुख म्हणाले, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये चौकशी सुरु असून अहवाल प्राप्त होताच कारवाई करु. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनी भाग घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही - सुभाष देशमुख
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत देण्यात येईल. कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी शासन घेत असल्याचे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य हेमंत टकले यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 35 हजार शेतकऱ्यांची नावे यादीतून गायब झाल्याने हे शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले, या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ग्रीन यादी जाहीर करण्यात येते. त्यापैकी अधिक तपासणी आवश्यक असलेल्या प्रकारणांचा यलो यादीत समावेश करण्यात येतो. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु असून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शंका, समाधानासाठी लवकरच टोल फ्री नंबर सुरु करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री हरिसिंग राठोड, अमरसिंह पंडित यांनी भाग घेतला.

तूर आणि हरभऱ्याचे पैसे पंधरा दिवसात देणार - सुभाष देशमुख
राज्यात तूर आणि हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असून येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
तूर आणि हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असले तरी शेतकऱ्यांना त्याचे पैसे न मिळाल्याबाबत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले, हंगाम 2016-17 मध्ये तुरीचे मुबलक उत्पादन झाल्याने राज्यातील गोदामे पुर्णपणे भरलेली आहेत. तसेच अतिरिक्त 211 गोदामे भाडेतत्वावर घेऊन साठवणुकीची व्यवस्था केली आहे. शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करुन केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानातून 35 रुपये प्रती किलो प्रमाणे विक्री करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व कृषी पंपांना वीज जोडणीचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करणार - चंद्रशेखर बावनकुळे
राज्यातील सर्व कृषी पंपांना वीज जोडणीचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण केले जाईल, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
कृषी पंप जोडणीच्या कामासाठी निविदा भरण्यास एकही कंत्राटदार तयार नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रकाश गजभिये यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, पूर्व विदर्भातील कामासाठी परिमंडळ स्तरावर काढण्यात आलेल्या 14 निविदांपैकी 13 निविदांना व मंडळ स्तरावर काढण्यात आलेल्या 168 निविदांपैकी 8 निविदा प्राप्त झाल्या. यासंदर्भात लवकरच कंत्राटदारांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत पाच लाख 20 हजार शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिल्याचे बावनकुळे यांनी शेवटी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget