(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘सर्जिकल स्ट्राईक दिन’ मंत्रालयात साजरा | मराठी १ नंबर बातम्या

‘सर्जिकल स्ट्राईक दिन’ मंत्रालयात साजरा

भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त

मुंबई ( २९ सप्टेंबर २०१८ ) : भारतीय लष्कराने 29 सप्टेंबर 2016 रोजी नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यादरम्यान (सर्जिकल स्ट्राईक) गाजविलेल्या असामान्य शौर्याचा अभिमान व सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मंत्रालयात ‘सर्जिकल स्ट्राईक दिन’ साजरा करण्यात आला.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह, सचिव शिवाजी दौंड, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सतीश खाडे, छाया वडते, मुंबई उपनगरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिनल पाटील आदी उपस्थित होते.

18 सप्टेंबर 2016 रोजी दहशतवाद्यांनी काश्मिरमध्ये उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी लष्कराने नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन धाडसी हल्ला करण्याची सर्जिकल स्ट्राईक मोहीम अंमलात आणून दहशतवाद्यांचा खात्मा केला. या घटनेच्या अनुषंगाने 29 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात ‘सर्जिकल स्ट्राईक दिन’ म्हणून साजरा करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. त्यानिमित्त आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक तसेच दिवंगत सैनिकांच्या पत्नींचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सचिव दौंड यावेळी म्हणाले, आपले सैनिक देशांच्या सीमांचे रक्षण खंबीरपणे करत असल्यामुळे आपण सुरक्षितपणे झोप घेतो. महाराष्ट्र आणि शौर्य याचा फार मोठा इतिहास आहे. सैन्यामध्ये महाराष्ट्राने मोठे योगदान दिले आहे. आपल्या सैनिकांनी प्रसंगी प्राणांची बाजी लावून देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले आहे. त्यांचा आपणा सर्वांना अभिमान आहे.

जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, आपल्या सैनिकांना देश रक्षणाच्या कामाप्रसंगी अनेक कठीण प्रसंगांना, वातावरणातील बदलांना सामोरे जावे लागते. परंतु, आपल्या कर्तव्यात ते कोणतीही कसूर होऊ देत नाहीत. स्वातंत्र्यानंतर आपल्याला अनेक युद्धांना सामोरे जावे लागले; मात्र सैनिकांनी धैर्य आणि मोठे शौर्याने सामोरे जात शत्रूला धूळ चारली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून शत्रूच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करणारी आहे, असेही ते म्हणाले.

सर्जिकल स्ट्राईक व सैन्यदलाच्या माहितीवर आधारित माहितीपट यावेळी दाखविण्यात आले. तसेच आपल्या शूर सैनिकांचा अभिमान असल्याचा संदेश पोहोचविण्यासाठी कॅनव्हास बोर्डवर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget