(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रालय परिसर व विस्तारित इमारतीची मुख्य सचिवांकडून पाहणी | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रालय परिसर व विस्तारित इमारतीची मुख्य सचिवांकडून पाहणी

मुंबई (13 ऑक्टोबर 2018 ) : स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्त मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज मंत्रालय परिसर आणि मंत्रालय विस्तारित इमारतीची पाहणी करून संपूर्ण परिसर, मंत्रालयातील कॉरिडॉर स्वच्छ ठेवतानाच स्वछतागृहांच्या साफसफाईवर देखील भर देण्याच्या सूचना दिल्या. ज्या विभागांचे लाकडी सामान, फर्निचर, रद्दी आणि बांधकाम साहित्य मंत्रालयातील कॉरिडोर व परिसरात आहे त्याची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन ते तीन दिवसात द्यावी त्यानुसार संबंधित विभागांना हे सामान हटविण्याबाबत कळविण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

अभ्यागतांसाठी मंत्रालयात प्रवेश सुलभ होण्याकरिता गार्डन गेट भागात अधिक पास काऊंटर सुरू करणे एक्स-रे मशिनची संख्या वाढविणे आणि मंत्रालयातील पार्किंग संदर्भात पर्यायी व्यवस्था तयार करणे याबाबत मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

सकाळी अकराच्या सुमारास मुख्य सचिवांनी विविध विभागाच्या सचिवांसमवेत मंत्रालयातील संपूर्ण परिसर, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या पायऱ्या, जनता जनार्दन गेट जवळील शेड, त्या बाजूला असलेले गार्डन आणि चिलिंग प्लांट या संपूर्ण परिसराची पाहणी केली. या ठिकाणी आढळून आलेले अनावश्यक साहित्य तातडीने हटविण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. सध्या मंत्रालयाचे रंगरंगोटीचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे साहित्य वगळता अनावश्यक साहित्य तातडीने हटवावे, असे निर्देश मुख्य सचिव यांनी यावेळी दिले.

मंत्रालयाच्या आवारात पडून असलेल्या सामानाबाबत दर आठवड्याच्या शेवटी आढावा घेऊन पडीक साहित्य हटविण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

मंत्रालय परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्य सचिवांनी विस्तारित इमारतीचीही पाहणी केली. विस्तारित इमारतीचा तळमजला, टपाल कार्यालयाचा परिसर,अभिलेख कक्ष, पहिल्या मजल्यावरील आदिवासी विभागाचे कार्यालय, रोटा प्रिंटिंग प्रेसचा भाग त्याचबरोबर पहिल्या मजल्यावर नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची देखील पाहणी मुख्य सचिव यांनी केली.

मंत्रालयाच्या कोरिडॉरमध्ये ज्या विभागांनी कपाट, कागदपत्रे, फर्निचर ठेवले आहेत त्यांची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने करून ती दोन ते तीन दिवसात सादर करावी, जेणे करून संबंधित विभागांना हे सामान हटविण्याबाबत निर्देश देता येतील, असे मुख्य सचिव यावेळी म्हणाले. विस्तारीत इमारतीत स्वछतागृहांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. २५ पैकी १५ स्वछतागृहांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित नोव्हेंम्बर अखेरपर्यंत पूर्ण करावे अशा सूचनाही मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांचा प्रवेश अधिक सुलभ होण्यासाठीही यावेळी मुख्य सचिवांनी चर्चा केली. मंत्रालयात प्रवेश देण्यापूर्वी अभ्यागत गार्डन मध्ये येतील तेथे त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर त्यांना प्रवेशाचा पास मिळेल ही प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासाठी पास काऊंटर वाढवावेत, तपासणी एक्सरे मशीनची संख्या वाढविल्यास नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही, यादृष्टीने कार्यवाहिच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्रालयातील पार्किंगबाबतही यावेळी चर्चा झाली आणि त्यासाठी काही पर्यायांचा विचार सुरू असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

यावेळी उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सचिवांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन आपल्या कार्यालयाची स्वछता केली.

यावेळी मंत्रालयात स्वच्छतेसाठी विशेषतः धूळ साफ करण्यासाठी हाताने चालविण्यात येणाऱ्या साधनांची पाहणी मुख्य सचिवांनी केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget