(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने पटकावले ९ सुवर्ण पदक | मराठी १ नंबर बातम्या

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने पटकावले ९ सुवर्ण पदक

२३ पदकांसह महाराष्ट्र देशात अव्वल

नवी दिल्ली ( ६ ओक्टोबर २०१८ ) : ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०१८’ च्या विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी करत ९ सुवर्ण, ८ रजत आणि ६ कांस्य असे एकूण २३ पदक मिळवित अव्वल स्थान पटकाविले आहे. यातील सुवर्ण व रजत पदक विजेत्या स्पर्धकांची पुढील वर्षी रशिया येथे होणा-या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठीही निवड झाली असून ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्यावतीने येथील एरोसीटी भागात ३ ते ५ ऑक्टोबर २०१८ या कालावधित पार पडलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचा निकाल आज घोषित झाला. विज्ञान भवन येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे आणि प्रसिध्द दिग्दर्शक माध्यम व मनोरंजन कौशल्य परिषदेचे अध्यक्ष तथा सुभाष घई यांच्या हस्ते आज या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार

या स्पर्धेत सर्वाधिक २३ पदक मिळवून महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. ओडिशा २१ पदकांसह दुस-या तर प्रत्येकी १६ पदक मिळवून कर्नाटक व दिल्ली तिस-या स्थानावर राहिले आहेत.

महाराष्ट्राची दमदार कामगिरी

देशभरातील २७ राज्यांतील ४०० पेक्षा अधिक स्पर्धक या कौशल्य स्पर्धेच्या महाकुंभात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून २२ कौशल्य प्रकारात ४४ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राने ९ सुवर्ण, ८ रजत आणि ६ कांस्य असे एकूण २३ पदक पटकाविली आहेत.

सुवर्णपदक विजेते

तुषार फडतरे या स्पर्धकाने ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. इलेक्ट्रीकल इंस्टॉलेशन प्रकारात वैभव राऊत, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग प्रकारात ओंकार खाडे, मेकाट्रॉनिक्स प्रकारात पार्थ साहु आणि रतिकांत मिश्रा, मोबाईल रोबोटिक मध्ये करण पाटील आणि निहार दास, श्रेणीक गुगळे यांनी प्रिंट मिडीया टेक्नॉलॉजी प्रकारात तर संजय कुमार यांनी वॉल अँड फ्लोअर टायलींग प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले.

रजत पदकाचे मानकरी

सूरज पाटील यांना ऑटो बॉडी रिपेअरींग प्रकारात सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली मात्र त्यांनी उपविजेते ठरत रजत पदकावर नाव कोरले. क्लाऊट कॉम्प्युटींग प्रकारात ओंकार बहीवाल, ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजीमध्ये श्वेता रतनपुरा, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलींग मध्ये दिव्या गोडसे, मोबाईल रोबोटिक मध्ये ओंकार गुरव आणि रोहन हानगी, प्रिंट मिडीया टेक्नॉलॉजी मध्ये साहिल जमदार तर वेल्डिंग मध्ये प्रतिक कसारे यांनी रजत पदक मिळविले.

कांस्य पदकाचे मानकरी

थ्रीडी गेम आर्ट प्रकारात गंधार भंडारी याने राज्याला कांस्य पदक मिळवून दिले. ब्युटी थेरपी मध्ये कोमल कोंडलीकर, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलींग अंकुश देशमुख, फ्लोरिस्ट्री मध्ये श्रीराम कुलकर्णी, प्रिंट मिडीया टेक्नॉलॉजी मध्ये श्रीनिवास कुलकर्णी तर रेफ्रिजरेशन अँड एयर कंडीशनींग प्रकारात सैफ अली खान याने कांस्य पदक पटकाविले.

रशियातील कझान मध्ये ऑगस्ट २०१९ मध्ये आयोजित होणा-या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत भारतातील प्रतिभावान युवक -युवतींना सक्षमपणे देशाचे नेतृत्व करता यावे, यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्यावतीने देशातील विविध राज्यांच्या कौशल्य विकास विभागाला सूचित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेने यासाठी जानेवारी २०१८ पासून राज्यातील प्रत्येक जिल्हयांमध्ये कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले. यात २०२२ स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यातून विभागीय, राज्य आणि नंतर देशातील विविध राज्यांचे विविध विभागात विभाजन करून जयपूर व बेंग्लुरु येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व चाळण्यांमधून महाराष्ट्रातील ४४ स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली व अंतिमत: महाराष्ट्रोन उत्तम कामगिरी करत २३ पदक या स्पर्धेत पटकावत अव्वल स्थान काबिज केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget