(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); खैरे कुणबी समाजाच्या विकासासाठी शासनाची सर्वतोपरी मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

खैरे कुणबी समाजाच्या विकासासाठी शासनाची सर्वतोपरी मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ( २० जानेवारी २०१९ ) : खैरे कुणबी समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षणाच्या ठिकाणी वसतीगृहे बांधून देणे तसेच सुशिक्षित मुलांना स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी 10 लाखापर्यंत कर्जपुरवठा करण्याचेही शासनाच्या विचाराधीन असून, समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

स्व. विमलाबाई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज येथे आयोजित खैरे कुणबी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री संजय देवतळे तर व्यासपीठावर वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे, आमदार सुधाकर कोहळे, डॉ. परिणय फुके, माजी आमदार देवराव रडके आदि यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, झाडे कुणबी, खैरे कुणबी तसेच ओबीसींसाठी राज्य शासनाने स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले आहे. त्यासाठी 3 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून, आता नॉन क्रिमीलेअरसाठी उत्पन्नवाढीची मर्यादा अडीच लाख रुपयांवरुन 8लाखावर आणण्याचे काम सुरु आहे. राज्य शासन ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असून, त्यासाठी निधीही मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहे. राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींसाठी विविध योजना राबविण्यासाठी 700कोटींचा निधी मंजूर केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासन ओबीसींच्या तरुणांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी मदत करणार असून, महाराष्ट्र शासन राज्यात ओबीसींसाठी 36 हॉस्टेल बांधणार आहे. त्यापैकी 19 वसतीगृहांना नुकतीचमान्यता देण्यात आली असून, त्यापैकी नागपुरात 4 वसतीगृहांचे लवकरच उदघाटन करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

खैरे कुणबी समाजाने निवेदनातून दिलेल्या मागण्यांचा राज्य शासन सकारात्मक विचार करेल. समाजाने सामाजिक भवन बांधण्यासाठी जागा शोधावी. त्यांना समाजभवन बांधण्यासाठी भविष्यात नक्कीच मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते खैरे कुणबी समाजाच्या स्मरणिका व दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खैरे कुणबी समाजाच्या वतीने ओबीसी मित्र म्हणून सन्मान करण्यात आला.

झाडे कुणबी समाज वधू वर मेळावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे उदघाटन केले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. परिणय फुके, राजेश चुटे, कैलाश शिवणकर उपस्थित होते. ओबीसीच्या न्यायहक्कासाठी या शासनाने सहकार्य केल्याचे आमदार सुधाकर कोहळे यांनी सांगीतले.

यावेळी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय व संवैधानिक अधिकार मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले. कुणबी समाजाच्या आशीर्वादाने राज्याच्या सेवेची संधी मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून समाजाची जागेची मागणी आहे. झाडे कुणबी समाज दरवर्षी वधू-वर परिचय मेळावा आयोजित करतो. त्यामुळे मेळावा आयोजित करण्यासाठी समाजाला जागा देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget