(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विठाबाई नारायणगावकर पुरस्कारासाठी उमेदवाराची निवड योग्य | मराठी १ नंबर बातम्या

विठाबाई नारायणगावकर पुरस्कारासाठी उमेदवाराची निवड योग्य

- सांस्कृतिक विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई ( १३ फेब्रुवारी २०१९ ) : दरवर्षी तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावे तमाशा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्ददल कलाकारास जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार वगनाट्य लेखक व गीतकार असणाऱ्या बशीर कमरुदिन मोमीन (कवठेकर) यांना घोषित करण्यात आला आहे, त्यांची ही निवड योग्यच आहे, असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहे.

तमाशा ही महाराष्ट्राची नावलौकीक प्राप्त झालेली पारंपरिक लोककला असून या कलेच्या जतन व संवधर्नासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. शासन दरवर्षी तमाशा या कलेचा गौरव व्हावा यासाठी या क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या मान्यवरास जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करीत असते. यासाठी शासनाने कलाकार, तज्ञ तसेच अभ्यासक अशी समिती गठित केली असून या समितीच्या शिफारशीने तमाशा क्षेत्रातील व्यक्तीला शासन पुरस्कार घोषीत करते.

मोमीन यांनी गण, गवळणी, पोवाडे, भक्तीगीते, भावगीते, भारुडे, लावणी, वगनाट्य अशा विविध प्रकाराच्या प्रभावी लेखणीने तमाशा क्षेत्रात भरीव योगदान दिलेले आहे. तसेच सलग 50 वर्ष महाराष्ट्रातील तमाशा फडांना गण, गवळणी, लावण्या व वगनाट्य त्यांनी पुरवली आहेत. रघुवीर खेडकर, अमन तांबे, लक्ष्मण टाकळीकर यांच्या लोकनाट्यांना त्यांच्या लेखनीने उपकृत केले आहेच. त्याशिवाय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशाने तर त्यांच्या गीतामुळे प्रसिध्दीचे शिखर सर केले होते. नेताजी पालकर, भ्रमाचा भोपळा व भंगले स्वप्न माझे या वगनाट्यात त्यांनी भूमिकाही केल्या आहेत. दत्ता महाडिक पुणेकर, काळूबाळू लोकनाट्य, रघुवीर खेडकर, गंगारामबुवा कवठेकर अशा नामांकीत लोकनाट्य मंडळात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत.

तमाशा क्षेत्रात अनेक अंगाने काम करणारे अनेक घटक असतात. नृत्यांगना, गायिका, सोंगाड्या, अभिनय, पार्टी प्रमुख, सरदार, शाहीर, नेपथ्यकार, पडदयावर चित्र काढणारे चित्रकार, पोस्टर करणारे पेंटर, लावण्या लिहिणारे गीतकार, वगनाट्य लेखक, ढोलकीवादक, हर्मोनियम वादक, तबला वादक, धिमडी-तुणतुणे-मंजिरी-झिलकरी इत्यादी घटक तमाशामध्ये काम करीत असतात. त्यामुळे केवळ कलेचे सादरीकरणामुळेच तमाशा हा पूर्ण होत नसून त्याला या सर्व घटकांची जोड आवश्यक आहे. अलीकडे कालानुरुप बदल होऊन नवनव्या संकल्पना समोर येऊ लागल्या आहेत.

बशीर कमरुदिन मोमीन (कवठेकर) यांचे या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. तसेच त्यांचे या क्षेत्रातील कार्य पाहता या वर्षीच्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराकरिता समितीने बशीर कमरुदीन मोमीन (कवठेकर) यांची केलेली निवड ही योग्यच आहे, असे सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget