(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी जागतिक स्तरावर समन्वय साधून संशोधनाला प्रोत्साहन द्यावे - चे. विद्यासागर राव | मराठी १ नंबर बातम्या

संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी जागतिक स्तरावर समन्वय साधून संशोधनाला प्रोत्साहन द्यावे - चे. विद्यासागर राव

नागपूर ( ५ फेब्रुवारी २०१९ ) : संस्कृत भाषेला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून जर्मन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी प्रमुख विद्यापीठामध्ये संस्कृत भाषेचे अध्ययन होत आहे. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाने जगातील विद्यापीठांसोबत समन्वय साधून संस्कृत अध्ययनासोबत संशोधनाला प्रोत्साहन देत एक प्रमुख अध्ययन केंद्र म्हणून विकसित करावे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

रामटेक येथील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ तसेच नवीन शैक्षणिक भवनाचे लोकार्पण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले तसेच गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे अनावरण व शारदापीठाचे शिलान्यास अनावरण राज्यपालांच्या हस्ते झाले.

यावेळी पेजावरमठाधिपती श्रीविश्वेशतीर्थ श्रीपाद, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मल्लिकार्जून रेड्डी, आमदार गिरीश व्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी, कुलगुरु श्रीनिवास वरखेडी, माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

देशाला संपन्न अशी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. भारतीय जीवनपद्धती आणि ज्ञानपद्धती जगातील सर्वोत्तम मानली जाते. संस्कृत ही अनेक भाषांची जननी असून या भाषेच्या विविध साहित्यप्रकारात अनमोल ज्ञानठेवा असल्याचे सांगताना राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले की, सुश्रुतसंहिता, चरकसंहिता या सारख्या आरोग्यविषयक तसेच भास्कराचार्यांच्या लिलावती या ग्रंथांमध्ये गणितविषयक मूलभूत विचार आपणास पहावयास मिळते. भास्कराचार्यांनी खगोल गणितात केलेले कार्य महान असून त्यांच्या कार्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

जगात संस्कृत, भारतीय प्राच्यविद्या यांचा अभ्यास व या विषयातील विविध शाखांमध्ये मोठ्या प्रमाणांवर मूलभूत संशोधन होत आहे. जर्मनी व अमेरिका हे देश यामध्ये अग्रेसर आहेत. योग आणि आयुर्वेदाबाबत जगभर केवळ औत्सुक्यच वाढते आहे, असे नव्हे तर या दोन्हीचा स्विकार जगभर होतांना दिसत आहे. संस्कृत भाषेच्या शिक्षणात विद्यापिठाने अधिक समन्वय साधून यामधील संशोधनास प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले.

कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ तसेच नवीन शैक्षणिक भवनाचे लोकार्पण होत आहे ही बाब प्रेरणादायी असून गोळवलकर गुरुजी यांच्यासारख्या ‘युगद्रष्ट्या’ व्यक्तीला ही अनुरुप आदरांजली आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, संस्कृत ही अनेक भाषांची जननी असून विविध विषयातील ज्ञानभांडार संस्कृत साहित्यात आढळते. इराण व जर्मनीमध्ये आयुर्वेद तसेच संस्कृत भाषेत मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असल्याचे पहावयास मिळते. योग आणि आयुर्वेदाचा स्विकार आता साऱ्या जगाने केलेला आहे. भारतीय जीवनपद्धतीचे आणि संस्कृतीचे आचरण जगात अनेक ठिकाणी केले जात आहे. संस्कृत भाषा केवळ एका विशिष्ठ वर्गाची नसून विद्यापीठाच्या संस्कृत भाषेसाठीच्या प्रचारामुळे ही भाषा सर्वसामान्यापर्यंत पोहचत आहे. विद्यापीठाने यापुढे परिसरातील शाळा महाविद्यालयांशी समन्वय साधून संस्कृत संभाषण वर्ग अधिक प्रभाविपणे घ्यावेत. यामुळे सर्वसामान्यापर्यंत संस्कृत पोहचविणे शक्य होईल.

देशात सुरु असलेल्या विकासकामांबद्दल गडकरी म्हणाले, गंगा ही भारतीयांसाठी केवळ नदी नसून ती जीवनप्रणाली व श्रध्देचा विषय आहे. गंगा शुध्दीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु असून विविध टप्प्यांमध्ये अनेक प्रकल्प यासाठी राबविले जात आहेत. गंगा शुध्दीकरणाचे काम प्रगतीपथावर असून गंगा नदीतून वाराणसी ते हल्दीया असा जलमार्गही नुकताच सुरु करण्यात आला आहे. याबरोबरच गंगा नदीच्या काठावर वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमेचे कामही मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. बद्रीनाथ, केदारनाथ व गंगोत्रीकडे जाणाऱ्या रस्ते व महामार्गांची कामेही प्रगतीपथावर असल्याचे गडकरी यांनी सांगितले. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ तसेच नवीन शैक्षणिक भवनाचे लोकार्पण ही वास्तू साकारणे ही बाब आनंददायी आहे. गोळवलकर गुरुजींचा रामटेकशी निकटचा संबंध होता. राष्ट्रनिर्मितीबाबतचे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या स्थापनेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व माजीमंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांचे योगदान मोलाचे असल्याचे गडकरी यांनी आर्वजून नमूद केले.

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे स्वतंत्र एक्सप्रेस फिडर बसविण्यात येणार असल्याचे तसेच विश्वविद्यालयात सौरऊर्जा संयंत्राव्दारे वीज निर्मिती करुन वीजेच्या बाबतीत विश्वविद्यालय स्वयंपूर्ण करणार असल्याचे यावेळी घोषित केले.

पेजावरमठाधिपती श्री. विश्वेशतीर्थ श्रीपाद म्हणाले, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ तसेच नवीन शैक्षणिक भवनाचे लोकार्पण ही आनंददायी बाब असून रामटेक ही विद्याभूमी आहे. सनातन भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी संस्कृत भाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. सर्वच भाषा आवश्यक व सन्माननिय आहे. सर्वच भाषांच्या साहित्यांमध्ये विपुल ज्ञानसाठा आहे. या सर्वातून आपण ज्ञान घेतले पाहिजे. संस्कृत भाषा सूर्यासमान तेजस्वी असून भारतीय संस्कृतीचे प्रतिबींबच यामध्ये असल्याचेही श्री. विश्वेशतीर्थ श्रीपाद यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी म्हणाले, प्राचिन भारतीय परंपरेत गुरुकुलाचे महत्व अनन्यसाधारण असून कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ तसेच नवीन शैक्षणिक भवनाच्या लोकार्पणानिमित्ताने ही गौरवशाली परंपरा जपली जात आहे. विद्यादानाचे कार्य महान असून ज्ञानसाधना करणाऱ्या साधकांची व निस्पृहपणे कार्य करणाऱ्यांची आज देशाला आवश्यकता आहे. संस्कृतभाषा, त्यातील साहित्य, योग व आयुर्वेदाचा संपूर्ण जगाने स्विकार केला असल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले. प्रास्ताविकात कुलगुरु श्रीनिवास वरखेडी म्हणाले, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे संस्कृत भाषा व त्यातील विविध शाखांमधील विषयात संशोधन कार्य सुरु आहे. भविष्यासाठी संस्कृत, सर्वांसाठी संस्कृत व नवोन्मेषासाठी शास्त्रे ही तीन उद्दीष्टे समोर ठेवून विद्यापीठ कार्यरत आहे. कवी कुलगुरु कालिदास यांच्या समग्र वाङमयाचा मराठीत अनुवाद करण्यात आले असून याचे प्रकाशन लवकरच करण्यात येणार आहे. भारतीय प्राच्यविद्येच्या अभ्यास व संशोधनाला प्रोत्साहन देणे तसेच पाली भाषेच्या अभ्यास व संशोधनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाव्दारे प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे वरखेडी यांनी सांगितले.

यावेळी प्रमिलाताई मेंढे, राष्ट्रसेविका समितीच्या शांताक्का, मुकुल कानिटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ए. एम. पातूरकर, संस्कृत भारतीचे दिनेश कामत, माजी कुलसचिव डॉ. अरविंद जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थिनींनी विश्वविद्यालय गीत सादर केले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget