(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून 80टक्के स्थानिक युवकांना रोजगार देणार - सुभाष देसाई | मराठी १ नंबर बातम्या

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून 80टक्के स्थानिक युवकांना रोजगार देणार - सुभाष देसाई

नागपूर ( २७ जानेवारी २०१९ ) : विदर्भाचा भाग खनिजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यामुळे खनिकर्मावर आधारित खनिज प्रक्रिया उद्योग यापुढे येथेच स्थापन करुन 80 टक्के स्थानिकयुवकांना रोजगार प्राप्त करुन देणार असल्याचे प्रतिपादन उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

विदर्भातील तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्यसाठी उद्योग विभाग आणि कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने दीक्षाभूमी जवळील ब्लाईंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले हायस्कूल सभागृहात आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी उद्योग मंत्री बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, महाराष्ट्र खनिकर्म मंडळाचे अध्यक्ष ॲड.आशिष जयस्वाल, अतिरिक्त उद्योग संचालक व्ही.एल. राजाळे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती नंदा लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यात उद्योजकांची गुंतवणूक वाढावी, नवनवीन उद्योग यावे आणि या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार प्राप्त व्हावा या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी पुणे, वाशी –नवी मुंबई,नाशिक, कोल्हापूर, गोरेगाव-मुंबई, औरंगाबाद असे विभागस्तरीय रोजगार मेळावे संपन्न झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई म्हणाले, औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्यात पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ एका छताखाली उपलब्ध व्हावे यासांठी आतापर्यंत राज्यभर विविध ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. नागपूर मध्ये आयोजित करण्यात आलेला आजचा सातवा रोजगार मेळावा आहे. या माध्यमातून येथील स्थानिकांना नोकरीची उत्तम संधी निश्चितच मिळेल. विदर्भ हा उद्योग क्षेत्रात भरारी घेत असून देशांतर्गंत व देशाबाहेरीलगुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उद्योगांना लागणारे पूरक वातावरण उद्योग विभागाकडून निर्माण करण्यात येत आहे. उद्योगधंद्याना कौशल्ययुक्त उमेदवारांची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ शालेय व महाविद्यालयीन शिक्षणावरच अवलंबून न राहता आपल्यातील कौशल्य विकसित करावे. विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तींची निकड उद्योगधंद्यांना नेहमीच असते. आजच्या स्पर्धेच्या युगात मागे न राहता प्रत्येकाने कौशल्य विकसीत करुन रोजगाराची संधी प्राप्त करुन घ्यावी. कौशल्य विकास केंद्रांच्या वतीने युवकांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात येत असते. या संधीचा फायदा तरुणांनी करुन घेण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी केले.

आपला देश हा तरुणांचा देश आहे. आपल्याकडे 60 टक्के देशाची लोकसंख्या ही 35 वर्षे वयापेक्षा कमी आहे. राज्यात उद्योगनिर्मितीला चांगले वातावरण आणि तरुण लोकसंख्येचे प्रमाण यामुळे राज्यात मोठे उद्योग स्थापन करण्यावर भर देण्यात येत आहे. पूर्वी खनिकर्मावर आधारित प्रक्रिया उद्योग वीज दर कमी असल्यामुळे इतर राज्यांमध्ये स्थापन करण्यात येत होते. परंतु आता खनिकर्मावर प्रक्रिया करणारे उद्योग त्या स्थानिक भागातच निर्माण करुन तेथील स्थानिकांना रोजगार प्राप्त करुन देण्यात येईल. या माध्यमातून 80 टक्के स्थानिक युवकांना रोजगार प्राप्त होईल, असेही ते यावेळी म्हणाले. पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे म्हणाले, आज राज्यातील उच्चशिक्षीत युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या आधुनिकीकरणा बरोबर रोजगारांची संख्या कमी होत जाईल. यासाठी प्रत्येकाने कौशल्य विकसीत करणे गरजेचे आहे. खनिकर्म उद्योगांना वीजदरात सबसिडी देण्यात येईल. आज छत्तीसगड व मध्यप्रदेशपेक्षा कमी दराने वीज महाराष्ट्रातील उद्योगांना पुरविली जाते. उद्योग विभाग व उर्जा विभाग एकत्र आल्याशिवाय बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रास्ताविक करताना अतिरिक्त उद्योग संचालक

व्ही.एल.राजाळे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जवळपास 65 पेक्षा अधिक कंपनींचे प्रतिनिधी येथे असून साडेचार हजार पेक्षा जास्त नोकऱ्या येथील उमेदवारांना प्राप्त होतील. रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणी करण्यासाठी ऑफ लाईन आणि ऑन लाईन या

दोन्ही पध्दतींचा वापर सुरु आहे. आतापर्यंत साडेसहा हजार ऑनलाईन तर 500 अर्ज ऑफलाईन पध्दतीने भरण्यात आले आहे. प्राथमिक स्थरावर आज विविध कंपन्यांमार्फत मुलाखती घेऊन आजच नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. उमेदवारांना आपल्या पसंतीच्या ठिकाणी रोजगार मिळविण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे. मिहानमध्ये देखील विविध कंपन्या कार्यरत आहेत. येथे देखील कौशल्य विकसीत उमेदवारांना मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर तर आभार उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी यांनी मानले. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातील विविध कंपनींच्या स्टॉल्सला भेटी दिल्यात.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget