(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : गडनदी मध्यम प्रकल्पास 950 कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळ बैठक : गडनदी मध्यम प्रकल्पास 950 कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 20 : रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी मध्यम प्रकल्पाच्या 950 कोटी 37 लाख इतक्या किंमतीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे संगमेश्वर तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे.

गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या कुचांबे (ता. संगमेश्वर) येथे गडनदीवर 83.212 दलघमी क्षमतेच्या धरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये (PMKSY) करण्यात आला असून धरणाच्या बुडीत क्षेत्रालगतच्या संगमेश्वर तालुक्यातील 393 हेक्टर क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना नियोजित करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत 47 कि.मी.च्या उजव्या कालव्याद्वारे चिपळूण तालुक्यातील 10 गावांतील 1366 हेक्टर, संगमेश्वर तालुक्यातील 5 गावांमधील 520 हेक्टर आणि 27 कि.मी.च्या डाव्या कालव्याद्वारे संगमेश्वर तालुक्यातील 6 गावांतील 832 हेक्टर याप्रमाणे एकूण 3111 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. प्रकल्पाचा संकल्पित उपयुक्त पाणीसाठा 83.212 दलघमी असून एकूण पाणीवापर 85.957 दलघमी इतका आहे.

या प्रकल्पास 1982-83 च्या दरसूचीवर आधारित 10 कोटी 37 लाख इतक्या रकमेस मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 1998-99 च्या दरसूचीवर आधारित 112 कोटी 80 लाख इतक्या रकमेस प्रथम सुप्रमा, 2007-08 च्या दरसूचीवर आधारित 419 कोटी 81 लाख इतक्या रकमेस द्वितीय सुप्रमा आणि 2009-10 च्या दरसूचीवर आधारित 651 कोटी 42 लाख इतक्या रकमेस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रस्तावानुसार 2013-14 च्या दरसूचीवर आधारित 950 कोटी 37 लाख किंमतीस आजच्या बैठकीत चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या रकमेपैकी 909 कोटी 50 लाख रुपये मुख्य कामासाठी आणि 40 कोटी 87 लाख रुपये इतर खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget