(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यातील सिंचन प्रकल्पांमुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सिंचित होणार - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी | मराठी १ नंबर बातम्या

राज्यातील सिंचन प्रकल्पांमुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सिंचित होणार - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

· धुळे- नरडाणा रेल्वे मार्ग, सुलवाडे- जामफळ- कनोली

· उपसा सिंचन योजनांसह विविध योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न


धुळे, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : देशासह महाराष्ट्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री सिंचाई कृषी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत देशभरातील 99 प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील 26 प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे तीन लाख 75 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते बळिराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत 2407.67 कोटी रुपये खर्चून होणाऱ्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा योजनेचे भूमिपूजन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत निम्न पांझरा मध्यम प्रकल्पाचा (अक्कलपाडा) लोकार्पण सोहळा, धुळे- नरडाणा नवीन रेल्वे मार्ग व जळगाव- मनमाड तिसरा रेल्वे मार्गाचे भूमिपूजन, धुळे महानगरपालिकेसाठी भारत सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत अक्कलपाडा धरणापासून धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक एकचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भुसावळ- वांद्रे टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या खानदेश एक्स्प्रेस, उधना- नंदुरबार व उधना- पाळधी मेमू ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त येथील गोशाळा मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन, दळणवळण, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार रावसाहेब दानवे, ए. टी. पाटील, डॉ. हीनाताई गावित, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार एकनाथराव खडसे, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, निम्न पांझरा प्रकल्प या प्रकल्पापैकी एक होता. त्यावर 550 कोटी खर्च करून प्रकल्प पुर्ण करण्यात आला आहे. राज्यातील पाणीटंचाईसह दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करीत आहे. बऱ्याचवर्षापासून रखडलेल्या या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि इतर दुष्काळग्रस्त भागासाठी 91 योजनांना मान्यता देण्यात आली आहे. त्यावर चौदा हजार कोटी खर्च होणार आहे.

धुळे शहराला पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अमृत योजनेअंतर्गत होणाऱ्या कामामुळे शहराचा पाणीप्रश्न दूर होईल. तापी नदीवरील सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेमुळे सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी आणि पशुपालकांचा विकास होईल.

धुळे शहरात नवे औद्योगिक शहर वसविण्याची क्षमता आहे. आगामी 30 वर्षात धुळे शहर हे सुरत शहराशी स्पर्धा करेल. नव्याने ‍निर्माण करण्यात येणाऱ्या दळणवळण सुविधेमुळे शहराचा वेगाने विकास होऊ शकेल. त्यासाठी धुळेकर नागरिकांबरोबर आपण आहोत, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, धुळे- नरडाणा हा रेल्वे मार्ग मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाला जोडणारा आहे. 9 हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. त्याचा मुंबईसह देशालाही लाभ होईल. तसेच जळगाव- मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळून रोजगाराची निर्मिती होईल. उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे व्यापार वाढेल. तसेच मुंबई-कलकत्ता दरम्यान 150 किलोमीटर अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांनाही हा मार्ग सोयीचा होणार आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर बी- बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करता येईल. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेसात लाख कोटी रुपये खर्च केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडे कर्ज मागण्यासाठी जावे लागणार नाही.

शेतकऱ्यांबरोबरच पशुपालकांना किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात येईल. या योजनेचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल. गावागावातील चलन- वलन वाढेल. गो माता व गो वंशाच्या संवर्धनासाठी कामधेनू आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. हा आयोग पशुधनाच्या सशक्तीकरणासाठी महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केला.

आयुषमान भारत योजनेत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचार केले जातात. त्यामुळे गरीब रुग्णांना लाभ झाला आहे. आतापर्यंत देशातील 12 लाख, राज्यातील 70 हजार आणि धुळे जिल्ह्यातील 1800 रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेच्या धुळे व जळगाव जिल्ह्यातील 20 लाभार्थ्यांशी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहावयास मिळाले.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देश शोकात असून संतप्त भावना उमटत आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात दुख:चे अश्रू आहेत. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या मातीतील वीर जवानांचा समावेश आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून भारत नव्या धोरणाचा देश असल्याचा अनुभव जगाला येईल. हल्ला करणाऱ्यांना किंवा त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध योग्य कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

धुळे शहर होईल खानदेशचा मुकुटमणी - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुजरात व मध्य प्रदेश राज्यांसाठी धुळे जिल्हा हा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. या जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्ग जातात. सात राष्ट्रीय महामार्ग जाणारा हा देशातील एकमेव जिल्हा असावा. येथे लॉजिस्टिक हब तयार होवू शकेल, अशी भौगोलिक रचना आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी धुळे शहराची क्षमता ओळखली. आगामी काळात मुंबई-दिल्ली कॉरिडॉर हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच रेल्वे, महामार्ग, पाण्याची उपलब्धता यामुळे या शहराचा आगामी काळात चेहरा- मोहरा बदलेला दिसेल.

प्रधानमंत्री मोदी यांनी रेल्वे मार्गाचे स्वप्न वास्तवात आणले. धुळे जिल्ह्यात शाश्वत सिंचनाची जगप्रसिद्ध अशी फड सिंचन पद्धत होती. या पद्धतीवर जगात संशोधन झाले आहे. असा धुळे जिल्हा सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेमुळे सुजलाम- सुफलाम होईल. धुळे व शिंदखेडा तालुक्यात नंदनवन तयार होईल. दुष्काळ निवारणासाठी निकषात बदल करीत प्रधानमंत्री मोदी यांनी या योजनेला चालना दिली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांचा पाठपुरावा व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे. याशिवाय धुळे शहरासाठी अक्कलपाडा धरणावरुन नवीन पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, 100 कोटी खर्च करुन रस्ते असा एकूण पाचशे कोटी रुपयांचा निधी गेल्या 4 महिन्यात जिल्ह्याला उपलब्ध करुन दिला आहे. आगामी काळात धुळे शहराचा सर्वांगीण विकास होवून धुळे शहर खानदेशचा मुकुटमणी होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळ निवारणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सुलवाडे- जामफळ योजनेची जलसंसाधन मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गती दिली. या योजनेचा धुळे व शिंदखेडा तालुक्याना लाभ होईल. या योजनेसाठी 25 टक्के भारत सरकार, तर 75 टक्के नाबार्डकडून कर्जपुरवठा उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे सुमारे दीड लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल. याशिवाय मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी 9 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे इंदूर-मुंबई दरम्यानचे अंतर कमी होईल. याशिवाय जिल्ह्यात विविध महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. विविध विकास कामांमुळे धुळे जिल्ह्याचा कायापालट होईल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, सुलवाडे बॅरेजमुळे तापी नदी भर उन्हाळ्यात दुथडी भरलेली असते. या पाण्याचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून सुलवाडे- जामफळ- कनोली योजनेसाठी पाठपुरावा केला. या योजनेमुळे सुमारे दोनशे गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. तसेच मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी 2014 पासून प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी प्रधानमंत्री मोदी, तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व नौकानयन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले.

शहीद जवानांना आदरांजली

या कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामा (जम्मू- काश्मीर) जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना दोन मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली.
प्रधानमंत्र्यांनी जिंकली धुळेकरांची मने
अहिराणीतून केली भाषणाची सुरवात
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरवात स्थानिक बोलीभाषा अहिराणीतून केली. ते म्हणाले, ‘आठे जमेल खानदेशना तमाम भाऊ- बहिनीसले मना मन:पूर्वक नमस्कार. तुमी इतला लोके, माले आशीर्वाद देवाले उनात. मी तुमना आभारी शे. खानदेशना लोकेसना जिव्हाळाना प्रकल्प मा, मी सहभागी व्हयनू येना माले आनंद शे.’’, असे म्हणत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी धुळेकर नागरिकांची मने जिंकली.


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget