(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); धुळ्यात जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न | मराठी १ नंबर बातम्या

धुळ्यात जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न


धुळे ( ७ फेब्रुवारी २०१९ ) : शेतीत वेगवेगळे प्रयोग होत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. कृषी विभागाने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे. त्याबरोबरच शेतकऱ्यांनी मार्केटिंगचे तंत्र आत्मसात करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून आयोजित धान्य महोत्सव, शेतकरी व महिला बचत गटांच्या उत्पादित शेतमाल व सेंद्रिय शेतमाल विक्री व प्रदर्शन अर्थात जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, शेतकरी विनायक अकलाडे, राजेंद्र अकलाडे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुसे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली.

पालकमंत्री.भुसे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने राज्य शासनाने मदतीचा निर्णय घेतला आहे. त्याच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात लवकरच जमा करण्यात येईल. कांदा उत्पादक पात्र शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. अशा प्रकारच्या महोत्सवातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय पिकांची माहिती असलेली पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ही पुस्तिका उद्योजकांनाही उपयुक्त ठरू शकेल. या पुस्तिकेत प्रगतीशील शेतकऱ्यांची माहिती असून त्यांच्यापासून अन्य शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजित केला जातो. या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, कीटकनाशके, खते यांची माहिती उपलब्ध व्हावी तसेच शेतमालाला बाजारपेठ मिळावी म्हणून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करतील.

शेतकऱ्यांचा गौरव
या महोत्सवाच्या उदघाटनासाठी पालकमंत्री भुसे यांनी विनायक अकलाडे व राजेंद्र पाटील या शेतकऱ्यांना बोलावून घेतले. या शेतकरी दांपत्यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. तसेच शेतीत नवनवीन प्रयोग करून यश मिळविणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात कृषीभूषण पुरस्कार प्राप्त ॲड.प्रकाश पाटील, संजय भामरे, राजू पाटील, योगेश कुलकर्णी, छोटू पाटील, धर्मराज पाटील, विनायक अकलाडे, नीलेश पगारे, योगेश तोरवणे, राजेंद्र पाटील, भटू अहिरराव, दिलीप पटेल, हिरालाल परदेशी, संजय गुजर, अशोक पाटील, अरुण राजपूत, जयपाल राजपूत, नंदलाल जैन, गुलाब कोळी, संदीप पाटील, ज्ञानेश्वर पवार, छोटू कोळी, साहेबराव पवार, नाना पाटील, देविदास मोरे आदींचा सत्कार करण्यात आला. जगदीश देवपूरकर, राकेश गाळणकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘आत्मा’चे उपसंचालक मालपुरे यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget