(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे संक्रमण शिबिरांमध्येच कायम पुनर्वसन | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळ बैठक : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे संक्रमण शिबिरांमध्येच कायम पुनर्वसन

मुंबई ( ४ फेब्रुवारी २०१९ ) : मुंबई शहरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे शक्यतो त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे किंवा सुरु होणार आहे अशाच ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे झालेल्या घुसखोरीस जबाबदार असलेल्या म्हाडातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्‍यांच्यावर प्रचलित नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजे म्हाडाच्या मुंबई मंडळांतर्गत मुंबई शहरामध्ये एकूण 56 संक्रमण शिबिरे आहेत. यामध्ये 21 हजार 135 गाळे आहेत. राज्य शासनाच्या अखत्यार‍ित असलेले मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ 1977 मध्ये म्हाडामध्ये विलीन करण्यात आले. या मंडळाने केलेल्या तपासणीत जुलै 2013 अखेरपर्यंत संक्रमण शिबिरातील 8 हजार 448 गाळ्यांमध्ये अपात्र अथवा अनधिकृत रहिवाशी वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. यापैकी काही रहिवाशी 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी तेथे राहत आहेत. शिबिरातील अधिकृत, अपात्र आणि अनधिकृत रहिवाशांचे निवाऱ्यासंबंधीचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी संक्रमण शिबिरांच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे अथवा सुरू होणार आहे अशाच ठिकाणी शक्यतो त्यांचे कायम पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी त्‍यांची तीन प्रकारांत वर्गवारी करून पुनर्विकसित होणाऱ्या संक्रमण शिबिरांमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

संक्रमण शिबिरामध्ये स्थानांतरित मूळ रहिवाशांना त्यांच्या मूळ ठिकाणच्या पुनर्रचित इमारतीमध्ये गाळा देणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रस्तावित पुनर्रचित इमारतीमध्ये आहे त्याच ठिकाणी (in-situ) गाळे वाटप स्वीकारणे किंवा तेथील मालकी हक्क सोडण्याच्या अधीन राहून त्याचे संक्रमण श‍िबिरामध्ये कायम पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे नि:शुल्क पुनर्वसन करण्यात येईल. मात्र ,मुंबई दुरूस्ती मंडळास गाळेधारक सध्या देत असलेले भाडे आणि मेंटेनन्स शुल्कामध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. तसेच, पुनर्वाटप होईपर्यंतच्या कालावधीतील सर्व प्रकारची देणी त्यांनी म्हाडा प्राध‍िकरणास देणे आवश्यक राहणार असून पुनर्वसन करण्यात आलेल्या नवीन सदनिकेसाठी भविष्यात द्यावे लागणारे मासिक शुल्कही त्यांनाच द्यावे लागेल.

काही आर्थिक मोबदला देऊन मुखत्यारपत्र (power of attorney) किंवा अशा प्रकारच्या इतर प्राधिकार पत्राद्वारे मूळ रहिवाशांकडून अनियमितपणे किंवा बेकायदेशीररित्या हक्क घेतलेले गाळेधारकही संक्रमण शिबिरांमध्ये राहत आहेत. अशा प्रकारचा व्यवहार बेकायदेशीर असला तरीही त्यांनी काही आर्थिक रक्कम दिली असल्याने त्यांचा सहानुभूत‍पूर्वक विचार करण्यात आला आहे. सध्या राहत असलेल्या संक्रमण शिबिरातील गाळ्याच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (construction cost), त्यासोबत पुनर्वसित गाळ्यास पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधांचा खर्च (Infrastructure cost) त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल. त्यानंतर पुनर्वाटप करण्यात येणारे गाळे त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात येतील. यासाठी मुद्रांक शुल्क व इतर लागू असलेल्या सर्व प्रकारच्या शासकीय शुल्काची रक्कम गाळेधारकाने भरणे आवश्यक राहणार आहे.

गाळ्यांचे मूळ मालक आणि मुखत्यारपत्र धारकांव्यतिरिक्त या शिबिरांमध्ये अनधिकृतपणे ताबा घेतलेले घुसखोर देखील आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या मूळ अटी व शर्तींचे निकष लावून त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. निकष पूर्ण करणाऱ्‍या गाळेधारकांकडून सध्याच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (construction cost), पुनर्वसित गाळ्यास पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधांचा खर्च (Infrastructure cost) आणि या दोन्ही रकमेवर 25 टक्के दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुनर्वाटप करण्यात येणारे गाळे त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात येतील. त्‍यासाठी मुद्रांक शुल्क व लागू असलेले इतर सर्व प्रकारचे शासकीय शुल्क संबंधित गाळेधारकाने भरणे आवश्यक राहणार आहे.

मुखत्यारपत्र आणि घुसखोर या दोन्ही प्रवर्गातील गाळेधारकांचे पुनर्वसन शक्य असल्यास पुनर्विकास होत असलेल्या संक्रमण शिबिराच्या इमारतीमध्ये, आहे त्याच ठिकाणी (in-situ) करण्यात येईल. ते शक्य नसल्यास बृहन्मुंबई क्षेत्रातील इतरत्र उपलब्ध ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. तसेच या तिनही प्रवर्गातील ताबाधारकांना, ते सध्या मुंबई दुरूस्ती मंडळ किंवा सक्षम प्राधिकरणास सध्या देत असलेले भाडे व देखभाल खर्चांमध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. प्रस्तावित फेरवाटप जागेचा ताबा घेण्यापूर्वी देय असलेले सर्व मासिक शुल्क त्यांनी देणे आवश्यक असेल. अशी सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच संबंधित गाळेधारक फेरवाटपासाठी पात्र ठरणार आहेत. या सर्व रहिवाशांचे पात्र-अपात्रतेचे निकष ठरविण्याची कार्यवाही म्हाडाच्या स्तरावर करण्यात येईल. मूळ गाळेधारकास करण्यात येणारे सदनिकांचे वाटप त्याच्या आधारक्रमांकाशी संलग्न करण्यात येईल.

संक्रमण शिबिरातील रहिवाशांसंदर्भात उद्‌भवलेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेले आजचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. त्यानंतर आवश्यकता असल्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम-1976 मध्ये दुरूस्ती करणे किंवा या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते आदेश देण्यात येतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget