(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); प्रेरणा मिळेल असा मातृतिर्थचा विकास करणार - मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

प्रेरणा मिळेल असा मातृतिर्थचा विकास करणार - मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलडाणा ( १४ फेब्रुवारी २०१९ ) : माँ जिजाऊंनी स्‍वराज्‍यांची बिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मनात बालपणापासूनच रुजविली. त्‍यांच्‍या या कार्यकतृत्‍वामुळेच हिंदवी स्‍वराज्‍याचे स्‍वप्‍न प्रत्‍यक्षात आले. हा गौरवशाली इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचवून त्‍यांना प्रेरणा मिळेल, असा मातृतिर्थचा विकास करण्‍यास राज्‍य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंदखेड राजा येथे केले.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय यांच्यामार्फत मातृतिर्थ माँ जिजाऊ साहेब सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात करण्यात आले होते. त्यावेळी राजमाता जिजाऊ विद्यालयाच्या प्रांगणावर मुख्य कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगर विकास राज्यमंत्री डॉ रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, ॲड आकाश फुंडकर, नगराध्यक्ष नाझेर काझी,जि.प सभापती श्वेताताई महाले, माजी आमदार धृपदराव सावळे, तोताराम कायंदे, विभागीय आयुक्त पियुष सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी षनमुखराजन,अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपस्थित होते.

मुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले, मातृतिर्थचा विकास करण्‍यासाठी राज्‍य शासन कटिबध्‍द आहे. आराखड्यांतर्गत येणाऱ्या सर्व विकास कामांसाठी पहिल्या टप्प्यातील संपूर्ण निधी देण्‍यासोबतच पूर्ववैभव टिकवून ठेवण्‍यासाठी सहकार्य करण्‍यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जनतेसमोर यावे, यासाठी ६०० कोटी रुपयांचा रायगड विकास आराखडा मंजूर करण्‍यात आला आहे. यातून गडकिल्‍यांचा कायापालट करण्‍यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या गड किल्‍ल्‍यांसोबतच माँ जिजाऊ मातेच्‍या प्रेरणा स्‍थळांचा विकास होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल.

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत व्‍हावी, यासाठी शेतकरी सन्मान योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपयांची थेट मदत केंद्र शासन करणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप, विहीरी उपलब्ध करून सिंचनाचा अनुषेश दूर करण्यात येत आहे. या माध्यमातून शेतीचा गुणात्मक विकास होणे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी माल खरेदी धोरणातंर्गत ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसोबतच ऑफलाईन शेतमालाची विक्री केलेल्या सर्व शेतकऱ्यांना हमी भावानुसार रक्कम देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. यामुळे थकीत रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री केलेल्या शेतमालाचा मोबदला मिळणार आहे. गेल्या तीन वर्षात साडेआठ हजार कोटींचा शेतमाल खरेदी करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात आले आहे. यातून सुमारे चार हजार 700 कोटी रूपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच पिक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यात दोन लाख ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आहे. शेत जमीनधारक एकत्रीत शेतकरी कुटूंबालाही कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफी मिळण्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या काही ठिकाणी अडचणी येत आहे. त्याही लवकरच निकाली काढून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला जोपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत ही योजना सुरूच ठेवण्यात येणार आहे.

राज्यात दुष्काळाच्या झळा पोहोचत आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील धोत्रा नंदई डावा कालव्यातील येणाऱ्या अडचणी निकाली काढून खडकपूर्णा प्रकल्पातील पुनर्वसनाची कामेही योग्य पद्धतीने करण्यात येतील. मंठासह 92 गावांच्या पाणीपुरवठा करणेबाबतचा प्रश्नासंदर्भात लवकरच मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्री यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, मातृतिर्थच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राज्याबाहेरही राज्याची अस्मिता छत्रपती शिवाजी यांच्या जीवन चरित्रावर उभी करण्यात आली आहे. पानीपत आणि सुरजकुंड येथील कार्यक्रमांमधून राज्याची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विकास आराखडयातील दुसऱ्या टप्यातील कामे सुरू करण्याची मागणी प्रास्ताविकातून केली. खासदार प्रतापराव जाधव यांनी विविध विकास कामांना मोठा निधी मिळाला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माँ जिजाऊ साहेब राजवाडा वास्तू नुतनीकरणाचे भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. तसेच मुख्यमंत्री यांनी राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील माँ जिजाऊं साहेबांच्या शिल्पाकृतीला हारार्पण करून पूजन केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget