(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भूकंपग्रस्तांच्या साहाय्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या

भूकंपग्रस्तांच्या साहाय्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - मुख्यमंत्री

पालघर ( ८ फेब्रुवारी २०१९ ) : भूकंपामुळे ज्या भागात हानी झाली आहे त्या भागातील रहिवाशांना निवासाची तात्पुरती सोय म्हणून त्यांच्या घराजवळ लहान तंबूंची व्यवस्था करावी, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. याचबरोबर घरे बांधण्याकरिता रेट्रो फिटिंगसाठीचा तसेच इतर तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

पालघर येथील नूतनीकरण केलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भूकंपाबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, अमित घोडा, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

भूकंप जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी केले. त्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भूकंपरोधक घरे बांधणे बंधनकारक आहे. त्यास निधी कमी पडत असल्यास तो वाढवून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. ज्या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत तेथे यापुढे सर्व घरे भूकंपरोधक बांधणे आवश्यक करावे. विजेच्या जुन्या खांबांमुळे हानी होऊ नये यासाठी असे खांब तातडीने बदलून नवीन खांब उभारावेत. जवळच असलेल्या कुर्झे धरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यामध्ये अत्यावश्यक असलेल्या दुरूस्त्या तातडीने करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी उपाययोजनांबाबत सादरीकरण करताना डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी जवळ भूकंपाचे केंद्र असून जवळपासची 17 गावे प्रभावीत झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, भूकंपग्रस्त भागातील रहिवाशांसाठी आतापर्यंत 500 टारपोलीनचे वाटप करण्यात आले आहे. 1500 घरांचा सर्व्हे झाला असून त्यापैकी 1300 घरे मदतीसाठी पात्र आहेत. रात्री भिती वाटू नये यासाठी पोलीसांमार्फत गस्त घालण्यात येत आहे. आश्रमशाळांमध्ये विशेष लक्ष देण्यात येत असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना आवश्यकतेनुसार बांबू आणि टारपोलीनचे तंबू देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. रहिवाशांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष स्थापून त्याचे क्रमांक देण्यात आले आहेत. या परिसरातील मोठ्या प्रकल्पांना आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांबातचा अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.

भूकंप झाल्यानंतर दुर्दैवी मृत्यू आलेल्या वैभवी रमेश भुयाळ या लहान मुलीच्या पालकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 4 लाखांच्या मदतीचा धनादेश यावेळी देण्यात आला.

शासकीय विश्रामगृहाच्या नूतन वास्तूचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी येथे उभारलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी येथील रजिस्टर मध्ये स्वत:ची नावनोंदणी करून प्रवेश केला. या इमारतीत मुख्यमंत्री यांच्यासाठी एक सूट, चार व्हीव्हीआयपी सूट, आठ व्हीआयपी सूट आणि आठ इतर खोल्यांसह बैठकीसाठी आणि भोजनासाठी मोठे कक्ष अशी सुसज्ज व्यवस्था आहे. 1579 चौरस मीटर इतके क्षेत्रफळ असलेली ही इमारत आधुनिक सोयींनी युक्त आणि आकर्षक अशी तयार करण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget