ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, अमरावतीचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार बच्चू कडू, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, पर्यटन आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंघल, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वन विभागाचे सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या आमला (ता. दर्यापूर, जि. अमरावती) या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण 6 कोटी 79 लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोच रस्ता, वाहनतळ, स्वयंपाक घर, सभागृह, नदीकाठी संरक्षण भिंत, प्रवासी निवारा, परिसराचे सौंदर्यीकरण याबरोबरच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदींच्या कामाचा समावेश आहे. तर नागरवाडी येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 18 कोटीच्या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आली असून या प्रस्तावात काही बदल करून प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पुन्हा पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव संस्थांनच्या विकासासाठी एकूण 25 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपये देण्यासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामध्ये भक्त निवास, भक्तांसाठीच्या सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीर्थक्षेत्रे ही महाराष्ट्राची ओळख व्हावीत, यासाठी राज्यातील तीर्थक्षेत्राचा परिसर हा स्वच्छ, सुंदर व आकर्षक असावा, यासाठीची कामे विकास आराखड्यातून केली जावीत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कचरा दिसू नये, सांडपाण्याची सोग्य व्यवस्था व्हावी, यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे.
यावेळी अमरावती व हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून प्रस्तावाची माहिती दिली.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी यंदा 10 कोटीचा निधी
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील तीर्थक्षेत्र गणपतीपुळेच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या आरखड्यातील कामांसाठी सुमारे 10 कोटींचा निधी यंदा मिळणार आहे. यामध्ये रस्ते विकास, वाहनतळ, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजना, सुशोभिकरण, वाहनतळ व मंदिर परिसरात सौर ऊर्जा आदी कामे प्रस्तावित केली आहेत.
यावेळी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वित्त व नियोजन मंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री व रत्नागिरी चे पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गणपती पुळे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राचे आयकॉन आहे. येथे येणाऱ्या भाविकांना चांगली सुविधा मिळावी तसेच मंदिराचा परिसर स्वच्छ असावा, यासाठी सजग रहावे. घाणपाणी समुद्रात सोडले जाऊ नये, यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावे. साफसफाईसाठी मनुष्यबळ खासगी माध्यमातून घेण्यात यावे.
मुनगंटीवार म्हणाले, तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातीलकामांचा प्राधान्य क्रम ठरवून टप्प्याटप्प्याने कामे सुरू करावीत. पहिल्या टप्प्यात मंदिर परिसर व भाविकांशी संबंधित कामे करण्यात यावीत. तर दुसऱ्या टप्प्यात रस्ते, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे तर तिसऱ्या टप्प्यात सुशोभिकरण आदी कामे करण्यात यावीत. मंदिराचे व परिसराचे सुशोभिकरण करत असताना जे.जे. स्कूलच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
टिप्पणी पोस्ट करा