(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कचारगड ला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा | मराठी १ नंबर बातम्या

कचारगड ला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

कचारगड (गोंदिया)  ( १८ फेब्रुवारी २०१९ ) : - कचारगड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या अनेक राज्यातून दरवर्षी या ठिकाणी भाविक येतात. कचारगडच्या विकासासाठी देवस्थानला अ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कचारगडचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात यावा, महाराष्ट्र शासन आवश्यक तो सर्व निधी देईल असे त्यांनी सांगितले. सर्व सोई सुविधायुक्त आराखडा तयार करावा केंद्र सरकार सुद्धा निधी देईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावरचा गोंडी समाजाचा सांस्कृतिक उत्सव, महाअधिवेशन तथा कोया पुनेम निमित्त सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथील कचारगड येथे १७ फेब्रुवारीपासून पारी कोपार लिंगो माँ काली कंकाली पेनठाना देवस्थान येथील यात्रेनिमित्त राष्ट्रीय गोंडवाना महा अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. परिणय फुके, संजय पुराम, विजय रहांगडाले व विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भव्य अटल आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

कचारगडच्या यात्रेची परंपरा खूप मोठी आहे. या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात येतात. मी महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री आहे मला या ठिकाणी येऊन आशीर्वाद व दर्शनाचा लाभ घेता आला. या ठिकाणी मिळालेली आशीर्वादरुपी उर्जा राज्याच्या विकासासाठी प्रेरणा देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नागपूर शहर गोंड राज्याने वसविले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांची नगर रचना अप्रतिम होती. त्यांच्या काळातील किल्ले व विविध वास्तू पाहल्यानंतर गोंडराजे किती पुरोगामी विचारांचे व दूरदृष्टी असलेले राजे होते याचा परिचय येतो असे ते म्हणाले.

जल, जमीन आणि जंगलाचे संवर्धन आदिवासी समाजाने केले आहे. या समाजाच्या प्राचीन अशा संस्कृतीचे जतन करण्याचा शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असून शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रात चांगले काम केल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कचारगड देवस्थानाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करावा त्यास शासन हवा तेवढा निधी देईल असे ते म्हणाले. सरकार गोंडी आदिवासी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून गोंडी संस्कृतीवर अतिक्रमण होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. आदिवासी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कुआढास नाला बंधारा, गोंडी भाषेला मान्यता देणे व कचारगड विकास आराखड्यास केंद्राकडून निधी मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळीं सांगितले. सरकारने प्रत्येक गावा गावात व घरा घरात वीज पोहोचविली आहे. कचारगड विकासासाठी साडेतीन कोटी रुपये दिले, सहा कोटी कुटुंबाला उज्ज्वला योजनेचा लाभ दिला असे गडकरी म्हणाले. समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा हा काळ असून आरोग्य, शिक्षण, रोजगार व प्रगती यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. आदिवासी समाज निश्चितच प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कचारगड येथे मोबाईल कनेक्टिव्हिटी साठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री यांनी गेल्या चार वर्षात कचारगडच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिल्याचे सांगितले. कचारगड विकासासाठी शंभर कोटींचा निधी दयावा, गोंडी भाषेला मान्यता मिळावी व कुआढास बंधारा बांधण्यात यावा अशा मागण्या आमदार संजय पुराम यांनी आपल्या भाषणात केल्या. समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी समाजाच्या अनेक मागण्या आपल्या प्रास्ताविकातून मांडल्या.

याप्रसंगी अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून जनरल फिजीशियन, जनरल सर्जरी, स्त्रीरोग व प्रसुती सेवा, बालरोग, नेत्ररोग, नाक कान घसा, अस्थिरोग, समतोल आहार मार्गदर्शन, स्वच्छतेविषयक मार्गदर्शन, न्युरोलॉजी, कॅन्सर, हृदयरोग, नेफ्रोलॉजी व इतर विशेषोपचार तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून बहुसंख्य भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमास आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget